मानसिक त्रासातून जात असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्याल?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
गिरिजा खूप दिवसांपासून अस्वस्थ होती, मानसिक त्रासातून जात होती. तिच्या कामात आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एकाच वेळी गोंधळ निर्माण झाला होता. अचानक कामावरून काढून टाकणं, त्यात घरी नवऱ्याशी चाललेले मतभेद. कशातच मन लागेना म्हणून काही दिवसांसाठी माहेरी राहायला आली होती. मन मोकळं करून घडाघडा बोलावं असं तिने कधी केलच नाही, असा पहिल्यापासून तिचा स्वभावच नव्हता.
त्यामुळे आई बाबांना तिची अजूनच काळजी वाटत होती. एकटीच बसून राहायची, स्वतःच्या विचारात हरवलेली असायची. आई काही बोलायला आली तर नीट काही सांगायची देखील नाही. कोणी जास्त आग्रह केलेला चालत नसे. तिचा लगेच पारा चढायचा व ती त्या दोघांवरही ओरडायची. मला माहित आहे तुम्हाला पण माझा त्रास होतोय, कामावरची लोक मला कसं घालवता येईल हे पाहत होती, त्यांच्या मनासारखं झाल, नवरा कधी आपला असा झालाच नाही आणि तुम्ही पण आता तसच वागा.
पण मी काही तुम्हाला जास्त दिवस त्रास देणार नाही. लगेचच मी इथून निघून जाणारे. तिचं हे बोलण त्यांच्या जिव्हारी लागायचं. त्यांचा हेतू तिला घालवण्याचा किंवा त्रास देण्याचा नसायचा. ते तर तिच्या काळजीपोटी विचारायचे. पण गिरिजा स्वतःच्या त्रासात इतकी गुरफटली होती की तिला आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय याची जाणीव होत नव्हती.
दिवसेंदिवस तिची चिडचिड वाढत चालली होती. एक दिवस अगदी शुल्लक अश्या कारणावरून तिने घरात जेवण बनवायला येणाऱ्या मावशींसोबत भांडण केल. कोणाला समजलं पण नाही तिला इतका राग का आला. त्या बाई खूप वर्षांपासून येत होत्या त्यामुळे त्यांनी समजून घेतल. पण गिरिजा मात्र लक्षात आल की आपण वागतोय ये ठीक नाही. आपण जरी त्रासात असलो तरी त्याच्यामुळे आपण इतरांना त्रास देणं बरोबर नाही.
तिने दुसऱ्या दिवशी त्या मावशींची माफी मागितली. तिने निर्णय घेतला की आपण दुसरीकडे राहायला गेलं पाहिजे. त्यानुसार तिने शोधाशोध करून एक खोली मिळवली व आई बाबांना सांगून तिथे निघून गेली. तिने तिथून जाव अस त्या दोघांच्याही मनात नव्हत. कारण तिची अवस्था त्या दोघांनीही पाहिली होती. पण गिरिजालाच आता आपल्यामुळे कोणालाही त्रास व्हायला नको होता. तसच ती किती दिवस त्यांच्याकडे राहणार होती? कधी ना कधी तिला बाहेर पडावं लागणारच होत. काम शोधावं लागणार होत. म्हणून ती स्वतःला त्रास असूनही त्यांच्यापासून दूर गेली.
आपण सर्व जण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मानसिक त्रासातून गेलेलो असतो. कारण तश्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. पण जेव्हा आपण या त्रासात अडकतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवरही होतो. कारण अश्या अवस्थेत असताना आपलं वागणं, बोलणं, राहणं बदलून गेलेलं असत ज्याची झळ त्यांना पोहोचते. आपल्या मनात समोरच्याला मुद्दाम त्रास द्यावा अस नसत.
पण तरीदेखील आपण अस्वस्थ असल्याने अश्या काही गोष्टी होतात की त्याने आपल्या जवळच्या लोकांनाही त्रास होतो. अश्या वेळी आपल्याला वाटत असत की एकट बसावं, जास्त कोणाशी काही बोलू नये. पण अस होत नसेल, सारखं कोण तरी चौकशी करत असेल, विचारत असेल तर आपल्याला ते नको असत आणि आपण पटकन काहीतरी बोलून जातो. आपण कळत नकळत बऱ्याच जणांना दुखावतो. हे अस व्ह्यायला नको असेल तर आपण काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.
काय करायचं? तर आपल्याला जो काही त्रास होत आहे तो आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करा. जितकं आपण मन मोकळं करू तितकं आपल्याला बर वाटत. अनेकदा होत काय, आपण त्रासातून जात असतो, त्याची कारण वैगरे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या लोकांना त्यातल काहीच माहीत नसत. आणि रोज हसत खेळत राहणारी व्यक्ती अचानक शांत होत असेल तर काळजी वाटण स्वभाविक असत. तेच इथे होत आणि प्रश्नांचा भडिमार होतो. जे आपल्याला नको असत. म्हणूनच आपल मन मोकळं करा.
आपल्या त्रासाची जाणीव त्यांना करून द्या. कारण प्रत्येक वेळी आपण एकटेच आपल्याला बर करू शकत नाही. आपल्याला कोणाची तरी मदत लागते. आपण जर हे सर्व सांगितलं तर आपलाही त्रास कमी होईल आणि त्यांना पण आपल्या वागण्या मागचं कारण समजल्याने ते पण तशी काळजी घेऊन वागतील. त्यामुळे त्यांना ही आपल्याकडून काही त्रास होणार नाही.
अश्या काळात आपल्याला स्वतःची सोबत जास्त हवी असते. शांत बसून राहायच असत. तेही मिळाल नाही तरी त्रास होतो. अस होत की घरातल्यांना वाटत की आपला माणूस त्रासात आहे ना तर त्याला एकट सोडू नये. काही बाबतीत हे बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण २४तास सोबत राहील पाहिजे अस होत नाही. त्यांना त्यांची स्पेस दिली पाहिजे. आणि हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की मला थोडा वेळ माझ्यासोबत घालवायचा आहे. मला तो मिळुदे. अस केल तर कोणी आपल्याला फार डिस्टर्ब करत नाही आणि आपणही चिडचीड करून वागत नाही.
सर्वात महत्त्वाचं आपल्याला स्वतः बद्दल चांगली जाणीव असण. मग ती शारीरिक असेल मानसिक असेल. एखाद्या प्रसंगात आपण कसे वागतो, काय बोलतो, याची आपल्याला जाणीव पाहिजे तर ती कशी दुरुस्त करता येईल याकडे आपण लक्ष देणार. मानसिक त्रासातून जात असताना आपण बरेचदा अनपेक्षितपणे वागतो. पटकन काहीतरी बोलून जातो. पण याची जाणीव आपण ठेवली, हे अस कधी होत? का होत? हे आपण पाहिलं तर कमी करू शकतो.
जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्यामध्ये बदल होत आहेत, आता आपण काहीतरी बोलू शकतो किंवा समोरच्याला त्रास होईल अस वागू शकतो त्याच क्षणी तिथून बाजूला गेलेलं चांगल असत. याला परिस्थिपासून पळ काढणे म्हणत नाहीत तर सजग राहणं म्हणतात. यातून आपली स्वतः बद्दलची जाणीव वाढते आणि आपण पुढच्या धोक्याचा टाळतो. या अश्या काही गोष्टी केल्या, सजग राहील, इतरांची मदत घेतली मोकळेपणा ठेवला तर इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही तसच आपला त्रास देखील कमी होईल.
