मनात शांतता हवी असेल तर सर्वच समजून घेण्याचा प्रयत्न करू नका.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
एक माणूस एकदा एका प्रवासावर निघाला. कसला प्रवास? तर संपूर्ण जीवन, आजूबाजूला जे काही आहे ते सर्व समजून घेण्याच्या प्रवासावर. फक्त आताच जीवन नाही तर पुढे काय होणार आहे हे देखील समजून घेण्याच्या प्रवासावर. सुरुवात त्याने आपल्या घरापासूनच केली. त्याला अस वाटत होत की आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घराचा इतिहास, आपल्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. घरातल्या मोठ्या, बुजुर्ग व्यक्तिंकडून त्याने ते जाणून घेतलं. माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्याला माहित झाल्या, त्याने त्या समजून घेतल्या. तरी त्याच्या मनाचं समाधान होत नव्हत.
आपल्याबद्दल तर आपण माहिती घेतली, पण मग आजूबाजूचा समाज, त्याची जडणघडण, त्यात रुजलेली मूल्य ही कशी आली, कुठून आली याबद्दल त्याला कुतूहुल निर्माण झालं. या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी तो घराबाहेर पडला. यातील तज्ञ मंडळींकडे तो गेला. त्यांच्याशी त्याने चर्चा केली, बोलण केल. जितकी होईल तितकी यातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
आता माहीत नसलेल्या गोष्टी समजून घेणं या त्याच्या आयुष्याचा ध्यासच होऊन बसला. तहान, भूक हरपून तो याच गोष्टीच्या मागे लागला. स्वतःच घराणं, समाज, संस्कृती, वंश ह्या सर्व गोष्टी झाल्या. आता त्याला निसर्ग त्याचं अस्तित्व याबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली. इतके दिवस माणसांमध्ये राहून माहिती घेणारा तो आता सर्वांपासून दूर रानावनात फिरू लागला,भटकू लागला.
कशाची शुद्ध नाही. फक्त एक ध्यास. सुरुवातीपासून जे लक्ष्य होत ते हळू हळू साध्य होत होत. ज्ञानात भर पडत होती, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत होता. निसर्गाच हे चक्र, त्याची गूढता हळू हळू समजत होती. पण तरीही काहीतरी गवलसल्याचा आनंद, ती मानसिक शांतता मात्र मिळत नव्हती. उलट एक गोष्ट समजल्यावर काहीतरी राहून जातंय ही अपुरेपणाची भावनाच जास्त खात होती. स्वस्थ बसू देत नव्हती. आता देखील इतकं सर्व माहीत होऊनही चित्त स्थिर नव्हत. अस का होत आहे हे त्याला देखील समजेना.
भटकंती चालू होतीच.
आपल्या या अस्वस्थतेच कारण आपल्याला या प्रवासात कुठेतरी मिळेल या आशेने तो चालत राहिला. एक दिवस असाच चालत असताना त्याला एक साधू बाबा ध्यान लावून बसलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर एक क्षण याच्या मनात आले की आपल्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडेच असतील. आपण बाबांशी बोललं पाहिजे. तो तडक तिथे गेला व त्यांच्या शेजारी बसून राहिला. साधू बाबा ध्यानात होते. त्यामुळे ते जेव्हा कधी ध्यानातून बाहेर येतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलू या भावनेने तो तिथेच बसून राहिला. आता फक्त डोक्यात त्यांच्याशी बोलण हे इतकचं होत.
बाकी कोणताही विचार नव्हता. मन फक्त आता या क्षणावर केंद्रित होत. बाबा ध्यानातून बाहेर येईपर्यंत त्याने आजूबाजूचा निसर्ग डोळे भरून पाहून घेतला, त्याचा आनंद घेतला, पक्षांचा तो किलबिलाट, झाडांच्या पानांची सळसळ, दुरून कुठून तरी येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट. सर्व गोष्टी तृप्त करून टाकणाऱ्या होत्या. हे काहीही तो मुद्दाम माहिती करून घेण्याच्या हेतूने पाहत नव्हता. या प्रत्येक हालचाली मागे काय तर्क आहे, काय शास्त्र आहे हे त्याला जाणून घायच नव्हत. तो फक्त त्याचा आनंद घेत होत होता.
त्या क्षणाला जगत होता. त्याला या गोष्टीचा देखील विसर पडला होता की आपण कोणत्या तरी प्रवासाला निघालो आहोत आणि आपल्याला काहीतरी सलत आहे. ज्या मानसिक शांततेच्या शोधात तो वणवण करत होता ती त्याला आता अनुभवायला मिळाली. जी का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तरं घेण्यासाठी तो ध्यानस्थ साधूची वाट पाहत बसला ती त्याला मिळाली. पण अजूनही हे सर्व अनुत्तरीतच होत.
