मनाने स्ट्रॉंग बनायचं असेल तर एकट्याने आनंदी राहायला शिका.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“मयुरी अग जा जरा बाहेर जाऊन फिरून ये. किती दिवस अशी घरातच बसून राहणारेस? कंटाळा येत नाही का ग तुला? कॉलेजला सुट्टी पाडून जवळजवळ महिना झाला आहे. तेव्हापासून घरात आहेस. एरवी तर तुला सारखं बाहेर जायचं असत. आज तर काय या मैत्रिणीच्या घरी जाते उद्या त्या मित्राचा वाढदिवस. आणि आता नुसत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरायच आणि नंतर तोंड एवढस करायचं.
मला बाहेर जाऊ देत नाहीस आणि माझ्यासोबत कुठेतरी ये म्हटल तर तेही तुला जमत नाही. घरकोंबडी झाली आहेस पक्की!” आई इतकं बोलत होती पण मयुरी वर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. ती फोनमध्ये डोकं खुपसून बसली होती. “अग मी तुझ्याशी बोलते जरा तरी लक्ष देशील का नाही?” “अग आई का ओरडते आहेस उगाच. आधीच माझा मुड ऑफ आहे. कॉलेजने इतक्या दिवसांची सुट्टी का दिलीये कुणास ठाऊक. मला तर वैताग आलाय. त्यात तू मला ओरड.” मयुरी बारीक तोंड करून म्हणाली.
“अग तुला कंटाळा आलाय मला समजतय, म्हणून तर मी म्हणते ना जरा बाहेर जाऊन ये, फिरून ये तुला बरं वाटेल.” “तु फिरायला जा म्हणते आई, पण तूच सांग मी कोणासोबत जाऊ? माझा एकतरी मित्र मैत्रिणी आहेत का इथे? सर्व गेले मस्त सुट्टी एन्जॉय करायला बाहेर. मग मी एकटी कशी जाऊ. मला नाही आवडत ते.” त्यावर आई डोक्यावर हात मारून म्हणाली, “मयु अग लहान आहेस का आता? प्रत्येकवेळी सोबत कोणतरी असायला.
कॉलेजमध्ये जातेस. एकट जायला काय झालं? सारखं कोण असणार आहे तुझ्या सोबत. आपलं आपण एकट राहायला शिकल पाहिजे. त्यात पण एक वेगळीच मजा असते.” “आई मला नको ग काही सांगू, आणि मला एकटीला नाही मजा येत. मला लागत कोणतरी सोबत तरच मला आनंद होतो.” आई इतकावेळ काम करत करत तिच्याशी बोलत होती. ती तिच्याजवळ येऊन थांबली.
“अग बाळा, तुला मी ओरडत नाही. या वयात आपल्याला अस वाटत की आपल्यासोबत आपले मित्र मैत्रिणी असावेत, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आपल्याला जास्त आनंद देत असतात. पण याचा अर्थ सारखं तू त्यांच्यावर अवलंबून राहणार का? अस किती दिवस चालणार? तुला फक्त सुट्टीत कोण सोबत नाही म्हणून तू अस करते. ठाऊक आहे का तुला तुझे आजी आजोबा मी लहान असताना मला एकटीला सोडून शेतात कामाला निघून जायचे. मैत्रिणी म्हणशील तर एक दोनच पण त्यांची भेट व्हायची ती शाळेत. त्याव्यतिरिक्त आमचं फार भेटणं व्हायचं नाही कारण त्यांची गावं वेगळी.”
मयुरी हे सर्व पहिल्यांदाच ऐकत होती. कारण असा विषयचं कधी निघाला नव्हता. आज हे बोलण ऐकून तिला आश्चर्यच वाटल. ती तिचा फोन बाजूला ठेवून आईच बोलण ऐकू लागली. “काय सांगते आई? तु एकटीच असायची. पण मग तुला कंटाळा यायचा नाही. तु करायची काय मग? वेळ कसा घालवायची?” यावर आई हसुन म्हणाली, “अजिबात कंटाळा यायचा नाही मला. आणि वेळ जायचं म्हणशील तर तोही आरामात निघून जायचा. माझे छंदच तसे असायचे. तुला माहीतच आहे आपलं गाव हाती बनवल्या जाणाऱ्या वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे.
