मनात जे साचलंय ते व्यक्त होत नसेल तर या सोप्या गोष्टी करून पहा.
हर्षदा पिंपळे
साचून साचून डबकं झालं
वातावरण कसं गढूळ व्हायला लागलय…
बाहेर येऊ की नको ?
आणि बाहेर यायच झालं तर येऊ तरी कसं…?
सगळं कसं बंदिस्त असल्यासारखं वाटतय..
आणि रस्ता मिळालाच थोडा बाहेर यायला
तर बाहेरच वातावरण अचानक विषारी तर होणार नाही नं…?
काय आहे इतक्या दिवसाच साचलेलं
नितळ कसं असेल नं…?
काय सांगायच किती किती साचलय या मनात….
मुंगीसुद्धा चालेल की नाही जरा शंकाच आहे..
मनात विचारांची इतकीच गर्दी आहे……
साचलेलं डबकं कसं मोकळं करायच काही कळतच नाही.
ह्या विचारांच्या ट्रॅफिकला ग्रीन सिग्नल कसा द्यायचा कळतच नाही…
माणसानं नदीसारख शांत पण प्रवाही असावं असं म्हणतात…
नदीवर राजहंस येतो…पण साचलेल्या डबक्यात डासच फेरफटका मारायला येतात.
पण आता वाटतय…राजहंस तर खूप लांबची गोष्ट झाली. कदाचित हे साचलेलं डबकं काही दिवसांनी डासांनाही नकोसं होईल……
मग साचलेल्या या डबक्याचा उपयोग तरी काय…??
त्यापेक्षा नदीसारख थोडं प्रवाही होऊयात का…?
साचलेल्या डबक्याला जरासं मोकळं करूयात का…?
चांगल-वाईट जे काही असेल ते एकदा सॉर्ट आउट करूयात का…?
तर मित्रांनो-मैत्रिणींनो पटतय का हे सगळं…?काय तुमच्याही मनाच असच डबकं झालय का…? मनात असंख्य गोष्टी साचल्या आहेत का..?कुणाला आपल्या मनातल्या प्रेमाच्या/मैत्रिच्या भावना शेअर करायच्या राहिल्या आहेत का..?कुणाविषयी मनात काही अडी आहे का..?कुणाविषयी मनात प्रचंड आग धगधगतेय का..?
खरचं तुमच्या मनात अ पासून ज्ञ पर्यंत काही साचलय का हो…? ते साचलेलं सारं काही व्यक्त करायच राहून गेलय का…? आणि व्यक्त होता येत नाहीये का…?
तर……या सगळ्या ‘का’ ची उत्तरं जास्तीत जास्त ‘हो’ अशीच असतील यात काही शंका वाटत नाही. कारण इथे प्रत्येकाच्या मनात काही ना काही साचलेलं आहे. इतकच नाही तर दिवसागणिक मनात काहीतरी साचत जातं.सगळ्यांनाच सगळं व्यक्त करता येत नाही. मग ते प्रेम असो वा राग असो.कितीतरी गोष्टी या मनातच दडून बसलेल्या असतात. अगदी एखाद्या पावसाने दडी मारावी तशाच…!
कधी कुणाविषयी आपल्या मनात खूप राग असतो.द्वेषाची भावना असते.नेहमी वाटतं एकदाच सगळं बोलून टाकावं.मनात शाप-शिव्या सगळं काही असतं.पण सहसा ओठांवर ते नसतं.कधी कधी ते ओठांवर आणणं आपल्याला शक्यही होत नाही. नाही व्यक्त करता येत तो राग-रूसवा. नाही सांगता येत कधी कधी समोरच्याला “तुझं असणं आता नकोसं झालयं” म्हणून….
कधी कधी अनोळखी माणसांशीही छान जमून जातं.वाटत असतं मनापासून मैत्रीची साद घालावी. मैत्रीचा एक हात पुढे करायाला परमीशन घ्यावी. पण …पण नाही जमत तेसुद्धा. कधी कधी मनात त्याच्याविषयी/तिच्याविषयी जे काही आहे ते सांगून टाकावसं वाटतं.आपल्या प्रश्नांची उत्तरं मागावीशी वाटतात. मनातल्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या भावनांना फुलवण्यासाठी ओठांवर आणावसं वाटतं.
अर्थात… एखाद्याच हवहवसं असणं आणि नसणही आपल्याला व्यक्त करता येत नाही. सगळं आपण साचून ठेवतो. तर मग हे साचलेलं बाहेर कसं काढायच हे आपण पाहूयात. तर….
