मन अशाच गोष्टींकडे का आकर्षित होतं, जी गोष्ट कायम चौकटी बाहेरचीच असते.
अपर्णा कुलकर्णी
विशाखाचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. तिचा नवरा शेखर पदवीधर होता. बीकॉम झाला होता आणि विशाखा फार काही शिकली नव्हती. तिने घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू केली होती. तिच्या घरात सासू, सासरे आणि त्यांचा एक मुलगा अभय असे कुटुंब रहात होते. सासू, सासरे वयाच्या मानाने थकले होते, दोघांच्याही तब्येतीच्या तक्रारी सतत चालूच असतं. त्यात विशाखाचे सासरे शुगर पेशंट असल्याने त्यांना वेळेवर गोळ्या औषधे, खाणे पिणे, दर महिन्याला दवाखान्यात घेऊन जाणे हे सगळेच विशाखाल करावे लागत असे. शेखरची नोकरी बारा तासांची होती. सकाळी आठला गेला की रात्री आठलाच येत असे. कधी कधी ओव्हर टाईम पण करत असे. त्यामुळे घरातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या विशाखावर पडत असत.
त्यांचा मुलगा अभय पाहिलीत गेला होता. त्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती. अभय खूप समंजस आणि गुणी मुलगा होता. खूप लहान वयात त्याला बरीच समज होती. आजवर कधीही कोणत्याच गोष्टीचा हट्ट त्याने केला नव्हता. अभ्यासात त्याला चांगलीच गती होती. त्याच्या समंजस पणाचा हेवा वाटे नेहमीच बाकीच्यांना. त्याच्यातला इतका समंजस पण बघून विशाखाला भरून येत असे. त्याच्या शाळेचे बस भाडे, युनिफॉर्म, वह्या पुस्तकं, शाळेची फी सगळाच व्याप वाढला होता. शेखरच्या जेमतेम पगारात घर भागत नसे. त्यामुळे विशाखा टिफीन सर्व्हिस देत होती. पण शेखर निर्व्यसनी होता, समंजस होता. त्याचा स्वभाव खूपच प्रेमळ होता. आजवर कधीही विशाखाला मोठ्या आवाजात बोलला नव्हता तो.
पण विशाखा ची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. मिळकत रुपया असेल तर खर्च चार रुपय अशी अवस्था झाली होती. कितीही नाही म्हणाले तरी आर्थिक विवांचनेमुळे विशाखा आणि शेखरमध्ये थोडेफार वाद होत असत. शेखर दमून भागून घरी येत असे. घरात आल्यावर जेवण करून कधी जमिनीला पाठ टेकतो असे त्याला वाटत असे. विशाखाला आणि शेखरला एकमेकांसोबत घालवण्यासाठी चार क्षण ही मिळत नव्हते.त्यांचे घर भाड्याचे होते आणि खूप छोटे होते. दोनच खोल्या होत्या त्यात. कारण मोठ्या घराचे भाडे परवडणारे नव्हते. त्यामुळे निवांत बसून बोलताही येत नव्हते. आपण रात्रीच्या वेळी शेखर सोबत निवांत वेळ घालवावा असे विशाखा ला नेहमी वाटे पण तसे होत नव्हते. पण यात दोघांचीही चूक नव्हती, दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबरच होते. चुकीची होती परिस्थिती.
एकदा विशाखा भाजी आणायला गेली असताना तिला तिची एक मैत्रीण भेटली. दोघीही रस्त्यावरच गप्पा मारत बसल्या होत्या. रस्त्यावरचे लोक आपल्याकडेच पहात आहेत हे लक्षात आल्यावर दोघी जरा बाजूला झाल्या आणि एका निवांत ठिकाणी बसल्या. तिची मैत्रीण नीता खूपच श्रीमंत होती. तिने विशाखाल सांगितले आत्ताच माझ्या नवऱ्याचे प्रमोशन झाले आहे त्याचा पगार पण खूप वाढला आहे, त्याने मला गाडी गिफ्ट केली आहे, काही महिन्यांपूर्वी आम्ही नव्या घरात शिफ्ट झालो. ती सगळे सांगत होती, तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
तिच्या अंगावरची साडी, मोजकेच पण अगदी उठालून दिसतील असे दागिने, हातात महागडा मोबाईल सगळेच विशाखा आवाक होऊन पहात होती. तिच्या तुलनेत विशाखा कुठेच बसत नव्हती, कशातच बरोबरी करू शकत नव्हती. विशाखाचे घर भाड्याचे होते, तिच्या नवऱ्याचा पगार अगदीच जेमतेम होता, तिच्या नवऱ्याने खरी काय खोटी गाडीही कधी मुलासाठी आणली नव्हती आणि तिच्या साड्या आहेरात लोकांनी दिलेल्या होत्या, त्याच ती नेसत होती.