अगदी तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू बनवल्या जातात. माझा छंद काय तर त्यांच्या त्या छोट्या छोट्या दुकानात जाऊन बसायचं आणि ते कश्या त्या वस्तू बनवतात ते न्याहाळायच. बर मी इथवर थांबत नसे तर घरी येऊन तसलच सामान गोळा करून तश्या वस्तू बनवायचा मी प्रयत्न करी. त्यात माझा दिवसचा दिवस निघून जायचा. ते सोडून नेहमीपेक्षा वेगळी अशी दिसणारी झाड, वनस्पती मी शोधत बसायचे. आपण काहीतरी नवीन शोधून काढला यातच मला आनंद. तुझे आजोबा मला गमतीने म्हणायचे, तू फिरस्तीच होणार. पाय एक क्षण थांबत नाही तुझा. आई मात्र माझं कौतुक करायची.
कारण त्या दोघांना पण मला म्हणावा तसा वेळ देता आला नाही आणि मी त्याबद्दल कधी तक्रार देखील केली नाही. कारण मी माझ्या एकटेपणात आनंद शोधून काढला होता. मला माणसांची आवडच नव्हती, मी माणूसघाणी होते अस नाही. मला पण माझ्या मैत्रिणींची आठवण यायची, त्यांच्याशी बोलावस वाटायचं, पण ते जमत नाही किंवा त्यांना सतत भेटता येत नाही म्हणून मी तोंड पाडून कधी बसले नाही. माझा आनंद मी त्यांच्यावर कधीच अवलंबून ठेवला नाही. आम्ही शाळेत भेटायचो, बोलायचो पण त्यातही त्या कधी आल्या नाहीत म्हणून माझं अडल नाही.
कारण मला माहीत होत की मी एकटी असेल तरी एकाकी नाही. मला माझी सोबत आहे. आंब्याच्या झाडाला लागलेले ऑर्किड तू पाहिलं असशील. किती सुंदर फुल आहे ते. पण आपण त्या झाडाला काय म्हणतो? तर बांडगुळ. का? कारण त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज असते. त्याशिवाय ते जगू शकत नाही. जेव्हा आपण इतरांवर जास्त अवलंबून राहतो, आपलं सुख, आनंद, दुःख त्यांच्यावर अवलंबून असत तेव्हा आपण पण एकप्रकारे त्यांच्या आधारे जगणारे बांडगुळ होऊन जातो.
आपलं अस वेगळं अस्तित्व राहत नाही. आपण जेव्हा अस दुसऱ्याच्या आधारावर राहतो तेव्हा आपण आतून कमकुवत होतो कारण त्यांच्या प्रत्येक हालचालीचा आपल्यावर परिणाम होतो. आता तुझच बघ, एरवी बाहेर जाणारी तू आता सोबत कोण नाही म्हणून तोंड पाडून बसलीस. सुट्टी फुकट घालवत आहेस. तूच ठरव, तुला जर स्ट्रॉंग बनायचं असेल तर स्वतंत्र फुलासारखं बहरायच आहे की बांडगुळ म्हणून कोणाच्यातरी आधारावर राहायचं आहे.” मयुरी फोन बाजूला ठेवून उठली आणि कपडे बदलायला गेली.
आवरून आल्यावर तिने गाडीची किल्ली व फोन घेतला व ती बाहेर जायला निघाली, आईने विचारलं, “अग कुठे चाललीस?” मयुरी म्हणाली, “काही नाही आज नवीन मूव्ही आली अस ऐकलंय म्हटल जरा पाहून येऊ.” हसत हसतच ती बाहेर पडली. आई पण हसुन तिच्या कामाला निघून गेली.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

मस्त , छान लेख
Very good
Deep explanation pahije
Ajun thode deep explanation pahije