Skip to content

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात का रमते?

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात का रमते?


अपर्णा कुलकर्णी


अश्विनी जरा चहा आणतेस का ?? पेपर वाचत वाचत विनायकरावांनी विचारले. टाकलाच होता, येतच होते घेऊन हातात चहाचा कप घेऊन येत अश्विनी ताई म्हणाल्या. बरं.. सवय झाली आहे ना मधल्या वेळेचा चहा घेण्याची. इतक्या लवकर कशी मोडेल ? चहाचा कप हातात घेत विनायकराव म्हणाले. पण सकाळची तुम्हा सगळ्यांची धावपळ सुरू असते, अनंताचा डबा, त्याच्या बायकोचा डबा आणि अद्वयची शाळेची घाई, तुझी पूजा. त्यात माझे कुठे मी सांगत बसू म्हणून जरा उशिराने चहा घेतो. पण चहा लागतोच अश्विनी. आणि हे काय एकच केप का आणलास ?? तू घेत नाही का ??

नाही हो. आजकाल थोडे जरी कमी जास्त झाले पोटाला तर सहन होत नाही. आधी सवय होती चहाची. पण आता चहा घेतला की पित्त होते आणि गोळी घ्यावीच लागते. त्या पेक्षा न घेतलेलाच बरा अश्विनी ताई म्हणाल्या.

चला तुम्ही चहा घ्या मी दुपारच्या जेवणाचे बघते. अग अश्विनी आता तर सगळे ऑफिसला निघून गेले, दुपारचे आपल्यापुरते काहीतरी असेल की, तू कशाला आता नवीन काही करत बसतेस ? विनायकराव म्हणाले.

अहो आज उठायला जरा उशीर झाला सगळ्यांनाच त्यामुळे सूनबाईने त्यांच्या डब्या पुरतेच जेवण बनवले. ती म्हणत होती करते म्हणून पण मीच तीला म्हणाले राहूदे ग, मी घरातच तर असते करेन आमच्या दोघांपुरते.

तुझ हे नेहमीचच आहे अश्विनी. आठवड्यातून चार वेळा तर असेच होते, आणि ती म्हणत होती ना करते म्हणून तर कर म्हणायचे. तुला खूप सवय आहे सगळंच अंगावर घेण्याची. नाराजीच्या सूरात विनायकराव बोलले आणि पुन्हा पेपर वाचत बसले.

दुपारची जेवणं झाली आणि अश्विनी ताई जरा आडव्या झाल्या. हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे पांघरून घेऊन त्या पडल्या होत्या. विनायकराव तिथेच शेजारच्या सोफ्यावर बसून होते. दुपारी झोपण्याची त्यांना सवय नव्हतीच. रात्री नऊच्या ठोक्याला झोपायचे आणि पहाटे पाचच्या ठोक्याला उठायचे हा नित्यक्रम आजवर कधीच मोडला नव्हता. पण आता अश्विनी ताईंनी साठी ओलांडली होती. त्यामुळे त्या दुपारी जरावेळ आराम करत असत.

शिवाय घरातील कामे करावीच लागत असत त्यामुळे त्यांना थकायला होई. पण आज त्यांना झोप येत नव्हती, सतत कुस बदलत होत्या, जरा अस्वस्थ वाटत होत्या. विनायकराव तिच्या बेडवर बसले आणि त्यांच्या अंगावरचे पांघरून नीट करत म्हणाले, काय ग आशू झोप लागत नाही का आज तुला ? नाही हो, जरा थंडी वाजत आहे आणि अंग पण दुखत आहे. कन्हत त्या कसेतरी बोलल्या. पाय चेपून देऊ का तुझे ?? म्हणत त्यांनी त्यांच्या अंगावरचे पांघरुण बाजूला केले तर अश्विनी ताई तापाने फणफणत होत्या.

