Skip to content

“मनातल्या तर्हे तर्हेच्या insecurities मुळे आपली मानसिक प्रगती होत नाहीये..”

“मनातल्या तर्हे तर्हेच्या insecurities मुळे आपली मानसिक प्रगती होत नाहीये..”


मधुश्री देशपांडे गानु


“मन के हारे हार है,

मन के जीते जीत..

कहे कबीर हरी पाइये,

मन ही की परतीत…”

“संत कबीर” यांचा हा अप्रतिम दोहा. जर मनुष्य मनातूनच हारला असेल तर जीवनातही त्याची हारच होते. पण जर त्याने मनाला, भावनांना जिंकून घेतलं तर त्याची खर्या आयुष्यातही जीत आहे. त्याच प्रमाणे मनापासून विश्वास, प्राप्ती असेल तरच ईश्वराचीही प्राप्ती होते.

अतिशय सुंदर अर्थ आहे. मनाचे गुपित किती सहज उलगडून सांगितलं आहे. “स्थिर, शांत, अचल मनच सर्व सिद्धींचे कारण आहे.” चंचल ताणयुक्त, चिंतायुक्त मनाने कोणतीही प्रगती आपण करू शकत नाही.

पूर्वीच्या काळी जगण्याची साधनं अगदी कमी होती किंवा मूलभूत होती, त्यामुळे जीवन सहज सोपे होते, आर्थिक उत्पन्न जरी कमी होतं तरी गरजाही कमी असल्याने भागत होतं. आणि माणसं समाधानी होती. नात्यांमध्ये घनिष्टता होती. एकत्र कुटुंब व्यवस्था होती. त्यामुळे कमी उत्पन्नातही भागत होतं. जसजसा काळ बदलला आणि माणूस सर्वार्थाने, तंत्रज्ञानाने प्रगत होऊ लागला, तशी मीपणाची वृत्ती वाढीस लागली. एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली. न्युक्लिअर कुटुंब पद्धती आली. माणूस भौतिक दृष्ट्या प्रगत, सर्व सुखसोयींनी समृद्ध झाला. पण त्याचबरोबर तो समाजापासून, आपल्या माणसांपासून दूरही गेला. मी, माझं यातच रमू लागला. वेगवान प्रगतीबरोबरच येणारे ताण, चिंता, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड, पैसा सर्वस्व मानण्याचा अट्टाहास, भौतिक सुखसोयींचा बागुलबुवा यात पुरता अडकला.

समाजात, स्पर्धेत टिकून राहण्याच्या या बाह्य रस्सीखेचीत मनात मात्र तर्हेच्या तर्हेच्या insecurities जन्म घेऊ लागल्या. शरीराला भौतिक सुख सुविधांनी आराम देता-देता मन नावाचं बेटच माणूस विसरून गेला. या गरजा निभावताना होणारी घालमेल त्याच्या मनावर परिणाम करू लागली. आज त्याचे सर्वदूर गंभीर परिणाम दिसत आहेत.

आज खरंच आयुष्य खूप गुंतागुंतीचं आणि बेभरवशाचं झालं आहे. सकाळी बाहेर गेलेली व्यक्ती सुखरूप घरी परतेल याची शाश्वती राहिली नाही. जगण्यासाठी, टिकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, जागतिक सर्व पातळ्यांवर फक्त आणि फक्त असुरक्षितता आहे. कोणी इथे पूर्ण समाधानी नाही. स्वतःच्या आयुष्याचा भरवसा राहिला नाही, तर इतरांच्या काय देणार?? या असुरक्षिततेच्या अतिरेकामुळे आज मनुष्य मानसिक पातळीवर प्रचंड अस्थिर झाला आहे.

