Skip to content

तुम्ही जे काही चांगलं कराल त्याबद्दल लोकांकडे काहीतरी नकारात्मक असणारच आहे, हे स्वीकारा.

तुम्ही जे काही चांगलं कराल त्याबद्दल लोकांकडे काहीतरी नकारात्मक असणारच आहे, हे स्वीकारा.


हर्षदा पिंपळे


मीनाक्षीच नुकतच पदवीच शिक्षण पूर्ण झालं होतं.फॅशन डिझाइनिंगमध्ये तिने डिग्री घेतली होती.लहानपणापासून तिला कपडे शिवण्यामध्ये खूपच इंटरेस्ट होता.ती तिच्या बाहुलीला वेगवेगळे ड्रेस शिवायची.आईच्या जुन्या साड्या घेऊन ती साड्यांचे वेगवेगळे ड्रेस शिवायची. आई ओरडायची पण मिनाक्षी तेव्हा काही ऐकायची नाही. पण आता मिनाक्षीला आई काही बोलायची नाही. कारण मिनाक्षी आता मोठी झाली होती.इतकच नाही तर मिनाक्षी नोकरीच्या शोधात होती.तर काही लोकं मुद्दाम मिनाक्षीला डिवचत होती.

“अगं, तुला तर बोललो होतो की कॉमर्सला प्रवेश घे.लगेच बँकेत नोकरी मिळाली असती.हे असलं डिझाइनिंग वगैरे करून आता काय तुला लगेच नोकरी मिळेल असं काही वाटत नाही.वणवण भटकावं लागेल.आणि इतकं फिरून नोकरी मिळाली तर ठीक. नाहीतर आहेच कुठेतरी चार पाच हजाराची नोकरी.आणि घरी बसून तरी ड्रेस किती शिवणार…??आणि आयुष्यभर काय असेच फाटलेले कपडे शिवणार का…??”

असलं काहीतरी ती लोकं मिनाक्षीला बोलत होती. आधी मिनाक्षीला ते आवडायच नाही. तिलाही स्वतःला क्षणभर वाटायच की , यार “आपलं खरच चुकलं वाटतं…करायला गेलो एक आणि होतय एक…” लोकांच्या त्या बोलण्याने तर मिनाक्षी जवळजवळ त्रासलीच होती.सतत नकारात्मक बोलणारी ती लोकं मिनाक्षीला असह्य होऊ लागली.नंतर काही दिवसांनी मिनाक्षीला एका फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण मिनाक्षी या नोकरीमुळे फारशी आनंदात नव्हती.तिच्या चेहऱ्यावर असणारं नेहमीच हसू हरवून गेलं होतं.राहून राहून तिला लोकांच ते बोलणं सातत्याने आठवत होतं.ती रोज कामावर जायची-यायची.करायच म्हणून काम करायची.एक दिवस सहज आईचं लक्ष मिनाक्षीकडे गेलं .

“काय झालं…? कामात लक्ष नाही तुझं.तुझं काम आवडत नाहीए का तुला..?इतकी मलुल का झाली आहेस…?” आई मिनाक्षीला म्हणाली. यावर मिनाक्षी काहीच बोलली नाही. मग आईच्या लक्षात आलं की त्या लोकांच बोलणं तिने मनावर घेतलं असणार.मग आई मिनाक्षीला समजावत होती. आई म्हणाली की
“अगं मिनू , लोकांच काय मनावर घेतेस.अगं ती काहीही केलं तरी बोलणारच.त्यांना काय माहीत तु काय करू शकते आणि काय नाही… तु काय करायच हे ठरवणारे ते कोण…? त्यामुळे लोकांच बोलणं मनावर घेऊ नकोस.तुला काय चांगलं वाटतय ते करायला घाबरू नकोस.लोकं नकारात्मक बोलणारच.नकारात्मक प्रतिक्रिया देणारी लोकं आपल्या आजुबाजुला असतातच त्यांचा फार विचार करत बसायच नाही. आहे ते स्वीकारून पुढे जायचं. ”
आईचं हे बोलणं मिनाक्षीला पटलं.हळुहळू ती रूळावर आली.पुन्हा एकदा ती मनापासून काम करू लागली.

तर खरचं…

कुणाचं चांगल झालं तर सगळ्यांनाच बघवतं का..?
कुणाचं वाईट झालं तर सगळ्यांनाच बघवतं का..?

तर नाही…. अजिबात नाही. एखाद्याचं चांगलं होत असेन तर प्रत्येकालाच ते चांगलं लाटेन असं काही नाही. कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात दुसऱ्याचं सुख हे खुपतच असतं.आणि जर कुणाचं काही वाईट झालं तर ते कित्येकांना सहनही होय नाही. इतरांच दुःख पाहून हळहळणारी जशी काही लोकं आहेत तशीच काही लोकं इतरांच सुख पाहून जळणारीसुद्धा आहेत.

आता प्रत्येकालाच आयुष्यात का ही ना काही चांगल करायची इच्छा असते. पण आपल्या बाबतीत अशा वेळी कित्येक लोकांचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असतो.अशा लोकांना आपण जे काही करतो त्याच्यामध्ये काही ना काही हे नकारात्मक दिसत असतं.आपण चांगलं काही करताना ती लोकं अनेक नकारात्मक शंका बोलून दाखवतात. सगळं नकारात्मक बोलायला लागतात.थोडक्यात काय तर एखादं चांगल करायला जाताना त्यात मोडता पाय घालतात.तर अशावेळी आपण कणखर राहून ते स्वीकारायला हवं.

बिंधास्त जे काही चांगल करायचय त्यासाठी आपण लोकांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. लोकांच्या नकारात्मक गोष्टींचा विचार करत राहिलात तर चांगल्या गोष्टी करायची संधी नक्कीच निघून जाईल.त्यामुळे विचार करा.चहाची छोटी टपरी चालू करायची असेल तर बिंधास्त सुरू करा.बांगड्यांच दुकान टाकायच असेल तर तेही टाका.पुनर्विवाह करायचा असेल तर तोही करा.वयाच्या पन्नाशीतही शिकायच असेन तर बिंधास्त शिका.तुम्ही जे काही चांगलं कराल त्याबद्दल लोकांकडे काहीतरी नकारात्मक असणारच आहे, हे स्वीकारा आणि पुढे चालत रहा.

आपल्या आयुष्याची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची…??? आपलं भवितव्य आपण नाही घडवणार तर कोण घडवणार नं…??

सो..विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!