माणसं येतात आणि निघून जातात, हेच आयुष्य! मग तुम्ही का या आयुष्याचा भाग बनत नाही.
हर्षदा पिंपळे
आयुष्य माणसांभोवती गुंफलं गेलय यात शंका नाही.पण त्याला काहीतरी मर्यादा हवी नं ?कारण आपलं आयुष्य नाही म्हंटलं तरी समुद्रासारखच विशाल आहे. त्याचा पसारा हा खूप मोठा आहे. आणि या पसाऱ्यामध्ये माणसांची काही कमी नाही. नाना प्रकारच्या माणसांचा वावर हा आपल्या आयुष्यात असतो.रोज कुणीतरी नवीन येतं, रोज कुणीतरी जातं.आणि आपण या माणसांमध्येच गढून जातो.आयुष्यात माणसं येतात आणि जातात,हेच आपलं आयुष्य! पण मग आपण या आयुष्याचाच एक भाग का बरं नाही बनत ?
आपलं आयुष्य हे केवळ येणाऱ्या जाणाऱ्या माणसांपूरतच मर्यादित आहे का? आयुष्यात माणसांचा वावर असतो म्हंटल्यावर थोडा वेळ तर त्यांच्यामध्ये जाणारच यात काही प्रश्नच नाही.पण सगळं आयुष्य त्यातच घालवायचं का?येणारी माणसं,जाणारी माणसं इतकच आपलं आयुष्य? नाही नं? इथे आपणच आपल्या आयुष्याचा भाग बनायला तयार नाही. किंवा आपलं आपल्याकडे लक्षच नाही.आपलं लक्ष केवळ आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडेच असतं.या सगळ्यामध्ये आपलं स्वतःचही आयुष्य आहे, आपणही या आयुष्याचाच एक भाग आहोत,आपणही त्या माणसांपैकीच एक आहोत ; हे मात्र जाणीवपूर्वक विसरतो.
माणसांच्या वर्दळीमध्ये आपण आपल्याकडे असं दुर्लक्ष का करतो कळत नाही.आपल्यालाही आयुष्य मिळालय तर त्याचा आपण एक भाग व्हायला हवं.आयुष्यात येणारी जाणारी माणसं सोडून इतरही गोष्टी असतात याचा आपण विचार करायला हवा.आपण केवळ माणसांचाच विचार करत राहतो.त्यांच्याभोवतीच घुटमळत राहतो.त्यांच्या आयुष्यात काय चाललय आणि काय नाही हे बघण्यातच आपण आपलं अर्ध आयुष्य घालवतो.इतकच नाही तर लोक काय म्हणतील, ह्याला काय वाटेल त्याला वाटेल यातच आपलं आयुष्य चाललय.आता आयुष्यात माणसं आहे म्हंटल्यावर त्यांच्यासोबत वेळ घालवणं साहजिक आहे.परंतु यामध्ये आपल्याच आयुष्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ते योग्य नाही.
केवळ माणसं म्हणजेच
आयुष्य का?
आपलं विश्व खरच या
माणसांभोवतीच फिरतं का?
आपण आपलं आयुष्य
जगायला हवं नं ?
आपणच आपल्या आयुष्याचा
भाग बनायला हवं नं ?
काय पटतय नं…?
नसेल पटत कदाचित हे सगळं. कदाचित स्वार्थी वृत्ती वाटेल ही,परंतु जे वास्तव आहे ते स्वीकारायला हवं.ते स्वीकारणं आवश्यक आहे. कारण जर आपण हे स्वीकारलं नाही तर आपलं विश्व खरच माणसांभोवतीच फिरत राहिल.आपण आपल्या आयुष्याचाच एक भाग होणं आवश्यक आहे.नाहीतर काही दिवसांनी आपण आपलं अस्तित्व विसरायलाही कमी करणार नाही.”तुझं आयुष्य काय? तुझं आणि या आयुष्याचं नातं काय? ” असे प्रश्न उद्या कुणी विचारलेच तर सांगता यायला हवं नं? नाहीतर येणारी-जाणारी माणसं म्हणजे आयुष्य ,हेच आपलं आयुष्य असच आपण सांगत बसू.
आयुष्यात माणसं येणार असतात आणि जाणारही असतात.आपण त्यांना आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व देतो पण मग आपलं काय ? मान्य आहे आयुष्यात काही माणसं म्हणजे केवळ सचख असतं.काही माणसांशी आपलं इतकं छान जमतं की त्यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करत नाही. पण कधी कधी काही माणसं आपल्याच मनावर नको ते ओरखडे मारून जातात.आणि आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यातच तासनतास वेळ घालवतो.स्वतःला त्रास करून घेतो.पण आयुष्यात अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्यालाही प्राधान्य द्या.
केवळ येणारी जाणारी माणसच म्हणजे आयुष्य अशी आयुष्याची व्याख्या अजिबात ठरवू नका.कारण आजचा माणूस उद्या कधी हात सोडून जाईल कळणार नाही.आयुष्यातील सगळीच माणसं आयुष्यभर साथ देतील याची काहीच शाश्वती नाही. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा जरा स्वतःवर लक्ष केंद्रित करा.स्वतःला आयुष्याचा भाग बनवायचा प्रयत्न करा.
आयुष्य आपलही आहे ते स्वतःसाठीही जगायला शिका.माणसं जोडाच,माणसांना आपल्या आयुष्याचा भाग बनवा काही हरकत नाही पण यामध्ये स्वतःला मात्र विसरू नका.आपणही या आयुष्याचाच एक सुंदर भाग आहोत हेही मनामध्ये एकदा रूजवून घ्या.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
