Skip to content

Long Distance Relationship जोपासताना,दोन मने जवळ कशी बरे असू शकतात? वाचा ह्या लेखात.

Long Distance Relationship जोपासताना,दोन मने जवळ कशी बरे असू शकतात? वाचा ह्या लेखात.


मेराज बागवान


Long Distance Relationship ही आजच्या युगातील एक नातेसंबंध जोपासण्याची एक नवीन बाब.ह्यामध्ये दोन व्यक्ती, एक स्त्री आणि एक पुरुष दूर अंतरावर राहत असतात. प्रत्यक्ष संवाद किंवा भेट होत नाही.मग हे कसे बरे Relationship? हे नाते अनेकदा ऑनलाईन माध्यमाद्वारे जपले जाते.सोशल मीडिया तर तुम्ही जाणताच. त्याद्वारे एक पुरुष आणि एक स्त्री एजमेकांशी संवाद साधत असतात. मागच्या पिढीतील किंवा आजच्या पिढीतील काही जणांना अशा Relationship वर विश्वास बसणार नाही.ते म्हणतात,’इथे घरातल्या व्यक्तीचा काही भरोसा नाही राहिला आणि दूरच्या व्यक्तीवर फक्त मोबाइलवर फोन मुळे कसा बरे विश्वास ठेवायचा? मग कसे बरे हे नाते जोपासले जात असेल?

आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेच,इंटरनेट आहे आणि सोशल मीडिया च्या विविध माध्यमे देखील.आणि हेच तंत्रज्ञान कारणीभूत आहे Long Distance Relationship ही संकल्पना समाजात रुजू होण्यामागे.यामुळे कितीही दूरवरच्या व्यक्तीबरोबर संभाषण करता येते.फोटो, व्हिडीओ शेअर करता येतात.एकमेकांना पाहता येते.आज इंटरनेट मुळे सर्व गोष्टी अगदी घर बसल्या होत आहेत.आता ऑनलाइन फक्त कामेच नाही तर नाती देखील ऑनलाइन फुलत, बहरत आहेत.पण अशी नाती फुलत असताना बऱ्याच गोष्टी आजच्या तरुणाईने विचारात घ्यायला हव्यात.म्हणजे पुढे त्रास होणार नाही आणि अनेक नकारात्मक गोष्टी टाळता येतील.

जेव्हा long distance relationship असते तेव्हा नात्याची सुरवात बऱ्याचदा साधे मेसेज पाठविणे ,रोजच्या जीवनातील गोष्टी बोलणे वगैरे असे साधेसे हे नाते असते.मग असेच संवाद साधत असताना मने जुळू लागतात.म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी विचारात घेणे,करिअर वर चर्चा करणे,अडीअडचणींवर बोलणे असे काहीसे सुरू होते.आणि मग यातूनच कोणाला एकाला सूर गवसतो आणि एक प्रकारचे प्रेम निर्माण होते. त्यातील एक जण आपल्या भावनांची कबुली देतो आणि दुसऱ्याच्या मनात देखील तशाच भावना असतील तर तो देखील त्या व्यक्तीला साथ देतो. पण जर हे सगळे एकतर्फी असेल तर मग हे नाते काही पुढे जाऊ शकत नाही आणि तिथेच पूर्णविराम मिळतो.

जेव्हा दोन्ही कडून भावना सारख्याच असतात,प्रेम असते.तेव्हा त्या भावनेचे रूपांतर नात्यात होते आणि मग त्याला Long Distance Relationship असे नाव पडते. पण हे काही मेसेज पाठविण्याइतके सोपे काम नाही.जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर असतात तेव्हा एकवेळ सर्व काही सोपे असते.पण अशा प्रकारच्या नात्यामध्ये जबरदस्त समजूतदारपणा, प्रचंड विश्वास आणि एकमेकांना दिलेली खरी साथ ह्या गोष्टी खूप मोलाच्या ठरतात.आणि Long Distance Relationship हे नेमके ह्याच सर्व गोष्टींवर आधारलेले असते.

म्हणूनच तरुणाईने काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही Long Distance Relationship असाल तेव्हा ,ती व्यक्ती तुम्हाला का आवडते हे सर्व प्रथम स्वतःच्या मनाला विचारा.म्हणजे,ती व्यक्ती छान स्टेटस ठेवते,तुमचे स्टेटस नेहमी पाहते,तुमच्या डीपी ला लाईक करते,तुमच्या मेसेज ला छान छान स्माईली पाठविते म्हणून तुम्हाला ती व्यक्ती आवडते ,हे काही कारण नाही.ऑनलाइन नाते जरी असले तरी ते नाते आहे आणि ऑनलाईन हे फक्त माध्यम.म्हणून ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून एक माणूस म्हणून उघड्या डोळ्याने विचार करणे आवश्यक आहे.

