प्रेम, आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे, ही निसर्गाची देणगीच!
मेराज बागवान
व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे आपण जाणतोच. अनेक प्रकारची माणसे असतात.प्रत्येकाचे स्वभाव विभिन्न असतात.मते वेगळी असतात आणि दृष्टिकोन तर निराळाच असतो.काही जण खूप रागिष्ट असतात तर काही जण खूप गमतीशीर स्वभावाचे असतात. काही जण खूप शांत, अबोल , स्वतःच्या च आयुष्यात रमणारे असतात तर काही खूप बडबडे, समाजप्रिय असतात. आणि या सगळ्यात प्रेम, आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे, ही निसर्गाची देणगीच!
अशी आनंद देणारी , आपल्यावर भरभरून प्रेम करणारी व्यक्ती जगावेगळीच असते.कोणी नसले तरी आई-वडील ही एक अशी व्यक्ती आहे जी अपल्यावर नितांत प्रेम करीत असते आणि आपण नेहमी आनंदात राहावे हीच त्यांची आयुष्यभर इचछा असते. आई-वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही.त्यांच्यासारखे अपेक्षा विरहित प्रेम इतर जण करतीलच याची खात्री देता येत नाही. पण आई-वडीलांएवढे जरी प्रेम करता येत नसले , तरी देखील आपल्या आयुष्यात अशी काही माणसे असतात जी आपल्याला भरभरून प्रेम आणि फ़क्त आनंदच देत असतात.
कोणीतरी मित्र असतो.जो सदैव आपल्या अडी-अडचणीत आपल्यासाठी धावून येत असतो. आपली समस्या कधी त्याला सांगितली नाही तर हक्काने रागवत असतो आपल्याला.कुणी एक मैत्रीण असते, सदैव आपल्या आनंदासाठी झटत असते.आपले चांगले व्हावे , आयुष्य सुरळीत चालावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.आजकाल प्रत्येकाला समस्या आहेतच.पण स्वतः मोठ्या समस्येत असूनही इतरांना सदैव प्रेम आणि आनंद देणारी काही माणसे देखील असतात.आणि अशी माणसे आपल्या आयुष्यात असणे हे आपले नशीबच.निसर्गाची देणगीच जणू ती…
पण अनेकदा काय होते? आपण अशा माणसांकडे दुर्लक्ष करतो.पूर्वी इतरांच्या बाबतीत आलेल्या अनुभवावरून ,आपण अशा माणसांवर चटकन विश्वास ठेवत नाही. किंवा, ही व्यक्ती माझ्यासाठी इतके का करीत आहे म्हणून आपण त्या व्यक्तीवर शंका घेऊ लागतो. आजकाल विश्वासू व्यक्ती भेटणे खूप अवघड जरी असले तरी अशक्य देखील नाही.फक्त कोण अपल्यावर खरेच प्रेम करीत आहे किंवा खरा आनंद आपल्याला कोण देत आहे हे ओळखता आले पाहिजे.
आणि यासाठी माणसे वाचायला आली पाहिजे आणि वाचून समजून घेता आली पाहिजेत. कारण उगाच चांगल्या माणसांवर शंका घेणे किंवा समजून न घेता काहीतरी त्यांच्याबद्दल अंदाज बांधणे योग्य नसते. म्हणून आपल्या आसपास प्रेम आणि आनंद देणाऱ्या कोण व्यक्ती आहेत हे ओळखता आले पाहिजे.
रक्ताच्या नात्यात जेव्हढे प्रेम, आनंद मिळत नाही.तेवढे प्रेम बिन-रक्ताच्या नात्यात मिळू शकते.पण कधी कधी घरात देखील आई-वडिलांव्यतिरिक्त आपले भाऊ-बहीण, बायको किंवा नवरा, वहिनी, आत्या, दिर ही अशी काही नाती असतात ती देखील खरेच अपल्यावर नितांत प्रेम करीत असतात.आपल्याला जाणवू न देता स्वतः जुळवून घेत आपल्या आनंदासाठी झटत असतात. अनेकदा आपल्या हे लक्षात येत नाही.आणि आपण म्हणत बसतो, ‘माझ्यावर कोणीच प्रेम करित नाही, माझ्या आनंदाची कोणालाच काही फिकीर नाही’.
