माझ्यासारखं कोणीच भोगलं नाही असं म्हणणाऱ्यांना पुढे आणखीन बरंच काही भोगाव लागणार.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कष्ट, त्रास, चढ उतार, वेगवेगळी आव्हाने कोणालाही चुकलेली नाहीत. ती सर्वांच्या वाट्याला असतात. पण आपल्याला मात्र आपलं दुःख, आपले भोगच मोठे वाटत असतात. आपल्याला अस वाटत असत की मी माझ्या आयुष्यात जितकं भोगलय ना तितकं कोणीच भोगलेले नाही. जेव्हा आपण त्रासात असतो, दुःख सहन करत असतो तेव्हा आपण स्वतःमध्ये गुरफटून जातो. इतके की आपल्याला स्वतःचाच त्रास मोठा वाटू लागत. आपलं एकंदरीत जग याच गोष्टीभोवती फिरत. आपल्याला
कुपमंडूकाची गोष्ट माहिती असेलच. कुप म्हणजे विहीर. अश्या त्या विहिरीत राहणाऱ्या बेडकाला ती विहीर म्हणजेच त्याच विश्व वाटत असतं. त्याला ही गोष्टच मान्य करायची नसते की याच्यापलीकडे देखील खूप मोठं जग आहे. केवळ तो त्या विहिरी बाहेर गेलेला नसतो, त्याने काही पाहिलेले नसत, अनुभवलेले नसत म्हणून त्याला वाटत असत की जे आहे ते इतकच आहे. त्यापलीकडे काही नाही. पण अस खरच असत का? नाही ना! त्या विहिरीच्या कितीतरी पटीने मोठ अस जग अस्तित्वात असत. फक्त त्याने नाकारलं म्हणून ते अवास्तविक होत नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी खूप भोगलं आहे, माझ्यासारखा त्रास कोणी कधी पाहिला नसेल अनुभवला नसेल तेव्हा ती नकळत बाहेरच्या जगाच अस्तित्व नाकारते. कारण आपण कितीही म्हटल की मी भोगलं तरी आपल्याला माहीत नाही इतकं दुसऱ्या कोणीतरी भोगलेले असू शकत. कोणाचं दुःख कमी म्हणणार आणि जास्त म्हणणार. मला शाळेत असताना पायी चालत जावं लागे, अक्षरशः उन्हाचे चटके खात मी शिकलो आहे.
कोणी शिकलं असेल का असे कष्ट घेऊन अस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दूर कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहिलेली आणि त्यामुळे एक दिशाहीन आयुष्य जगलेली व्यक्ती पण असू शकते. चार चार दिवस पाण्याशिवाय आम्ही राहिलो आहोत, त्या काळात लांबून पाणी आणून कसं तरी चालवून घेतलं. कोण करेल इतकं? अस जेव्हा वाटत तेव्हा असे काही प्रदेश जिथे वर्ष वर्ष पाणीच नसतं, दुष्काळाने माणसं मरणाच्या उंबरठयावर जातात त्यांचा विचार येतो का?
मी सून म्हणून घरात आले ना तेव्हा सर्वांनी मला नाकी नऊ आणले होते, खूप त्रास दिला होता. आता जरी वागणं बदललं असल तरी त्यावेळचं आठवून अस वाटत की आपण किती भोगल, सहन केलं. त्रासदायक गोष्ट आहे ही, पण अजूनही अशी काही घर आहे जिथे घराच्या त्रासाला, छळाला कंटाळून मुली जीव देत आहेत, अनेकदा त्यांना मारण्यात येत. ही परिस्थिती आहे, हे वास्तव आहे.
या विदारकतेची जाणीव आपल्याला आहे का? आमच्या आयुष्यात असा काळ आला होता की दोन वेळचे खायचं मुश्किल झालं होत, कसेतरी आम्ही दिवस काढले तेव्हा आपण रस्त्यावर फिरणारी ती लोक पाहतो का जी दोन घासासाठी वणवण फिरत असतात. ज्यांची मुल अपुऱ्या पोषणापायी कुपोषणाला बळी पडतात.
दिव्यांग माणसं ज्यांच्या डोक्यात असंख्य स्वप्न असतात पण शरीर मर्यादा निर्माण करत. त्यातूनही ती पुढे जातात. अनेक पालक आपल्या मुलांची तक्रार करतात की मुल अभ्यास करत नाहीत, ऐकत नाही, मस्ती करतात, मार्क कमी होत राहतात. पण ज्यांची मुल जन्मतः मतिमंद आहेत, ज्यांना वेगवेगळे, शारीरिक मानसिक आजार आहेत.
ज्यांना कदाचित आयुष्यभर कोणाच्या तरी आधाराची गरज असू शकते. त्यांच्या पालकांचे भोग कसे असू शकतील? संसारात संघर्ष निर्माण होतात, भांडण तंटे होतात, किती सहन करायचं असा विचार येतो तेव्हा जिला कदाचित दोन दिवसाचा संसार करायचं सुख मिळत नाही अश्या शहीद जवानाच्या पत्नीचं दुःख, तिचे भोग ते शब्दात मांडता येऊ शकतात का?
इथे कोणाच्या दुःखाला कमी लेखलं जात नाहीये. सर्वांना त्रास असतो, सर्वांचे त्यांचे असे अनुभव असतात. त्यातून त्याला जावच लागत. गोष्ट फक्त इतकीच आहे की आपण जेव्हा म्हणतो माझ्याइतक कोणी भोगलं नाही तेव्हा आपण हा विचार ही जाणीव ठेवली पाहिजे की माझ्याहून कितीतरी पटीने जास्त कोणीतरी भोगलेले असू शकत.
आणि आपण आतापर्यंत जे भोगलं आहे ते काहीच नसेल कदाचित आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी होणार असतील ज्या आपल्याला भोगायच्या असतील. दुसऱ्याबद्दलची ही जाणीव, हा विचार का करायचा आहे? कारण त्यातून आपल्याला समजेल की आपण म्हणतो तितकं हे भयानक नाही, आपण यातून बाहेर पडू शकत, याचा सामना करू शकतो आणि जेव्हा आपण हे मान्य करतो की आयुष्य हे अनिश्चित घटनांनी भरलेले आहे तेव्हा आपली येणाऱ्या गोष्टींचा सामना करायची तयारी, क्षमता वाढते. आपण त्यापासून पळ काढत नाही.
कारण हे आयुष्य आपण किती भोगलं याबद्दल नसून आपण त्यातून बाहेर कसे पडलो याबद्दल आहे. जग तुमच्या भोगाबद्दल सहानुभूती देईल पण त्यातून बाहेर पडून जागून दाखवलात तर तो एक आदर्श होईल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
