मन कठोर करूनही भावनिक प्रसंगात खूप त्रास का होतो?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“सुशीला अग चल, तयारी कर लवकर, आपल्याला वेळेत पोहोचायला हवं. तिथे जाऊन पण किती काय काय करायचं आहे. भटजी येणार आहेत.” “हो वहिनी येते. चला तुम्ही व्हा पुढे. मला हे काही सामान भरून घ्यायचं होत ते झालं की येते.” अस म्हणत सुशीला परत मागे फिरून उगाच काहीतरी भरल्यासारखं करू लागली. तेव्हा उषा म्हणजेच तिची वहिनी तिच्या जवळ गेली आणि तिने तिला आपल्याकडे फिरवले व पाहिले. सुशीलाचे डोळे सुजले होते. त्या सुजलेल्या डोळ्यांकडे पाहून समजत होत की ती रडली होती. एरवी सुशीला आणि रडणं यांचं समीकरण बसणं कठीण काम होत.
समोरचा माणूस एकवेळ शरणागती पत्करेल पण सुशीला नाहीच. मनाने भक्कम, प्रसंगी कठोर आपल्या मताशी ठाम अशी ती होती. साहजिक होत, लवकर लग्न झालं. काही वर्षांतच नवऱ्याची साथ सुटली. पदरात दोन लहान मुलं; अश्या परिस्थितीत आयुष्य काढण म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. सुशीला काही अगदी आधीपासूनच अशी नव्हती. या सर्व घटनांनी तिला स्वतःमध्ये बदल करावे लागले. कारण मुलांना ती फक्त एक आई म्हणून नाही तर बाबा म्हणून पण सांभाळणार होती.
नवरा गेल्यावर भावाने खूप सांगितल, आमच्याकडे येऊन रहा. तू काही आम्हाला जड नाहीस, हे तुझच घर आहे. पण सुशिलाच्या मनाला ते कधी पटलं नाही. ज्याच्या हातात हात धरून ती या घरी आली होती तेच ती घर होत. आणि भावाने कितीही सांगितल तरी त्याचा पण संसार होता, जबाबदाऱ्या होत्या. तिला त्यात भर करायची नव्हती. म्हणून तिने स्वतःच सर्व सांभाळायचं ठरवलं.
दोन्ही मुल लहान होती, त्यांच्या शिक्षणापासून सर्व सुरुवात होती. पण ती खचली नाही. स्वतःच जे काही शिक्षण झाल होत त्या जोरावर तिने नोकरी मिळवली. त्यातून येणाऱ्या पैश्यावर ती घर चालवू लागली. घरातली कामं करून मुलांना शालेत पाठवून ती स्वतः कामावर जायची. या सगळ्यात तिची खूप दमछाक व्हायची. कधी कधी स्वतः ला दोन घास खायला देखील वेळ मिळायचा नाही. तरी तिने सर्व केल. त्यात रोज जे काही नवनवीन विचित्र अनुभव यायचे ते यायचेच. एकटीच बाई सर्व घर चालवते, एकटी मुलांना घेऊन राहते. लोकांच्या नजरा तिला काही कमी टोचल्या नाहीत. पण हा त्रास हे दुःख तिने मुलांसमोर दाखवून दिलं नाही.
त्यांनी आपल्या आईला कधी रडलेल पण पाहिलं नाही. कारण ती तशी त्यांच्यासमोर कधी व्यक्त झालीच नाही. तिला त्यांच्यासमोर कमकुवत पडायचं नव्हत. उलट ती बऱ्याचदा त्यांच्याशी कठोरपणे वागे. मुलं रुसून बसत. म्हणत, टीव्ही मध्ये वगैरे जशी आई असते तशी तू नाहीच आहेस. ती आई मुलांशी कशी प्रेमाने वागते, त्यांचे खूप लाड करते, हवं ते सर्व देते.
