मन मारून जगण्याची सवय झाली की सगळ्या आनंदी भावना नाहीशा होतात.
अपर्णा कुलकर्णी
जयंता नेहमीच्या सवईप्रमाणे संध्याकाळी फिरायला आले होते. जयंत काका त्यांच्या फिरण्याचा नियम कधीच चुकवत नसतं. मग वेळ सकाळची असो किंवा संध्याकाळची. रोजचे फिरणे ठरलेले. त्यांच्या या नेहमीच्या सवईमुळे त्यांचा पाच सहा मित्रांचा मस्त ग्रुप तयार झाला होता. आता जयंत काका मुळे सगळेच फिरायला येत असत. एका कठड्यावर बसून निवांत गप्पा मारायच्या,मित्रांच्या सहवासाचा आनंद घ्यायचा आणि नंतर रात्री आपापल्या घरी निघून जायचे हे ठरलेलं गणित होते.
आज जयंत काका गप्प गप्प होते. सुरुवातीला त्यांनी हसू चेहऱ्यावर आणून त्यांचा पडलेला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा खास मित्र प्रतापच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही. गप्पांचा ओघ सरला तसे सगळे आपापल्या घरी निघाले म्हणून जयंत काका पण निघाले तेवढ्यात प्रताप म्हणाला, अरे जयंता आज माझ्या घरावरून जातोस का ?? फारतर पाच मिनिटांचा फरक पडेल तेवढेच पाय मोकळे होतील तुझे. जयंत काका तयार झाले आणि गप्पा सुरू झाल्या.
बोलता बोलता प्रतापने काकांच्या उदास असण्यामागे काय कारण आहे ते विचारले तरीही काका सांगायला तयार होईनात तेंव्हा मग प्रताप म्हणाला ठीक आहे मीच तुझ्या घरी येऊन तुझ्या मुलाला आणि सुनेला विचारतो. मग मात्र काका घाबरले आणि म्हणाले, काय रे प्रताप घाबरवणार आहेस का मला ?? तुला माहिती ना माझ्या घराची परिस्थिती. तुझ्या पासून काही लपले आहे का ?? रादर मला तुझ्यासमोर काहीच लपवता आलेच नाही.
कोणत्या ना कोणत्या प्रकारे तू वदवूनच घेतोस माझ्या कडून. हो ना ?? तरीही सरळ सरळ का बोलत नाहीस ?? मला इकडून तिकडून का विचारायला भाग पाडत असतोस जयंता, पटकन सांगून मोकळा होत जा रे प्रताप म्हणाला. अरे प्रताप रोजचे मडे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली आहे माझी. त्यामुळे आता मलाच सांगायची लाज वाटत आहे, पण तुला ऐकून कंटाळा आला नाही का ?? जयंताच्या या बोलण्यावर प्रताप म्हणाला मी मरेपर्यंत असे काहीही तुला बोलणार नाही मग तर झाले. आता सांग लवकर काय झालं ??
अरे माझी पेन्शन खूपच मोजकी आहे त्यात माझे दवाखान्याचे सगळे माज मलाच करावे लागते. अधून मधून पिंटू सतत कशाला ना कशाला पैसे मागत असतो. परवा चष्मा खराब झाला तर मीच तो दुरुस्त करून आणला. मुलगा आणि सून कशातच लक्ष घालत नाही. आज येताना सूनबाईने तिची काही औषधे आणायला सांगितले होते पण तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून मी तिला पैसे मागितले तर त्यावरून सून तर बोललीच पण मुलगा पण तोंड टाकून बोलला. काय करावे कळत नाही रे प्रताप.
तुमच्या सारखे चार मित्र आयुष्यात आहेत म्हणून कसातरी जगतो आहे नाहीतर मागेच मरून गेलो असतो रे, काकांच्या डोळ्यात पाणी तर कंठ दाटून आला होता. प्रतापने सर्वतोपरी समजावले आणि दोघेही आपापल्या घरी गेले.
