मन उदास व्हायला नकोय ना!! मग या सोप्या पद्धती कृतीत आणा.
मधुश्री देशपांडे गानू
“मन रे तू काहे ना धीर धरे…
वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह धरे…..
श्रेष्ठ गीतकार साहिर लुधियानवी यांचं हे अप्रतिम गीत. मनाचं अंतरंग किती सहज उलगडले आहे या गाण्यात. खरंच, मनाला धीर धरवत नाही ना! अतिचंचल असतं हे मन! आदरणीय बहिणाबाईंनी तर किती अचूक वर्णन केलंय.
” मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर! ”
मानवी मनोव्यापारांचं किती अप्रतिम वर्णन आहे. एखादी क्षुल्लक गोष्ट जरी मनाविरुद्ध घडली तरी ती मनात खोल रुतून बसते. त्याच प्रसंगाभोवती सारे बरे वाईट विचार फेर धरून नाचू लागतात. आणि वास्तव, अवास्तव, समज, गैरसमज यांचे एकावर एक थर जमू लागतात. खरं तर गोष्ट एवढीशी असते पण त्याचा “राईचा पर्वत” होतो. काही केल्या ती टोचणारी गोष्ट मनातून जात नाही. त्यासाठी कामात लक्ष लागत नाही. साध्या कामातही हातून चुका होतात. रात्रीची झोप लागत नाही. आणि मन कमालीचं अस्वस्थ होतं. हे सगळं बहुतांश वेळी नकारात्मकतेकडेच झुकणारं असतं.
माणसाचं मन मोठं विचित्र आहे. ते प्रथम नकारात्मक विचारच करतं. सकारात्मक बाजू किंवा वेगळा दृष्टीकोन त्याच्या लक्षातच येत नाही. उदाहरणार्थ. अगदी रोज भेटणारी बोलणारी मैत्रीण जर एखादा दिवस बोलली नाही. तर लगेच आपण गैरसमज करून घेतो. “माझं काही चुकलं का?, हल्ली ना ती तशीच वागते. नवीन मैत्रीण भेटली असेल तिला. तिने मुद्दामच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तिला माझं काही कौतुकच नाही.” असे एक ना अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात येतात.
आणि आपण अस्वस्थ होतो. पण तिची काही अडचण असेल इतर महत्वाची कामं असतील असा सहज विचार मनात येत नाही. याचं कारण तिने आपल्याशी बोलावं, आपल्या मनाप्रमाणे वागावं ही आपली अवास्तव अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की आपण सहज दुसऱ्याला दोषी ठरवतो. आणि अस्वस्थ होतो. असे छोटे-मोठे गैरसमज आपण कोणत्याही नात्यात सहज करून घेतो. आणि मनस्वास्थ्य बिघडवून घेतो. स्त्रिया तर अगदी क्षुल्लक कारणांवरून एखाद्या स्त्रीचा मत्सर करणे, तिच्याबरोबर स्वतःची तुलना करणे, तिच्याशी स्पर्धा करणे, एखाद्या हुशार सुंदर स्त्रीबद्दल उगाचच गाॅसिप करणे या अशा निरर्थक, काहीही उपयोग नसलेल्या गोष्टींमुळे स्वतःचं मनस्वास्थ्य बिघडवून घेतात.
आपलं आयुष्य जगताना आपल्याला अनेक माणसांशी संवाद साधावा लागतो. आपलं कुटुंब, नातलग, नोकरी व्यवसायातील सहकारी, रोज भेटणारी माणसे, मित्र-मैत्रिणी अशा अनेकांशी आपली सामाजिक, आर्थिक, भावनिक पातळीवर काही देवाण-घेवाण असते. पण हे सगळे आपल्याच अपेक्षेनुसार घडत राहावं अशी अपेक्षा करणं चूक आहे. याने फक्त अपेक्षाभंगाचे दुःख पदरी येतं. यातूनच निद्रानाश, नैराश्य, अतिविचार, अतिचिंता यासारखे मानसिक आजार जडतात. आणि हेच अनेक शारीरिक आजारांचे ही कारण ठरतात.