अग आशू तुला खूप ताप आहे. थांब मी अनंताला नाहीतर सुनबाईना फोन करतो. त्यांनी फोन केला आणि म्हणले, अरे अनंता तुझ्या आईला खूप ताप आला आहे तू येशील का ?? सॉरी बाबा पण आता माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे तुम्ही अन्वितला फोन करून बघा ती येते का, पुढे विनायकराव काही बोलणार इतक्यात त्याने फोन ठेवला.

अहो राहुद्या कामात असतील ते. त्यांना उगाच फोन करून कशाला सांगत बसताय. अग आई बापासाठी यांना कामं बाजूला ठेवता येत नसतील तर यांचा आपल्याला काय उपयोग ?? विनायकराव चिडले होते. मी सूनबाईना फोन करून बघतो, हॅलो सूनबाई अग तूझी सासू तापाने फणफणत आहे येशील का जरा वेळ ?? बाबा मी खरंच आले असते पण मला खूप काम पडले आहे आणि आजच पूर्ण करून द्यावे लागणार आहे. प्लीज तुम्हीच बघता का आईंकडे ?? विनायकरावनी आता फोन ठेवला आणि रागात बाहेर पडले.

कुठे गेले आहेत डोक्यात राग घालून देवास ठाऊक. इकडे अश्विनी ताई अंथुरणात पडून स्वतःशीच बोलत होत्या. तेवढ्यात विनायकराव आले आणि म्हणाले अश्विनी बघ कोण आले आहे ?? त्यांनी थोडे उठून पाहिले तर विनायकराव डॉक्टरांना घेऊन आले होते. डॉक्टरांनी तपासले आणि गोळ्या दिल्या.

गोळ्या घेऊन अश्विनी ताई झोपल्या होत्या. विनायकराव तिच्या शेजारीच बसून होते. २-३ तासांनी त्या उठल्या आणि त्यांनी पाहिले तर विनायकराव सोफ्यात नव्हते. अश्विनी ताई उठून बसल्या तर विनायकराव तिच्यासाठी चहा घेऊन आले होते. त्या म्हणाल्या अहो मला आता बराच फरक पडला आहे. तुम्ही उगाच हे सगळं करताय.

असुदे ग. रोज तू करतेस आज मी केलं म्हणून कुठे बिघडल ?? दोघेही चहा घेत होते. आशू तुला आठवतंय का ग ? पूर्वी मी तुझ्यासाठी दामू आण्णांच्या गाड्यावरची भेळ आणि जिलेबी घेऊन यायचो, तुला खूप आवडायची म्हणून. तुला दर रविवारी फिरायला घेऊन जायचो. समुद्राच्या लाटांशी तू किती खेळत होती. आपण हातात हात घेऊन त्या लाटा बघत बसायचो अगदी तासन् तास. येताना तुला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा घ्यायचो आणि स्वतःच्या हाताने तुझ्या केसात मळायचो. तेंव्हा केवढी लाजत होतीस तू ?? खूप छान दिवस होते नाही ते ??

हम खरंय. खूपच सुंदर काळ होता तो. त्या वेळी नव्हते हे मोबाईल, इंटरनेट असलं काही. पण एकमेकांना काय हवंय हे सगण्यासाठी या साधनांची आणि शब्दांचीही गरजच पडत नव्हती. सगळे आपसूकच समजत होते. दर महिन्याला तुमचे आणि माझे आई वडील भेटायला येत. नाहीतर मग पत्र पाठवत. खुशाली काळवत असत. त्या काळी प्रेम होते, नात्यात आपलेपणा, आदर होता. आता मुलाने ताप आला हे कळूनही साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. आता आल्यावर पाच मिनिट माझ्याजवळ बसेल आणि करायची म्हणून चौकशी करेल. हो ना. त्याच्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या आपल्या दोघानाही. पण ते बोलून दाखवले तर कर्तव्यच होतं आई बाबा ते तुमचं. असं म्हणतात ही मुलं. तरुणपणात काही वाटत नव्हते ग पण आता वय उताराला लागले की जाणीव होते जुन्या गोष्टींची. त्यामुळेच असेल कदाचित
वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!