म्हणजे इतकी वर्ष सर्व ज्ञान प्राप्त करत असताना
असमाधान आणि आता नुसत निश्चल बसून राहिल्यावर ही तृप्ती, अस का? हे आता त्याला जाणून घ्यायच होत.
थोड्यावेळाने साधूने डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि प्रसन्नता पाहूनच हा भारावून गेला. त्याने साधूला नमस्कार केला व बोलायला सुरुवात केली. “बाबा इतकी वर्ष मी गोष्टी समजून घेत आहे, नव नवीन ज्ञान मिळवत आहे, दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही तहान भूक हरपून मी या गोष्टींच्या मागे लागलो तरीही मला काहीतरी मिळालं ही भावना कधी टिकलीच नाही.
शांतता म्हणून कधी लाभली नाही. हे अस का याच उत्तर मागायला म्हणून मी तुमच्याकडे येऊन बसलो तर आतापर्यंत जगलेल्या या आयुष्यात जे समाधान मिळालं नाही ते आता या क्षणात मिळालं अशी जाणीव मला झाली. ज्या शांततेच्या शोधात मी इतकं फिरलो ती आता मला काहीही न करता आपोआप मिळाली. अस कस झालं? याची कारण काय आहेत.”
यावर साधूने त्याच्याकडे एक नजर टाकली व स्मित हास्य केल. ते म्हणाले, “तुझ्या या दोन्ही प्रश्नांची उत्तर तू स्वतःच दिली आहेस. तु स्वतःच म्हणालास की, सुरुवातीला तू तहान भूक हरपून कल वेळेचं भान न ठेवता कशाचा तरी शोध घेत होतास, हे करताना देखील याच्या पुढे देखील आपल्याला कश्याचा तरी शोध अजून घ्यायचा आहेच ही गोष्ट देखील तुझ्या डोक्यात होती. कोणतीही गोष्ट हळू हळू अनुभवातून जाणून घेण्याचा प्रयत्न न करता तू हट्टाने जाणून घेण्याचा प्रयत्न केलास. हीच गोष्ट तुला असमाधानी ठेवत होती. तुझ्या मनात अपूर्णता होती कारण तू जे मिळालं त्याचा कधी पूर्ण आनंद घेतलास नाही.”
“आणि आता? बाबा आता अस काय झालं की मी शांत झालो, माझ मन शांत झालं?” यावर बाबा म्हणाले, “याचं उत्तर देखील तू स्वतः दिलं आहेस. तुझ्या मनाला आता शांतता लाभली कारण तुझ्या डोक्यात आता कोणतेच विचार नव्हते. तू फक्त आताच्या क्षणात होत. तू कारण शोधत नव्हतास तर फक्त स्वीकार करत होतास, अनुभूती घेत होतास. तू वर्तमानकाळात होतास. तुझ मन कुठेही भरकटत नव्हत, कोणत्याही गोष्टीचा पाठलाग करत नव्हत. तुझ्या मनामध्ये झालेल्या बदलाच कारण हा काळच आहे. आधी तू फक्त भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये अडकून होतास. आज पहिल्यांदा तू वर्तमान काळात जगलास आणि म्हणून तुला मानसिक शांतता लाभली.
हा निसर्ग आपलं हे जीवन हे अनेक गूढ, आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींनी भरलेलं आहे. त्याचा शोध प्रत्येकाला घ्यायचा असतो, तो घेतला देखील पाहिजे. पण तो शोध आपल्या मनात कोणताही अट्टाहास असता कामा नये. कसला अट्टाहास? तर मला सगळ्यातल सगळं समजलंच पाहिजे आणि आताच समजलं पाहिजे. या सर्व अनुभवाच्या गोष्टी असतात आणि त्या अनुभव घेऊन म्हणजेच वर्तमानात राहूनच समजतात, सजग राहून समजतात. आताच्या क्षणापासून दूर होऊन, स्वतःपासून दूर होऊन जरी आपण काही मिळवलं तरी त्याने काही साध्य होत नाही. ते इथे आतामध्ये राहूनच मिळवावं लागत. आणि या सगळ्यामध्ये जर काही राहून गेलं तरी चालत. आपल्याला दर वेळी सर्व समजलच पाहिजे अस काही नसत.”
आपण आतापर्यंत काय काय चुकवल, किती आनंद गमावले हे त्या माणसाच्या लक्षात आलं. अज्ञानाचा शोध घेता घेता आपण समोर असलेल्या गोष्टींना कसं दुरावत गेलो ते त्याला समजल.
तो परत माघारी फिरला आताच आपलं जीवन परत जगायला, जिथे कोणता शोध नव्हता, फक्त आताचा क्षण होता आणि स्वीकारणं होत.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