एक व्यक्ती, एक माणूस म्हणून आपण गुणदोषांसकट बनलेलो आहोत. कोणीही 24 तास चांगलं, छान छान वागू शकत नाही. प्रेम, आदर, कौतुक, आपुलकी, माया, वात्सल्य या भावनां बरोबरच राग, रुसवा, उदास वाटणे, निराश वाटणे, कधी मत्सर वाटणे या ही प्रखर भावना आहेत. आणि त्या व्यक्त होतातही. पण योग्य प्रकारे, योग्य वेळी, आणि योग्य काळासाठी त्या व्यक्त झाल्या तर त्रास होत नाही. एखादी छोटीशी गोष्ट मनाला लावून घेऊन जर आपण एखादं नातं कायमस्वरूपी तोडत असून तर मात्र आपलं मन आजारी आहे. अशावेळी नेमकं काय करावे? मनाचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी तुम्हीं अनेक गोष्टी करू शकता. कशा ते पाहू.
१) सर्वप्रथम एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर संबंधित व्यक्तीशी समोरासमोर सुसंवाद साधून तातडीने मनातील गैरसमज दूर करावेत.
२) कोणत्याही प्रसंगात धीराने, संयमाने वागणे अपेक्षित आहे. घिसाडघाईने, रागाने कोणताही अंतिम टोकाचा निर्णय घेऊ नये.
३) संवाद साधताना अतिशय शांतपणे, मुद्देसूदपणे आपले म्हणणे योग्य प्रकारे मांडावे ज्याने प्रश्न सोडवायला मदत होईल.
४) तुमच्याकडून जर चूक झाली असेल तर स्वीकार करून स्वतःला दोष न देता माफ करायला शिका. कोणतेही गिल्ट घेऊन वागू नका. तुम्ही माणूस आहात रोबो नाही.
५) समोरची व्यक्ती मनाविरुद्ध वागली असेल तरी तिला माफ करा. याने तुमचे मन मोकळे होते. तो विषय तिथेच संपतो.
६) पूर्वग्रहदूषित कोणतेही मत, गैरसमज कोणाही व्यक्तीविषयी बनवू नका. याने फक्त तुम्हांला मानसिक त्रास होतो.
७) मुळात कोणाकडूनही खूप अवास्तव अपेक्षा करू नका.
८) “रिकामं मन हे सैतानाचं घर असतं.” अशी एक म्हण आहे. त्यामुळे स्वतःला सतत चांगल्या कामात, एखाद्या आवडत्या छंदामध्ये गुंतवून घ्या.
९) भूतकाळातील घटनांमध्ये अति रमू नका. भूतकाळ कधीच परत येत नाही. त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा अतिविचार टाळा.
१०) स्वतःच्या चांगल्या कामासाठी स्वतःला शाबासकी द्या. स्वतःचे कौतुक करा. दुसर्यांचेही मनमोकळेपणाने कौतुक करायला शिका.
११) मनातील विचार कागदावर उतरवल्याने भावनांचा निचरा होतो. नियमित लिहिण्याचा सराव करा.
१२) स्वतःच्या विचारांचे नियोजन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा. तुमच्या मनस्थितीचा दोष दुसऱ्यांना देऊ नका.
१३) जसं मी नेहमीच आग्रहाने सांगते ध्यानधारणा यासारखा अचूक उपाय दुसरा कोणताही नाही. दिवसातून किमान दहा मिनीटे डोळे मिटून स्वस्थ, शांत बसा.
१४) मनाला आनंदी ठेवण्याचे तुमचे मार्ग शोधा. मग मित्र-मैत्रिणींना भेटणे, गप्पा मारणे, सहलीला जाणे, आवडीचे छंद जोपासणे अशा गोष्टींनी तुम्हीं स्वतःला निर्भेळ आनंद देऊ शकता.
१५) एखाद्या व्यक्तीकडे, प्रसंगाकडे, घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वास्तववादी आणि लवचिक ठेवा.
तुमच्या मनाचे आरोग्य, आनंद हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. कोणाच्याही बोलण्यावर, वागण्यावर, कृतीवर तुमचा आनंद अवलंबून नाही हे लक्षात घ्या. वर्तमानातील हा क्षण फक्त आपला असतो. तो भरभरून आनंदाने जगण्यासाठी स्थिर, शांत, स्वस्थ मन ही आपली जबाबदारी आहे. मग आज पासून मानसिक सकारात्मक आणि वास्तववादी बदलांना सुरुवात करणार ना!! माझ्या शुभेच्छा…..
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Khup chan
खुप छान
Nice
खूपच छान
perfect