मानसिक टेन्शन मधून असे बाहेर पडावे..
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्या आयुष्यात आपल्याला कोणालाच टेन्शन, त्रास नको असतो. उलट त्यातून जितकं बाहेर येता येईल तितकं बर असा आपण विचार करत असतो, त्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक माणसाला कसलं ना कसलं टेन्शन असतच. मला कशाची काहीही काळजी नाही, मी निवांत आहे अशी माणसं फार क्वचित पाहायला मिळतात.
जरी असली तरी त्यांनी आपल्या आयुष्याचा असा काळ पाहिलेला असतो जिथे त्यांना आता हे अस निवांत आयुष्य हवं असतं. पण त्यांच्या मागे देखील काही ना काही गोष्टी या असतातच. एखाद्याला पैश्याच टेन्शन असेल तर एखाद्याला आपल्या शिक्षणाचं असेल. एखाद्या माणसाला आपल्या लग्नाचं टेन्शन असेल तर एखाद्याला आपल्या मुलांचं असेल. समाजाशी बांधिलकी असलेल्या व्यक्तीला इतर लोकांबद्दल काळजी असेल, समाजाचं पुढे कसं भविष्य असेल याबद्दल तो विचार करेल.
व्यक्तीनुसार त्याचे विचार बदलत जातात, त्याच्या जाणीवा, अनुभव बदलत जातात तसच त्याचे त्रासदेखील बदलत जातात. पण यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे सर्वांना यातून बाहेर पडायचं असत. एक छान, सुखद आयुष्य जगायच असत. आता अश्या काही गोष्टी असतात, प्रसंग असतात जे त्रासदायक असतात. ज्याने आपल्याला टेन्शन पण येत. पण ते टाळण्याचे त्यातून बाहेर पडण्याचे देखील मार्ग असतात. दुर्लक्ष करून, त्या वाटेला न जाऊन आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो.
आणि अस केल्याने आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होत नाही. पण याउलट अश्याही काही गोष्टी असतात, नाती असतात, असे काही प्रसंग असतात जे जरी त्रासदायक असेल, आपला त्रास त्यातून वाढत असला तरी आपल्याला ते टाळता येत नाहीत. त्यांच्याशी आपला सामना हा होतच राहतो. अश्या वेळी अनेकदा प्रयत्न करून सुद्धा काही होत नाही. आपण ज्या गोष्टीपासून पळायचा प्रयत्न करतो ती परत परत समोर येत राहते आणि आपला त्रास वाढतो.
आपण जिथे काम करतो, आपल्या घरातील काही माणसं किंवा आपल्या जुन्या आठवणी असतील, भविष्यातील काही गोष्टी असतील. आता या सर्व गोष्टी तस पाहायला गेलं तर टाळता येत पण नाहीत आणि टाळता येतात देखील. या दोन्ही गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत. हे खर आहे की आपल्या नात्यांना, आपल्या कामाला तिथल्या गोष्टींना आपण नाही टाळू शकत.
मनात बरेचदा इतके सारे विचार येतात जे आपल्याला इच्छा असून देखील काढता येत नाहीत. कारण हे आपल्या हातात नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो हे समोरच्या व्यक्तीला बरेचदा माहीत असून देखील ती तसच वागते. तिच्या या वागण्यावर आपला काहीच कंट्रोल असू शकत नाही. पण, पण आपण त्यावर कसं वागायचं, आपण त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे ह्या गोष्टी आपण कदाचित नाही टाळू शकत, पण त्यातून जो आपल्याला त्रास होतो तो आपण टाळू शकतो आणि ते आपल्याच हातात आहे. ते कसं? तर जेव्हा जेव्हा आपल्याला अस वाटत की मी कितीही प्रयत्न केला यातून बाहेर पडायचा तरी हे प्रसंग, ही माणसं मला त्रास देतात, मला याचा त्रास होतो. हे अस जेव्हा वाटेल, या गोष्टीतून जेव्हा टेन्शन येईल तेव्हा स्वतःला विचारायचा की मी जे टेन्शन घेत आहे, मी जो त्रास करून घेत आहे यातून माझा काही फायदा होत आहे का?
आपल्या आयुष्यात अश्या बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात ज्या खरच त्रासदायक असतात. पण त्या होऊन गेल्यानंतर, खूप काळ लोटल्यानंतर देखील जरी आपण त्याच टेन्शन घेत असू तर त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काही चांगला परिणाम होतो का हे पाहिलं पाहिजे. या टेन्शन ने आपला त्रास अजूनच वाढत असेल तर हे अस वागुन काहीही फायदा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे व पुढे गेलं पाहिजे.
प्रश्न जेव्हा नात्यांचा येतो तेव्हा बरेचदा माणूस असहाय्य होऊन जातो. आपलीच माणसं असतात, बोलायच तरी कोणाला अस होत आणि आपण विनाकारण टेन्शन घेत राहतो. बर ज्या व्यक्तीसाठी घेतो त्याला याची बरेचदा जाण देखील नसते. अश्या वेळी आपल्याला स्वतःसाठी बोलता आलं पाहिजे.
आपण जोपर्यंत स्वतःच्या बाजूने उभे राहत नाही तोपर्यंत आपल्या बाजूने कोणीही उभ राहणार नाही. जवळच्या नात्यांच्या बाबतीतच अस नाही तर अशी कोणीही व्यक्ती जिच्यामुळे आपल्याला त्रास होतो अस वाटत, वाढतो अस वाटत तिच्याशी आपण ठामपणे बोलल पाहिजे, त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लक्षात घेऊन ते नात कस ठेवायच याचा विचार केला पाहिजे.
सर्वात जास्त टेन्शन घेतल जात ते भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल. ज्या अजून घडायला अवकाश आहे, त्या तश्याच होणार की नाही हे देखील आपल्याला माहीत नसत. म्हणूनच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे अजून घडलच नाही त्याबद्दल आता विचार करून, आताची वेळ खराब करून मला काय मिळणार आहे? काहीही नाही. त्यामुळे शक्य तितकं वर्तमानात जगायचा प्रयत्न करा. आताच्या काळात राहण्याचा, आनंद घेण्याचा प्रयत्न करा.
सर्वात महत्त्वाचे कोणी कसही वागल तरी त्यावर आपण कसं वागायचं हे शेवटी आपल्याला हातात असत. आपण जसा विचार करणार तश्या गोष्टी होणार. त्यामुळे टेन्शन देणाऱ्या गोष्टी जरी समोर असल्या तरी त्यातून टेन्शन घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. समोरची व्यक्ती, प्रसंग तोपर्यंतच त्रास देऊ शकतात जोपर्यंत आपण देऊ देतो. या सर्व गोष्टी, हे निर्णय स्वातंत्र्य शेवटपर्यंत आपल्याच हातात असणार आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Kupach. Change