समोरची व्यक्ती तुम्हाला किंमत देते का? तुमच्या विचाराना मूल्य देते का? तुमचा आदर ठेवते का? तुम्हाला समजून घेतले का? आणि तुमच्यावर विश्वास ठेवते का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून पाहायला हव्यात.तसेच दुसरीकडे,त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही तितकेच महत्वपूर्ण आहात का? हे केवळ वेळ घालविणे तर सुरू नाही ना? तुम्ही किंवा ती व्यक्ती एकमेकांचा वापर तर करून घेत नाही ना ? ह्या गोष्टी आत्मपरीक्षण करून तापसल्या पाहिजेत.

जर सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर काही अडचण नाही.मग तुम्ही एकमेकांच्या किती जरी दूर असलात तरी तुम्ही एकमेकांना कायम समजून घेणार,एकमेकांवर विश्वास ठेवणार आणि संयम राखणार हे नक्की.आणि ह्या सर्व गोष्टी मग तुम्हाला पुढील निर्णय जसे की लग्न किंवा एकत्र राहणे घेण्यासाठी खूप मदत करतील.पण जर उत्तर नकारात्मक असेल तर मात्र अशा नात्यातून बाहेत पडलेले केव्हाही चांगले.

अनेकदा Long Distance Relationship मध्ये बाह्य रुपावरून ,किंवा सोशल मीडिया स्टेटस वरून माणसाची पारख केली जाते.आणि मग स्वतःच्या Judgement नुसार माणसाचे व्यक्तिमत्त्व ठरविले जाते.आणि ह्यातच तरुणाई स्वतःचा घात करून घेते.आणि मग पुढे अनेक अडचणी उभ्या राहतात.नैराश्य येते.आणि ह्यातून काही तरुण-तरुणी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय देखील घेतात.गैरसमज होतात.कधी कधी हे सर्व एकतर्फी असते.पण तरी देखील दोघांपैकी एक जण गृहीत धरून चालतो की समोरचा देखील मला पसंत करतो.पण वास्तव परिस्थिती तशी नसते.

म्हणून अशा प्रकारची नाती जोपासत असताना सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून,फक्त भावनांच्या आहारी न जाता,दुसऱ्यावर कोणत्याच प्रकारची जोर-जबरदस्ती न करता योग्य विचार करून निर्णय घ्यावा.प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे.त्यामुळे कोणी कोणावर कोणतीच जबरदस्ती करू नये.प्रेम आहे तर चांगलेच आहे आणि जरी नकार मिळाला तरी त्याहून चांगले.सत्य स्वीकारता आले पाहिजे.

अशा नात्यात दुसरी व्यक्ती आपल्याशी खरे बोलते का? त्याची गरज,स्वार्थ,काम संपले की तुमच्याकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना ? किंवा फक्त काम असेल तेव्हाच तर बोलत नाही ना? तुमच्याशी बोलायचे म्हणून बोलत नाही ना? ह्या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.आणि तुम्ही देखील आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की ,खरेच ही व्यक्ती मला महत्वाची आहे का ? मी तिला किंवा त्याला प्राधान्य देतो का/ देते का? त्या व्यक्तीची मला खरेच काळजी आहे का ? अशा सर्व गोष्टी वारंवार तपासून पाहणे महत्वाचे ठरते.उगाच इतरांच्या भावना दुखावणे, त्यांच्या भावनांशी खेळणे किंवा मग स्वतः भावनांच्य ओघात वाहत जाण्यात काहीच अर्थ नसतो.यामुळे तुमचा वर्तमान खराब होतो,बस इतकेच.

आणि जेव्हा तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या भावना जर अगदी खऱ्या असतील तर प्रेम फुलतच जाते.तुम्ही एकमेकांना आपोआप जपू लागतात.एकमेकांशी बांधून राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.अनेक गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.कित्येकदा दुसऱ्या व्यक्तीसाठी खुओ संयम ठेवतात,त्याग करतात.ती व्यक्ती आनंदी राहावी, सुखी राहावी म्हणून जीवाचा आटापिटा करतात.हे सर्व ऑनलाइन नाते असूनही तुमच्यात होते.कारण तुम्ही दोघे खरे असतात आणि तुमचे नाते देखील दूतर्फी असते.आणि एकमेकांसाठी जगण्याची तुमची तयारी असते.आणि मग असे नाते चिरकाल टिकते.

ह्या लेखाच्या माध्यमातून आजच्या तरुणाईला बस इतकेच सांगायचे आहे की, Long Distance Relationship जोपासणे किंवा नाही जोपासणे हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.पण हे नाते जोपासत असताना,वर उल्लेख केलेल्या गोष्टी प्रत्येकाने विचारात घ्याव्यात जेणेकरून वेळीच सर्व काही स्पष्ट होईल. कोणतीच गोष्ट अंधारात राहणार नाही आणि मग पुढे होणारा मानसिक त्रास देखील कमी करता येईल.

नाती जपा आणि स्वतःला देखील……!!!!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!