Skip to content

मानसिक आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या ६ सवयींविषयी जाणून घ्या.

मानसिक आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या ६ सवयींविषयी जाणून घ्या.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


१० ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्य प्रती जनजागृती व्हावी, मानसिक आरोग्याचा अवेअरनेस वाढावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कारण लोकांमध्ये अजूनही शारीरिक आरोग्याबद्दल जितकी काळजी दिसून येते, जितकी सजगता दिसून येते तितकी मानसिक आरोग्याबद्दल दिसून येत नाही.

अजूनही बऱ्याच प्रमाणात याबद्दल लोकांमध्ये पूर्वग्रह दिसून येतात, गैरसमज तसच एकप्रकारची उदासीनता दिसून येते आणि याचा परिणाम असा होतो की मानसिक आरोग्य चांगल ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच जी काळजी घ्यायला हवी, ज्या पद्धतीनं आयुष्य असायला हवं तस ठेवलं जात नाही, तितकं लक्ष दिलं जातं नाही. ज्यातून पुढे गंभीर समस्या निर्माण होतात. रोपाला जर कीड लागायला नको असेल तर सुरुवातीपासूनच काही काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी वरून रोपावर घालाव्या लागतात तर काही कटाक्षाने टाळाव्या लागतात. तरच ते छान बहरत.

सुरवातीलाच दुर्लक्ष करून नंतर कधीतरी खराब होत चाललेल्या झाडाला वाचवायला गेलं तर तर ते पुन्हा तरतरीत व्हायला वेळ लागतो, दुप्पट कष्ट लागतात. म्हणून मानसिक आरोग्य चांगले सुदृढ ठेवण्यासाठी देखील काही गोष्टी कराव्या लागतात तर काही टाळाव्या लागतात. या मध्ये बऱ्याच गोष्टीचा समावेश होतो. ज्यात येतात आपल्या सवयी. तर अश्या कोणत्या सवयी ज्या आपल्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचवू शकतात, ज्या आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात आणि ज्या आपल्याला बदलल्या पाहिजेत ते पाहू:

१. इतरांशी तुलना करणे: ही सवय अनेकांना असते. सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहणे. आपल्याकडे कितीही काहीही असल तरी दुसऱ्याकडे किती आहे हे पाहणे. आणि मग त्याच्याकडे जास्त असेल तर कमीपणा वाटून घेऊन त्रास करून घेणे अश्या प्रकारची जी मानसिकता असते ती एक असमाधानी वृत्ती निर्माण करते ज्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करते. कारण आपण कधीही खुश असत नाही.

एक चांगल आयुष्य जगायला मनात एक समाधानी प्रवृत्ती असायला लागते तिचं असत नाही. म्हणून चांगल मानसिक आरोग्य करण्यासाठी आधी इतरांशी तुलना करण बंद केलं पाहिजे. आपल्या आयुष्याकडे अधिक चांगल्या नजरेने आपल्याला पाहता आल पाहिजे. कोण जाणे इतरांहून सुंदर, किमती अस आपल्याकडे काहीतरी असू शकेल.

२. चालढकलपणा: आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है हमें बरसों” अशी आपली सवय असते. आणि यातून एकही माणूस सुटला नाही. शाळा सुरू झाल्यापासून पुस्तक हातात न घेता परीक्षेच्या दोन दिवस आधी अभ्यास करणे, न्यू इयर रिसोल्युशन म्हणून काहीतरी ठरवून नंतर ते पूर्ण पणे विसरूनच जाणे, तातडीने बाहेर जायचं असताना वेगळ्याच गोष्टींमध्ये वेळ घालवणे ही सर्व चालढकलपणाची उदाहरणं आहेत.

आपल्यापैकी प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात चालढकलपणा करत असतो. पण याच प्रमाण खूप वाढलं तर मात्र आपल्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचतो. कारण चालढकलपणापासून सुरू होणार हे चक्र आपल्याला नैराश्यापर्यंत नेऊन पोहोचवत. ठरवूनही गोष्टी टाळत राहणे, त्यातून येणारी चिंता, परत करायला घेतल्यावर जमणार नाही अस वाटून टाळणे आणि यातून निर्माण होणारा लो सेल्फ इस्टीम सर्व गोष्टी नैराश्याला आमंत्रण देतात. कारण करायचं म्हटल तरी जमत नाही आणि ते जमत नाही म्हणून स्वतःवर शंका. म्हणूनच कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगी, बहुरि करेगा कब असा विचार डोक्यात ठेवून जी काम जेव्हा ठरवली आहेत त्याच वेळी ती करून टाकायची. त्यासाठी त्या गोष्टीचं महत्त्व जाणून घेणे, to do list तयार करणे ही सर्व काम करायची.