विशाखा नको म्हणत असतानाही नीताने तिच्या गाडीत विशाखाला तिचे नवे घर दाखवण्यासाठी नेले. नीताचे घर खूपच सुंदर आणि आलिशान होते. विषाखाचे डोळे फिरले इतके सुंदर घर होते ते. नीता घरातील एक एक वस्तू, एक एक रूम दाखवत होती. नीताने नंतर विशाखाला गाडीतून घरी सोडले होते. आपले घर दाखवण्याची तिला लाज वाटत होती म्हणून घराच्या दूरच विशाखाने गाडी थांबव्हायला सांगितली होती. आज घरात तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. काहीही करून आज शेखर सोबत बोलायचे असे तिने ठरवले होते.
शेखर घरी आला, जेवणं आटपली आणि तो अंथरुणावर पडणार इतक्यात विशाखाने विषय काढून बोलायला सुरुवात केली. तिच्या मैत्रिणी सोबत मारलेल्या गप्पा तिने आधी सांगितल्या आणि हळूच आपणही एक घर घेऊया का ?? असे विचारले. अग आपली परिस्थिती तुझ्यापासून लपून आहे का ?? बघतेस ना सगळं ?? मग आपल्याला हे शक्य नाही हे समजत नाही का तुला ?? तसे नाही हो, परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मुलासाठी हक्काचे घर असावे असे मला वाटते, मग ते छोटे असले तरीही चालेल पण असायलाच हवे. कसे होईल घर त्याला?? घरात आई, बाबा तब्येती वरून सतत कुरबुरत असतात, अभयच्या शाळेचा खर्च आहेच, वरचेवर तो वाढतच जाणार, हेच भागवताना तारांबळ होते. त्यात घराचे कुठे बघत बसू. मला ते जमणार नाही आणि तू ही हे खुळ डोक्यातून काढून टाक. अभय शिकून मोठा होईल तेंव्हा तो घेईल घर.
शेखरचे हे बोलणे ऐकून विशाखा रात्रभर रडत राहिली. नीताचे नवे घर तिच्या डोळ्यांपुढून हलत नव्हते. तिच्या जगण्यात आणि विशाखाच्या जगण्यात जमीन आसमानचा फरक होता. कितीही वाटले तरीही ती हे स्वप्न, तिच्या इच्छा पूर्ण करू शकणार नव्हती. आपले मन अशाच गोष्टींकडे का आकर्षित होतं, जी गोष्ट कायम चौकटी बाहेरचीच असते ?? हा प्रश्न मात्र तिला भेडसावत होता.
आपलं आयुष्य सगळ्या सुख सुविधांनी युक्त असावे असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यात चुकीचे काहीच नाही. सुंदर आयुष्याची स्वप्न बघणं आणि त्यानुसार जगणे सगळ्यांचाच हक्क आहे. पण तरीही आपण आपल्या आयुष्यात किती उंच उडी घेऊ शकतो, कोणती स्वप्न पूर्ण करू शकतो आणि कोणती नाही. याचा अंदाज सगळ्यांनाच आलेला असतो. स्वप्न बघणे चुकीचे नक्कीच नाही पण अवाजवी कधीच पूर्ण न होऊ शकणाऱ्या अपेक्षा ठेवणे नक्कीच चुकीचे आहे. आपल्याकडे जर सायकल असेल तर आपण बाईक वरून जाणाऱ्याकडे बघतो आणि दुःखी होतो,
बाईक असेल तर फोर व्हिलर वरून जाणाऱ्याकडे बघतो आणि दुःखी होतो, फोर व्हीलर असेल तर फ्लाईटने जाणाऱ्याकडे बघून दुःखी होतो. हे का होते कारण आपल्या गरजा आणि अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी अशी यादी वाढतच जाते. त्यामुळे आपल्याकडे जर सायकल असेल तर चालत जाणाऱ्या लोकांकडे बघून आनंदी राहायला शिका. याचा अर्थ असा नक्कीच नाही की आपण मोठी स्वप्न बघायचीच नाहीत. नकीच बघायची पण अवास्तव पूर्ण न होऊ शकणाऱ्या अपेक्षा ठेवून दुःखी राहायचे नाही. आहे त्यात आनंद मानून जगायचे. जे नाही त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे आहे त्याकडे लक्ष द्यायचे म्हणजे त्रास कमी होतो आणि सगळेच छान वाटायला लागते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