पण तू, तू आमच्यासोबत राहत पण नाहीस. आमच्यासोबत खेळत नाहीस. नुसती ओरडत राहते. हे ऐकून तिला किती दुःख व्हायचं ते तिचं तिला माहित. पण ती सांगणार तरी कोणाला? तिला खूप वाटायचं मुलांसोबत वेळ घालवावा, एक दिवस कामावर न जाता त्यांच्यासोबत राहावं, त्यांना कुठेतरी फिरायला न्याव. पण अस करण तिला शक्य नव्हत. सर्वच गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या तर ते आयुष्य कसलं?
मुलं मामाकडे गेल्यावर तिची तक्रार करत. तेव्हा तो त्यांची समजूत काढे. पण ते त्यांचं वय नव्हत की त्यांना सर्व गोष्टी समजतील. आणि नंतर नंतर तिच्या याच स्वभावाची त्यांना सवय झाली. आपली आई म्हणजे एकदम गंभीर कठोर स्वभावची बाई. तिला हसणं, आनंदी राहणं यासारख्या गोष्टी माहीत नव्हत्या.
अगदी एखाद्या मुव्ही मध्ये काही इमोशनल दाखवल तरी तिला काही वाटणार नाही असा त्यांचा समज झाला होता. अजय तिचा मुलगा तर एकदा इतक्या सहजपणे बोलला “आई दगड तरी एखाद्या वेळी काहीतरी करेल पण तू त्याच्या पुढची आहेस.” त्यांना कल्पना नव्हती त्यांची आई कोणकोणत्या गोष्टीतून गेली होती.
अशी ही सुशीला जिने इतकी वर्ष स्वतःला एक कठोर स्त्री म्हणून दाखवलं, तशीच ती राहिली. आज मात्र मुलीच्या लग्नात तिच्या भावनांचा बांध फुटला. तिला राहवलं नाही. ही मुल अगदी तान्ही होती तेव्हा तिने घरातून बाहेर पडून त्यांच्यासाठी कष्ट केले होते. एक आई म्हणून तिने त्यांचा भविष्य उज्वल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तस झालं देखील.
दोन्ही मुल चांगली शिकून मोठी झाली. पण या सगळ्यात आई मुलाचं जे एक भावनिक नातं असत ते कधी तयार होऊ शकल नाही. तितका तिला वेळच देता आला नाही. त्यामुळे मुल जसं जशी मोठी होतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे छोटे छोटे बदल, ते milestones ती कधी पाहू, अनुभवू शकली नाही.
मुलांना पण आईसोबतचा तो वेळ मिळाला नाही. पण तिला त्यावेळी तस करण भाग होत. आता जेव्हा शरयू तिची मुलगी सासरी जात होती तेव्हा मात्र तिला या सर्व गोष्टी आठवल्या. जरी तिने मुलांना सुरक्षित वातावरणात वाढवलं, त्यांना मोठ केलं तरी या सर्व गोष्टी पण होत्या ज्या तिने आणि मुलांनी पण गमावलं. त्या त्या वेळी ही सल मनात होतीच पण आता ते दुःख एकाच वेळी बाहेर पडल आणि ती रडु लागली.
माणसाच्या आयुष्यात अनेकदा अश्या घटना घडतात, प्रसंग घडतात ज्यातून त्याला स्वतः मध्ये बदल हे करावे लागतात. त्याला कारण असतात. आतून कितीही भावनिक असलो, नाजूक असलो तरी कठोर व्हावं लागतं कारण त्यातूनच गोष्टी नीट होणार असतात. त्या परिस्थितीत नाजूक राहून चालणार नसत.
पण तरीही अशी एक वेळ येतेच जेव्हा अगदी कितीही कठोर माणूस असला तरी तो भावनिक होतो, त्याला त्रास होतो. याच कारण हेच आहे की आपण माणसं आहोत, आपल्याला मन आहे, भावना आहेत. मेणबत्ती कितीही मजबूत असली तरी अशी एक वेळ येतेच जेव्हा ती वितळते. तसच माणूस कितीही खंबीर कठोर असला तरी आयुष्यात तो पण काही प्रसंगात भावनिक होणार, अस होण हेच माणूसपणाच लक्षण आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