रोजच्या जगण्यातले ताण असह्य होत आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर, आज नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मूल जन्माला घालण्यात ही असुरक्षितता जाणवत आहे. आपण नवीन येणाऱ्या जीवाला चांगलं, सुरक्षित आयुष्य देऊ शकू याची खात्री त्यांना आज वाटत नाहीये. त्यामुळे आज अनेक जोडपी मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. आज नात्यांचा भरवसा राहिला नाही. कोणत्याही क्षुल्लक कारणाने सहज घटस्पोट होताना दिसत आहेत. लग्नसंस्था, नाती अतिशय विस्कळीत, तकलादू होताना दिसत आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाने आपण जग जवळ आणलं असलं तरीही भावनिक दृष्ट्या आज असमाधानच पाहायला मिळते. प्रेम, विश्वास, श्रद्धा, आदर, सन्मान, कौतुक या खरंतर नात्यांना संजीवनी देणाऱ्या भावनाच आज तोकड्या पडू लागल्या आहेत. पैशाने, भौतिक पातळीवर सुखांच्या राशीत लोळणारा माणूस भावनिक पातळीवर मात्र एकटा आहे. मनापासून मनाने असुरक्षित आहे.

खरंतर आज अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटं समोर उभी असताना मनाने, प्रेमाने आपण आपल्या माणसांशी जोडून राहणं खूप गरजेचं आहे. याने आपण एकमेकांची मानसिक प्रगतीच करू शकतो. अशा आजच्या अस्थिर जगात माणसाने माणसाला मनापासून स्वीकारणे, भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. पण नेमकं हेच होताना दिसत नाहीये.

आज अनेक ताण तणाव, चिंता माणसाला पोखरून काढत आहेत. अस्थिर आणि विस्कळीत नातेसंबंध, आर्थिक ताण, जीवघेण्या स्पर्धेचा ताण, वेगवेगळ्या आजारांना बळी पडण्याचा ताण या सगळ्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे. फेसबुकसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर लोकं लाईव्ह येऊन, सांगून आत्महत्या करत आहेत. तरीही समाजात अजून जागरूकता नाही.

आज प्रत्येक व्यक्ती मानसिक पातळीवर सुदृढ, आरोग्य पूर्ण असणं अत्यंत गरजेचे आहे. कारण जर तुमचं मन खंबीर, समर्थ, स्वस्थ, शांत असेल तरच तुम्ही या बाह्य ताणतणावांना यशस्वी सामोरे जाऊ शकता. हे ताण तणाव तुम्ही यशस्वीपणे हाताळू शकता. आज मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक यांची समाजाला सर्वाधिक गरज आहे. कारण मनातील वेगवेगळ्या insecurities आपण यशस्वीपणे हाताळू शकत नाही. ताण तणाव योग्य पद्धतीने घेऊ शकत नाही. मनाची शक्ती, ऊर्जा, ताकद हीच आपल्या शरीराची ताकद आहे हे वेळीच ओळखायला हवं. आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरायला शिकायला हवे. चिंता, अकारण ताण यामध्ये ही ऊर्जा खर्च केल्याने आपल्याला मानसिक आणि शारीरिकही थकवा येतो. अत्यंत सकारात्मक आणि वास्तववादी विचारांचे सुनियोजन करण्याची मनाला सवय लावायलाच हवी. तरच आपण टिकून राहू. मनाची प्रगती झाली तरच तुम्ही बाह्य क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकता. आधी मानाने स्वतःला स्वीकारा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःचं हवं तिथे मनापासुन कौतुक करा. सतत स्वतःला दोषी समजणं ताबडतोब थांबवा. घडून गेलेल्या घटनांचा वारंवार विचार टाळा. आज, आत्ता, वर्तमानात जगायला शिका. मनाची ताकद योगासनांनी, ध्यानधारणेने वाढवा. म्हणजेच मन खंबीर, सुदृढ, समर्थ केलंत तर सहजच तुमची इतरही सर्वांगीण प्रगती होणारच. आत्मविश्वास वाढणारच.

जगण्याची असुरक्षितता आणि संघर्ष तर प्रत्येकालाच असणार. कधीतरी चिंताही वाटणारच. पण त्यातच अडकून न राहता त्यावर मात करण्यासाठी मनाची ताकद वाढवणे हे महत्त्वाचे आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती कोणत्याही प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाते. सारासार विचार, विवेक जागृत ठेवून जीवन जगते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. सकारात्मकतेने मनाची प्रगती करते. हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. बरोबर ना!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““मनातल्या तर्हे तर्हेच्या insecurities मुळे आपली मानसिक प्रगती होत नाहीये..””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!