महत्वाचे काय?तर, ‘विश्वास’ आणि आपला ‘दृष्टिकोन’.आपण जसा विचार करतो तसे आपल्याला समोर चित्र दिसते.म्हणून नेहमी कोणताही अर्थ लावण्यापूर्वी , विचारपूर्वक अर्थ लावावा.आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती, आपण आनंद राहावे म्हणून नेहमी शांत राहतात.आणि आपणच त्यांना दोष देत बसतो की ,”माझ्याशी बोलत नाही ती/तो, माझ्यासाठी वेळच नाही तिच्याकडे/त्याच्याकडे”.वगैरे, वगैरे…..पण आपले चांगले व्हावे हीच त्यांची सदैव इचछा असते.म्हणून अशी ही प्रेम करणारी माणसे ओळखता आली पाहिजे.
जेव्हा अशी प्रेम आणि आनंद देणारी माणसे सहवासात असतात तेव्हा एक वेगळीच प्रेरणा मिळते. कुणीतरी पाठिंबा देत आहे याची जाणीव होते.एक प्रकारची सकारात्मकता आयुष्यात येत असते.समस्या सोडविण्यासाठी एक प्रकाराचे बळच जणू ही माणसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या आपल्याला देत असतात.
प्रेम, आनंद ह्या गोष्टी खरेच आयुष्यातील मूलभूत गरजा आहेत.आपण काय करतो, आयुष्यात समस्या आली की फक्त समस्येकडच लक्ष देतो आणि पर्याय किंवा उपयांकडे दुर्लक्ष करतो.जेव्हा कोणीच नसते, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा हीच माणसे एक ज्योत बनून आपले जीवन प्रकाशमय करू शकतात.म्हणून अशा व्यक्ती आयुष्यात असणे ही निसर्गाची देणगीच जणू.
अनेकदा आपल्याला वाईट , नकारात्मक अनुभव आलेले असतात. पण यामुळे आयुष्य थांबत तर नाही.पण त्या अनुभवांची सवय मात्र होऊन जाते.पण दुसरिकडे फक्त आणि फक्त प्रेम-आनंद देणारी व्यक्ती असते.पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात आणायला घाबरतो.
कधी आपण त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही तर कधी आपल्यामुळे त्या व्यक्तीला देखील आपल्या सारख्या यातना भोगाव्या लागतील असे आपल्याला वाटत राहते.त्यामुळे ‘जे चाललं आहे ते चालू दे’ असे आपण नेहमी मनात म्हणत राहतो.पण खरेच आजही अशी जगावेगळी माणसे ह्या जगात आहेत , ज्यांना आपल्याकडून काही नको आहे, पण त्यांना आपल्याला फक्त प्रेम आणि आनंद द्यायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे.’तू घाबरू नको, मी आहे ना’ हेच जणू त्यांना आपल्याला सांगायचे आहे.
अशी माणसे खरेच नशिबानेच मिळतात.पण आपणच त्यांचा राग राग करतो.’हिला काय दुसरे काम नाही का? ही का मला सारखी फोन करते, का सारखी मेसेज करते? एक-दोन दिवसात काय मला धाड भरणार आहे का?’ वगैरे, वगैरे आपण बोलत राहतो.पण अशी प्रेम-आनंद देणारी माणसे खूप निरागस असतात.सर्वांचे नेहमी चांगले व्हावे, कोणी कधी दुःखी राहू नये असेच त्यांना वाटत असते.
दुःख कोणाला सुटलेले नाही.जोपर्यंत जीव आहे तो पर्यंत समस्या ह्या कायम राहणार.मग काय करायचे? जगणे सोडूम द्यायचे? एका ठिकाणी थांबून राहायचे? तर जीबात नाही. दुःख ,समस्या सोडवूयात प्रेम-आनंद देणाऱ्या व्यक्तींबरोबर.चार क्षण त्यांच्यासोबत विसवूयात.दुःख संपले नाही , समस्या जरी लवकर सुटल्या नाहीत तरी त्या समस्या सोडविण्याची ताकद तरी ही माणसे आपल्याला देतील.
कुटुंब, मित्र-परिवार यासाठी तर दिलेले आहेत निसर्गाने.म्हणून यासाठी निसर्गाचे आभार मानुयात. विधात्याचे याबाबत आभार मानुयात आणि प्रेम-आनंद देणाऱ्या माणसांना धरून राहुयात.कारण अशी माणसे नशिबाने मिळतात आणि निसर्गाने दिलेली ती एक मौल्यवान देणगी असते. अनेकदा आपण आपल्याला नको असणारी व्यक्ती ,’कर्म माझे, नशीब माझे’ म्हणून कायम जपत बसतो, पण प्रेम देणाऱ्या व्यक्तीला दूर लोटतो.
म्हणूनच चला तर मग जपुयात माणसे….जी देतात प्रेम आणि आनंद…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अतिशय समर्पक.
👍👌👌
So nice 👌👌👌👌👌👌