Skip to content

दुरावा निर्माण होऊ नये म्हणून जवळीकच्यांनीच काही मर्यादा सांभाळाव्यात.

दुरावा निर्माण होऊ नये म्हणून जवळीकच्यांनीच काही मर्यादा सांभाळाव्यात.


गीतांजली जगदाळे


जवळच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास या भावनेने जरी ती नाती परिपूर्ण वाटत असली, तरी ती शेवट पर्यंत निरोगी आणि अखंड राहण्यासाठी, टिकण्यासाठी काही सीमा प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला सीमा असण्याची आवश्यकता असते. संबंधांमध्ये सीमा निश्चित करणे खूप महत्वाचे आहे.

फक्त सीमारेषा/ मर्यादा तुमच्या स्वतःच्या गरजांसाठीच उपयुक्त नाहीत , तर तुमच्याशी उत्तम प्रकारे संपर्क कसा साधायचा आणि परस्परसंवाद कसा साधायचा हे जाणून घेण्यासाठी ते इतरांसाठीही उपयुक्त आहेत. या मर्यादा सांभाळल्या असता नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता फारच कमी असते.

१. सगळ्यात महत्वाची मर्यादा म्हणजे आपण एकमेकांच्या वेळेला किती महत्व देतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला भेटायला गेला आहात, तुम्ही त्यांची कॉफी शॉप मध्ये वाट बघत बसला आहात, पण ठरवलेला वेळ जाऊन बराच वेळ होऊन ही ते अजून आलेले नाही.

आणि कधी कधी तर तुम्ही तिथे पोहचता आणि मग तुम्हाला फोन करून त्यांना यायला जमणार नाही असं कळवलं जातं. आता ही गोष्ट फार खराब आहे अशातला भाग नाही पण, या भेटीसाठी बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून, तुमचे इतर महत्वाचे प्लॅन्स या भेटीसाठी कॅन्सल करून तुम्ही इथे आलेले असता, आणि त्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की ही व्यक्ती नेहमीच या ना त्या कारणाने अशीच वागत असते तेव्हा तुमच्या वेळेची कदर तुमचा जवळचा मित्र करत नाहीए असं वाटू लागतं.

तेव्हा अशा वेळी ही छोटी वाटणारी गोष्ट ही मनात घर करून बसू शकते. कारण उशिरा येणं यापेक्षा ती व्यक्ती तुमच्या वेळेची किंमत करत नाही ही गोष्ट जास्त त्रासदायक ठरते. तुम्हाला जर तुमच्या वेळेची कदर इतर लोकांनी करावी असं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा अगदी तशीच कदर इतरांच्या वेळेची करायला हवी जशी तुम्हाला इतरांकडून अपेक्षित असते. तुम्हाला जर भेटायला जमणार नसेल तर तसं स्पष्ट सांगा , मेसेज , कॉल जस जमेल तसं संपर्कात रहा, कनेक्टेड रहा. पण या सगळ्यात स्पष्ट संवाद ठेवा जेणेकरून तुम्हाला एकमेकांची आणि एकमेकांच्या वेळेची किंमत आहे हे जाणवेल.

२. मैत्रीसह, जवळच्या नात्याइतकीच , जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये इच्छा आणि गरज हा एक मोठा भाग आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने शुक्रवारी रात्री मैफिलीला जावे असे तुम्हाला वाटते , पण तेच त्याने वेळ पाळून वक्तशीरपणे वेळच्या वेळी तिथे उपस्थित असावे असे वाटते. प्रत्येक माणूस वेळेवर पोहचणं महत्वाचं समजतोच असं नसत. पण तुम्हाला ते महत्वाचं असल्यास ते समोरच्या माणसाला व्यक्त केले असता तुमची ती गरज पूर्ण होऊ शकते. जर आपल्या जवळच्या माणसाला एखादी गोष्ट आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे कळल्यास तो नक्कीच ती पार पडतो. यातूनच चांगले संबंध टिकत असतात, तयार होत असतात.

३. काही माणसांसोबत आपलं खूप चांगलं बॉण्डिंग होऊन जातं. आणि असं नातं टिकवण्यासाठी आपण सर्व गरजेच्या गोष्टी अगदी मनापासून निभावत असतो. पण काही मित्र किंवा इतर कोणी जवळची माणसं अशीदेखील भेटतात जी स्वतः च्या गरजेपुरती फक्त आपल्याजवळ येतात, त्यांना गरज असेल तेव्हा फोन करणार, भेटणार अशा पद्धतीने वागतात.

पण जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते तेव्हा काही ना काही कारण सांगून ते गायब असणार, आपल्या गरजेला कधीच उभे राहणार नाहीत. पण आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीमुळे त्यांची कारणं, फालतू न वाटता खरी वाटतात, ते सांगतील त्यावर आपण विश्वास ठेवायला तयार असतो, समजून घ्यायला तयार असतो. पण नेहमी-नेहमी असंच घडत असल्यास अशा नात्याला आणि अशा माणसांना मर्यादा घालणं महत्वाचं होऊन जातं.

४. तुमचे असे काही मित्र असतील ज्यांना तुमच्याबद्दल जवळजवळ सर्व काही माहित आहे आणि इतर काही असे आहेत ज्यांना खाजगी असं काहीच माहित नाही आणि ते अगदी ठीक आहे. पण काही लोकांची अशी कल्पना असते की त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या सर्व गोष्टी सांगण्याची गरज आहे, म्हणजे जस की सांगणं कंपलसरी आहे असं ते समजत असतात ,आणि जर सांगत नसाल तर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक नाही आहात असं वाटत.

पण तुमची स्वतःची इच्छा असल्यास तुम्ही नक्कीच शेअर करू शकता, फक्त तुमच्या मर्जीने नाकी त्यासाठी तुम्ही बांधील आहात म्हणून . त्यामुळे ही मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की,तुम्ही तुम्हाला हवे तितके उघड किंवा खाजगी असू शकता, आणि तुम्हाला वाटेल तेव्हा, तुम्ही तयार असताल तेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता. हा एक दुतर्फा रस्ता आहे. तुम्ही तुमच्या मित्रांनीही काही गोष्टी स्वतःकडे ठेवल्यास त्याचा आदर करायला हवा. ते तुम्हाला काही सांगू इच्छित नसल्यामुळे, तुम्ही त्यांना मित्रापेक्षा कमी करू नका आणि एक मित्र म्हणून, या गोष्टींचा आदर करणे हे तुमचे आणि तसेच त्यांचे ही कर्तव्य आहे.

५. मैत्रीत किंवा कोणत्याही नात्यात ,तुमच्यातील मतभेदांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. मित्राच्या मूल्यांचा आदर करा आणि त्यांना तुमच्या मूल्यांचा आदर करण्यास सांगा. तुम्ही तुमचा मित्र म्हणून समान धर्म, कल्पना किंवा राजकीय विचार सामायिक करू शकत नाही आणि ते ठीक आहे. एक निरोगी मैत्री दोन लोकांना खूप भिन्न गोष्टींवर आदरपूर्वक विश्वास ठेवू देते. तुमचे विचार जरी वेगळे असले तरी तुम्ही एकमेकांचा आदर, एकमेकांच्या विचारांचा आदर करणे महत्वाचे आहे ना की, आपले विचार दुसऱ्यावर लादणे. या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मर्यादा पाळल्या असता नात्यात दुरावा येण्याची शक्यता कमी होऊ शकते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!