मनात साचलेल्या पुष्कळ गोष्टींमुळे कशातच मन लागत नाही.
हर्षदा पिंपळे
आई गेल्यापासून निखिल पूर्वीचा निखिल राहिला नव्हता.कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी भरपूर होते पण आई म्हणजे त्याची सगळ्यात जवळची मैत्रिण होती.तो जितका आईसोबत बोलायचा तितका त्याच्या मैत्रिणींशी बोलायचा नाही.
आयुष्यातील हर एक गोष्ट तो न विसरता आईलाच सांगायचा.आईसोबत बोलताना त्याला वेगळं काहीही वाटायच नाही. उलट तो आईशी बिंधास्त आणि मोकळेपणाने बोलायचा.पण आई गेली आणि निखिल मध्ये प्रचंड बदल झाला.आई असताना घरातील कुणालाही त्याची काळजी नसायची. पण आईच्या नसण्याने घरातील प्रत्येकाला निखिलची काळजी वाटू लागली. निखीलच बदललेलं वागणं,तासनतास शांत बसणं,एकट रहाणं घरातील लोकांच्या काळजीचं कारण बनत चाललेलं होतं.त्याचं मन कशातही लागत नव्हतं.
कायम अस्वस्थ असायचा. कुणाशी मोकळेपणाने बोलायचा नाही. मनातील गोष्टी मनातच ठेवायचा.हळुहळू त्याची होणारी घुसमट बाबांच्या लक्षात आली.कधीतरी क्वचितच मृदू आवाजात बोलणाऱ्या बाबांनी निखिलला जवळ घेतलं.त्याला हक्काने कुशीत घेतलं.आणि क्षणातच निखिलच्या भावनांना बांध फुटला.तो बाबांच्या कुशीत मोकळा झाला.त्याच्या इतके दिवसाच्या अश्रूंना पाझर फुटला होता.बाबांनी जवळ घेतल्यामुळे निखिल थोडा तरी शांत झाला होता. इतके दिवस अस्वस्थ असलेलं त्याचं मन उभारी घेण्याचा प्रयत्न करत होतं.हळुहळू तो पूर्ववत झाला.सगळं स्विकारून पुन्हा एकदा जगायला लागला.
तर ही झाली निखिलची गोष्ट. पण आपली गोष्टही फारशी वेगळी नाही.आपलीही कधी कधी अशीच अवस्था होते.
आभाळ भरून आल्यावर आपण अक्षरशः पाऊस कधी पडेल याची वाट पाहत असतो.जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपलं लक्ष सहसा दुसऱ्या कशातही लागत नाही.अगदी आपल्या मनाचही तसच आहे.मन इतकं भरलेलं असतं ,मनात इतकं काही साचलेलं असतं ज्यामुळे आपलं मन कशातही लागत नाही.मन कायम अशांत नी अस्वस्थ अवस्थेत असतं.आयुष्यात इतक्या चांगल्या वाईट घटना घडतात.आणि त्यातल्या नेमक्या मनाला टोचणाऱ्या गोष्टी आपल्या जास्त लक्षात राहतात.मनात कधी कधी राग असतो,द्वेषाच्या भावना असतात. अर्थात आपण क्षणाक्षणाला घडणाऱ्या गोष्टींचा हिशोब आपल्या मनात ठेवत असतो.कधी कुणासमोर सहसा सगळ्या गोष्टी व्यक्त करत नाही. मनात एकामागोमाग एक गोष्ट आपण साठवून ठेवतो.त्यामुळे मनात असंख्य प्रश्न कायम उत्तरांच्या प्रतिक्षेतच राहतात.स्वतःला आतल्या आत खूप त्रास होत राहतो.कामावरचा फोकस कमी होत जातो.मुलांच्या बाबतीत सांगायच झालं तर शाळा/कॉलेजमध्ये काही झालं असेन तर त्याचा परिणाम अभ्यासावर होतो.अभ्यासात अशावेळी मुलांच मन लागत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनातच ठेवाव्याशा वाटतात. इतरांना सांगताना सांगू की नको अशी अवस्था होते.आणि असं करत करत शेवटी इतरांशी मनातील काही आपण बोलत नाही.
तर असं मनात काही साचलं असेल तर कधी कधी निःशंकपणे व्यक्त व्हा. अगदी कुणाजवळही व्यक्त व्हा.एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही तुम्ही मनात साचलेलं सांगितलं तरीही मनावरचा ताण निघून जाण्यास मदत होईल.मन हलकं होईल. पण त्यासाठी बोलायला हवं.कायमच गोष्टी मनात साचून ठेवल्या तर कित्येक ठिकाणी लक्ष लागणारच नाही.आपण घरात आणि आपलं मन कुठेतरी दुसरीकडे….! असं कसं चालेल बरं..?
म्हणून…मनात दीर्घकाळ काही साचून देऊ नका. कधी कधी त्याला थोडं रितही होऊद्या.तरच सगळ्या गोष्टींमध्ये मन लागेल.
अन्यथा….
*आरोग्यावर/मनावर याचा परिणाम होऊ शकतो.
*गोष्टी अर्धवट राहू शकतात.
*हाताशी आलेली एखादी गोष्ट निसटू शकते.
*करिअर करता करता मन दुसरीकडे असेल तर त्याचा परिणाम करिअरवर निश्चितच होऊ शकतो.
*आपल्यामुळे दुसऱ्याची काळजी वाढू शकते.
बेसिकली अशा अनेक गोष्टी घडण्याची शक्यता असते.आणि या गोष्टी मुळातच चांगल्या नाहीत. आपलं मन जेवढं निरोगी आणि मोकळं असेल नं…तेवढं आपलं आयुष्य सुंदर आणि सुखकर असतं.मन लावून एखादी गोष्ट केली तर ती किती सुंदर असते याची कल्पना तर प्रत्येकाला असेलच.
मग गोष्टी सुंदर करायच्या की अवघड करायच्या हा विचार एकदा करून पहा.मनाला स्वस्थ ठेवायचा प्रयत्न करा.बोलकं करायचा प्रयत्न करा.
काय मग….कळतय नं..? करणार नं मोकळं भरलेल्या मनाला…?
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Nice suggestion