सर्वात आधी एक दीर्घ श्वास घ्या. आपल्या मनात काहीतरी साचलय जे आपल्याला बाहेर काढायचय हे स्वतःशी एकदा कन्फर्म करून घ्या.
एक कागद घ्या आणि मनात साचलेल्या गोष्टींची एक यादी तयार करा.एकदा पाहून घ्या आपल्या मनात काय काय आहे ते. आणि नंतर एका एका गोष्टीपासून सुरुवात करा.
अनेकदा बोलता येत नाही. बोलताना अडखळलं जातं किंवा भीतीही वाटते.म्हणून अशावेळी तुम्ही थेट एखाद्याला पत्राच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतय ते लिहू शकता. तुमच्या मनात साचलेलं पत्रातून व्यक्त करू शकता. कारण थेट व्यक्त होत नसेल काही तर पत्र लिहणं हा एक उत्तम पर्याय आहे.काय साचलय ते चार-पाच पानं लिहून काढा.कारण पत्रसुद्धा तितकच बोलकं असतं.
वेगवेगळ्या थेरपीझ् ट्राय करून पहा.अशा अनेक थेरपीझ् आहेत ज्या की एखादी गोष्ट एक्स्प्रेस करण्यासाठी, एखाद्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. म्युझिक, आर्ट , कुकींग ,लाफ्टर ,डान्स अशा अनेक प्रकारच्या थेरपीझ् आपल्याला मदत करतात. या थेरपीझ् देखील व्यक्त होण्याचा उत्तम मार्ग आहेत.कलेला संवादाच माध्यम म्हणून पाहिलं जातं.अगदी तसच कलेतून तुमचा संवाद घडूद्या. जे काही आहे ते कलेतून इतरांपर्यंत पोहोचवा.कलेतून व्यक्त व्हायला शिका. हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे.
इतरांना काही सांगता येत नसेल तर बिंधास्त झाडांशी जाऊन बोला. पण काहीही करून व्यक्त व्हा.
जिथे सगळ्यात सेफ वाटतं अशा व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न करा.
सकस आहार आणि सुसंवादावर लक्ष केंद्रित करा. अनेकदा या दोन्ही गोष्टी मनावर परिणाम करतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जितक्या हेल्दी असतील तितकच मन मोकळं आणि प्रसन्न राहू शकतं.मन प्रसन्न असेल तर एखादी गोष्ट व्यक्त होताना सहसा काही प्रॉब्लेम येत नाही.
जर वाटत असेल बिंधास्त ओरडावं तर खुशाल ओरडा.रडून घ्या. हसून घ्या. एकदा जरा एकांतात स्वतःशीच बोलून पहा.
मनात सगळं असच साचून राहिलं तर काय होऊ शकतं याचा एक अंदाज घ्या.ताणतणाव वाढवायचा की कमी करायचा हे लक्षात घेऊन सगळं व्यक्त करून मोकळं व्हा.
एकदा जवळच्या मित्रांशी गप्प मारता मारता सहज सगळं बोलायचा प्रयत्न करा.
स्वतःला बोलण्यासाठी तयार करा.स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टींचा निचरा करा.
आज नाही तर कधी…? असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा.
स्वतःला/इतरांना व्यक्त करण्यासाठी सर्जनशील पद्धतीने मोटीवेट करा.
कृतीतून बोलून पहा.
डायरी लिहून पहा.
अगदीच गरज पडल्यास समुपदेशन करून घ्या.
पहा…तुमच्याकडे काही उपाय असतील तर नक्की शेअर करा.मनातलं व्यक्त करायला एखादं साधन नक्की शोधा. आणि मनात साचलेलं व्यक्त करा. त्याचं डबकं होऊन देऊ नका.त्याने मानसिक ताणतणाव वाढून आरोग्याचा समतोलही बिघडू शकतो.वेळीच व्यक्त व्हायला शिका.मनातील गोष्टींचा निचरा करणं किती आवश्यक आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल.
शेवटी एकच सांगेन…बिंधास्त व्यक्त व्हायला घाबरू नका. मनात सतत काहीतरी साठवून ठेवण्यापेक्षा व्यक्त केलेलं केव्हाही चांगलच आहे.
so…बोला….. व्यक्त व्हा…मोकळे व्हा..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Great….khup garaj aahe hyachi.