कसे बसे चार घास खाऊन जयंत काका झोपले. पण काही केल्याने त्यांना झोप येईना. आम्ही कधीच तुम्हाला काही मागत नाही, कधी चुकून काही मागितले तर तुम्ही देत नाही, हे मुलाचे बोलणे त्यांना असह्य झाले होते. ते उठले आणि शारदा ताईंच्या फोटो समोर उभे राहिले आणि म्हणाले, आजवर माझ्या पेन्शनचा पै ना पई मी सूनेसाठी, नातववासाठी आणि मुलासाठी खर्च करत आलो आहे शारदे, तुला तर माहीतच आहे.
सुरुवातीला आपल्या पोराला पगार कमी होता आणि सूनबाईना त्याच्यासमोर हात पसरावे लागू नये म्हणून मीच तिला पैसे देत होतो, पिंटूला सायकल,खेळणी मीच घेत होतो मुलाचा पगार कमी होता म्हणून घरखर्च मीच करत होतो ना शारदे. आठवतंय ना तुला ?? पण आज, आज मात्र मुलाने असे बोलून माझ्या मनावर घाव घातले ग शारदे. माझ्याच घरात पाहुण्यासारख राहतोय मी. कोणत्या वस्तूला हात लावण्याची परवानगी नाही ,
एखादा निर्णय घेऊ शकत नाही, कसे बसे दोन वेळा जेवण आणि चहा मिळतो त्यासाठी पण खूप काही ऐकून घ्यावं लागतं शारदे, माझा दवाखाना दुखणं भान सगळं माज मीच करतो अशा वेळी चार शब्द आधराचे नसतात की कधी कोणी जवळ बसून चौकशी करत नाही. तू मला सोडून निघून गेलीस पण तुझ्या मागे माझे काय हाल होतात बघतेस ना ?? तुझ्या सोबतच मी पण जायला हवे होते शारदे आता जगणं असह्य झालं आहे.
काही दिवस असेच निघून गेले. सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून राहायचे ठरवले तरी रोजचा अपमान कितीही केला तरी कुठेतरी मनाला टोचत होता. आज जयंत काका नेहमीच्या कट्ट्यावर आले होते पण त्यांचा एकही मित्र तिथे नव्हता. त्यांना आश्चर्य वाटले. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. त्यांनी काही मित्रांना फोन लावला पण कोणीच उचलला नाही अगदी प्रतापने पण नाही. त्यामुळे निराश होऊन काका जायला वळले तेवढ्यात सगळ्या मित्रांनी एकत्रित ओरडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी केक आणि त्यांच्या आवडीचे मोदक पण आणले होते. सगळ्या मित्रांनी मिळून त्यांच्या ग्रुपचा एक छान फोटो ही त्यांना भेट दिला होता. पण उगाच खोटे हसू चेहऱ्यावर आणून काका वेळ मारून नेत होते. प्रताप त्यांच्या जवळ येत म्हणाला, अरे दोस्ता आजचा दिवस तुझा आहे, निदान आज तरी सगळं विसरून मनापासून हस की. काल सुनेने सांगूनही भाजी आणायला विसरल्यामुळे सकाळी सकाळी वाढदिवसाच्या दिवशी सुनेने केलेली फजिती जयंत काकांना आठवली आणि ते म्हणाले प्रताप मन मारून जगण्याची सवय झाली की सगळ्या आनंदी भावना नाहीशा होतात.
माझेही तसेच काहीसे झाले आहे. माझे शरीर आणि मन मृत्यूची आतुरतेने वाट पहात आहे, मला माझ्या शारदेकडे जायचे वेध लागले आहेत. इथे तुम्ही चार आनंदाचे क्षण पदरात टाकले त्याबद्दल खरंच आभारी राहीन पण पुन्हा मला इथून त्याच खाईत जायचे आहे हे सत्यही नाकारता येत नाही ना रे.
