मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचे नाही.
हर्षदा पिंपळे
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात. त्यांचा वेगवेगळा स्वभाव, वागणं-बोलणं सगळं आपण अनुभवत असतो.कित्येकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीच वागणं-बोलणं फारसं पटतही नाही. कधी कधी आपण त्या व्यक्तीला समजून घेण्याचा तसा प्रयत्न करतो.पण कधी कधी ती व्यक्ती आपलाच फायदा घेते.आपल्यालाच एखाद्या गोष्टीत अडकून ठेवते.आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात. की ज्यामुळे ती लोकं नकोनकोशी होतात. अशी लोकं ज्यांनी फसवणूक केली आहे.
पैशाच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत…काही मित्र किंवा जवळच्या व्यक्तीही असतात ज्यांनी पाठीत खंजीर खुपसली असते.अशा व्यक्ती ज्यांच्यामुळे अन्याय, अत्याचार सहन करावा लागलेला असतो.अशी लोकं ज्यांच्यामुळे जवळजवळ अर्ध आयुष्य बरबादीत गेलेलं असतं,दुःखाच्या खाईत लोटलेलं असतं.अशी लोकं अक्षरशः मनातून उतरतात,कायमची डोक्यात जातात. त्यांच्याविषयी आपल्या मनात कायम तिटकारा वाटतो.आणि असा तिटकारा वाटणही साहजिकच आहे.
“ए…तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला हं…मला पुन्हा तोंड दाखवायला आला नाहीस तरी चालेल.मुळात मला तुझं तोंड बघायची इच्छाच नाहीये.”
“तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.तुझी काय लायकी आहे ते माहीत आहे.तुला असा धडा शिकवीन नं…..की आयुष्यभर लक्षात ठेवशील.”
“तिने माझा विश्वासघात केला.मी तिच्यावर एवढा विश्वास ठेवला तरीसुद्धा ती अशी वागली.ती आता माझ्या मनातून साफ उतरली गं…”
“तो जाम डोक्यात गेला हं माझ्या… त्याला मी आता सोडणार नाही.”
“तुझ्याकडून तरी ही अपेक्षाच नव्हती गं…श्शी…लाज वाटते मला तुझी…तुझ्यासारखे मित्र-मैत्रीण असण्यापेक्षा ते नसलेले बरे.”
असे काही संवाद आठवतायेत का कुणाला…?
नक्कीच आठवत असतील कारण एखादी गोष्ट आपल्या मनातून आणि डोक्यातून सहजासहजी कधीही जात नाही. एकतर ती मनात राहते नाहीतर मग डोक्यात तरी राहते.गोष्टी चांगल्या असतील तर त्यांचा सहसा बाऊ करण्याचा प्रश्नच येत नाही.परंतु गोष्टी जर तितक्याच त्रासदायक असतील तर नक्कीच त्याचा परिणाम होतो. सतत त्या त्रासदायक गोष्टी/घटना आपल्याला डोळ्यासमोर दिसत राहतात. मग डोक्यामध्ये विचारांच सत्र चालूच राहतं.कितीतरी लोकं आयुष्यात येतात आणि जातात. काही मनाच्या अगदी जवळ असतात तर काहींच नाव घेतलं तरी डोकं फिरायरा लागतं.चिड येते,संताप होतो.काही लोकं अक्षरशः मनातून उतरतात.अशा मनातून साफ उतरलेल्या लोकांविषयी काहीही ऐकण्याची आपली मनःस्थिती नसते.ती लोकं कायमच नकोनकोशी वाटतात.तर काही माणसं कधी कधी आपल्या मनातून जातातही पण डोक्यात ती कायमस्वरूपी बसलेली असतात.तर अशा माणसांना सहसा मनात काय तर डोक्यातही ठेवू नये.कारण यामुळे स्वतःलाच जास्त त्रास होतो.आपल्या मनावर याचे वेगवेगळे परिणाम होतात.मन अस्थिर होऊ लागतं.मन सातत्याने त्याच माणसांच्या गोष्टींमध्ये गुंतून राहतं.जुनं जुनं पुन्हा आठवत राहतं.कोण कसं वागलं या सगळ्या जुन्या आठवणींमध्ये आपण पुन्हा आपला वेळ खर्च करतो.
यामुळे पुढच्या गोष्टींच गणित बिघडत जातं. म्हणून अशा लोकांना मनातूनच नाही तर डोक्यातूनही कायमच हद्दपार करायला हवं.उगाचच नको त्या गोष्टी डोक्यात ठेवून काय होणार..? एखाद्या अशा व्यक्तीला डोक्यात ठेवल्याने आपल्या मनात तिरस्काराची भावना नव्याने वाढत जाते.त्या व्यक्तीप्रती असणाऱ्या आपल्या भावना काही बदलत नाहीत.एकदा का त्या व्यक्तीप्रती आपल्या मनात वाईट इमेज तयार झाली की ती सहसा पुसणं अशक्य असतं.त्यामुळे या व्यक्ती डोक्यात ठेवून वावरणं म्हणजे स्वतःच स्वतःला त्रास करून घेण्यासारख आहे.
म्हणून वेळीच डोक्यात गेलेल्या माणसांना मनाबरोबर डोक्यातूनही काढून टाका.अशा गोष्टींपासून चार हात जरा लांबच रहायचा प्रयत्न करा.यापेक्षा आयुष्यात किती चांगली लोकं आहेत याचा विचार करा.एखाद्याला मनात जागा देण्याऐवजी डोक्यात जागा दिली आहे का…? याचा विचार करा.कारण कधी कधी चांगलही नकळतपणे निसटून जात असतं.चांगला विचार करा..चांगल्या माणसांचा विचार करा.मनातून उतरलेल्या माणसांकडून फक्त काहीतरी धडा घ्या.अशी माणसं आयुष्यात येणारच हे स्वीकारून पुढे चालत रहा.
कुणीतरी मनातून उतरणारच…कुणीतरी डोक्यात जाणारच…. त्यांना केवळ बाहेरचे मार्ग दाखवायला शिका.डोक्यात ठेवाल तर उगाच डिस्टर्ब व्हाल.आणि हसत-खेळत चालू असलेलं आयुष्य उगाचच मिळमिळीत होऊन जाईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