३. ध्येयहिन आयुष्य: ही पण एक अशी सवय आहे जी आपलं आरोग्य खराब करते. ध्येयहिन आयुष्य हे फुल आहे पण त्याचा सुगंधच हरवला आहे अस असत. जन्माला आलो आहोत म्हणून उगाच जगायचं याला आयुष्य म्हणत नाहीत. आपली आयुष्यात छोटी छोटी का होईनात ध्येय असली पाहिजेत. आणि ती आपण कशी पूर्ण करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या माणसाचं आयुष्यात ध्येय नसत त्याच मन असच भरकटत राहत.

जर त्याला समाधान, आनंद मिळवून द्यायचा असेल तर ध्येय पाहिजे. याला कारणही आहे. जेव्हा आपण काहीतरी यश मिळवतो तेव्हा आपल्याला मेंदूत dopamine स्त्रवत ज्याला reward neurotransmitter म्हटल जात. म्हणूनच जेव्हा आपण काहीतरी अचिव्ह करतो तेव्हा आपल्याला आतून आनंद मिळतो. त्यासाठीच आयुष्यात ध्येय पाहिजे आणि ते स्मार्ट पाहिजे.

४. इंटरनेट, सोशल मीडियाचा अतिवापर: आतच युग हे पूर्णपणे डिजिटल झालं आहे. ज्याची त्याची सोशल मीडिया अकाऊंट आहेत. आणि त्याचा वापर पण अती प्रमाणात होतो आहे. ज्यातून ताण निर्माण होतो आहे. झोपेवर परिणाम होतो आहे. त्याचप्रमाणे पोस्ट वर कमेंट करणे, ट्रौलिंग यासारखे प्रकार खूप वाढत आहे. यातून सुध्दा तरुण मुलामध्ये नैराश्य, अपराधीपणा, negative self image ह्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून आपण स्वतःच नीट विचार करून आपला स्क्रीन टाइम मर्यादित ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया कितीही छान वाटल तरी गे शेवटी एक आभासी जग आहे. दिसत ते सर्व तसच असत अस नाही. त्यामुळे त्यात जास्त गुंतून न पडता आपण मेंटली स्ट्राँग झालं पाहिजे.

५. निगेटीव्ह सेल्फटॉक: सेल्फ टॉक म्हणजे स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद. याला मानसिक आरोग्य मध्ये खूप महत्त्व आहे. कारण आपले विचार आपल्या बोलण्यात येत असतात. आणि कोणाही दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्याआधी आपण स्वतःशी सर्वात आधी बोलत असतो. त्यामुळे ते बोलण जर नकारात्मक असेल तर त्याचा पुढील सर्व गोष्टींवर प्रभाव पडतो. कोणतीही गोष्ट करण्याअगोदर मला जमणारच नाही, जरा काही झालं तर मी यातून कधी बाहेरच पडू शकणार नाही, मला कुठे काय येत, मी ढ आहे असा आपला संवाद असेल तर त्याचे चुकीचेच परिणाम होतात.

म्हणून आपला सेल्फ टॉक हा आपल्याला पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे. आपल्याला आशा दाखवणारा असला पाहिजे. जर आपण आपल्यासोबत नसू तर जग कितीही प्रयत्न करुदेत आपल्याला मदत करू शकत नाही. दुसऱ्याने कितीही मदत केली तरी शेवटी आपल्याला स्वतःला सावरता आलं पाहिजे. त्यासाठी आपले विचार चांगले ठेवले पाहिजेत.

६. अपुरी झोप: झोप ही अशी एक गोष्ट आहे ही आपल्या शारीरिक मानसिक दोन्ही गोष्टींवर प्रभाव टाकते. आताच लाइफस्टाइल खूप फास्ट झाल आहे. खूप जास्त काम, रात्री अपरात्री पार्ट्या करण, फोनवर खूप वेळ असण यातून झोप पूर्ण होत नाही. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. यातून पण ताण, काम नीट न होणे, चिडचिड यासारख्या गोष्टी होतात. म्हणून ज्यांना झोपेच्या वेळी खूप जास्त फोन वापरायची सवय आहे, अपुर झोपायची सवय आहे त्यांनी ती वेळीच कमी केली पाहिजे. यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकत. चिंता, निद्रानाश यासारखे आजार होऊ शकतात. म्हणून किमान सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे. कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

या काही सवयी आहेत ज्या आपण आटोक्यात आणल्या तर आपल मानसिक आरोग्य चांगल होऊ शकत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!