लोकांच्या वागण्याचा दुष्परिणाम स्वतःच्या मानसिक शांततेवर होऊ न देण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपण जे काही आयुष्य जगतो किंवा आपला एकंदरीतच आयुष्याचा जो काळ आहे त्यावर विविध गोष्टींचा प्रभाव पडत असतो. कारण आपण कधीही एकटे असत नाही. माणूस आयुष्य जगताना वेगवेगळ्या परिस्थितींमधून जात असतो. आता परिस्थिती म्हटली की त्यात माणसं आली, समूह आला, समाज आला. या सर्व गोष्टी त्यात येतात.
आपण कुठेही असलो तरी माणूस हा केंद्रस्थानी आहेच. आणि माणसं ही काही सर्व एकाच स्वभावाची असत नाहीत. व्यक्ती तितक्या प्रकृती. अगदी एका घरातली माणसं, एका परिस्थितीमध्ये वाढलेली माणसं देखील वेगळ्या स्वभावाची असतात याच कारण आहे विचारपद्धती. आपली विचारपद्धती कशी आहे यावर सर्व अवलंबून असत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भिन्न स्वभावाची माणसं ही भेटतात. अश्या समूहात आपण काही ना काही कारणाने वावरतो.
पण अनेकदा अश्या काही गोष्टी होतात की या लोकांचं वागणं अस असत की त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो, त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर आपले विचार, आपलं शरीर म्हणजेच शारीरिक आरोग्य आणि आपला समाज या तिघांचाही प्रभाव पडतो. आणि म्हणूनच लोकांच्या वागण्या बोलण्याने आपल्याला थोडाफार का होईना फरक पडतो.
हा प्रभाव बरेचदा इतका नकारात्मक असतो की त्यातून आपली मानसिक शांतता नष्ट होते. आपल्या आतून त्रास होत राहतो. आपण स्वतःला अस्वस्थ करून घेतो. बर ही लोक आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढूनच टाकता येतील अशीही नसतात. मग अश्या वेळी काय करायचं हे समजत नाही. तर अश्या वेळी काही गोष्टी जाणीवपूर्वक करण गरजेच आहे. जेणेकरून त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होणार नाही.
१. त्या माणसाचं आपल्या आयुष्यात असलेले योगदान ओळखा: आपल्यासोबत असलेली सर्वच माणसं काही आपल्या आयुष्यात योगदान देत नसतात. ती फक्त असतात. पण अश्या लोकांच्या वागण्याचा पण आपल्याला बरेचदा त्रास होतो. आपलं मन इतकं संवेदनशील असत की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा लगेच फरक पडतो. म्हणून आपल्याला लगेच त्रास होतो.
त्यामुळे अस जेव्हा काही होईल तेव्हा ही व्यक्ती, हा माणूस माझ्या आयुष्यात माझ्या सुख दुःखात कितपत योगदान देत आहे, मी माझ्या आयुष्याच्या ज्या प्रगती पथावर आहे त्यात या व्यक्तीचा कितपत वाटा आहे, अगदीच साधा विचार केला तरी खरच या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे असा प्रश्न आपण स्वतः ला विचारला पाहिजे. जर ही व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीच योगदान देत नाही तर अश्या व्यक्तीच्या वागण्याचा आपल्याला काहीही फरक पडण्याच कारण नाही. आपण जितकं ज्या गोष्टीला महत्त्व देणार तितका त्या गोष्टीचा आपल्याला फरक पडणार. त्यामुळे अश्या लोकांना महत्त्वचं देऊ नका.
२. या लोकांमध्ये आपला वेळ गुंतवण, घालवण कमी करा: वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच टिकून राहत नाही. त्यामुळे आपण आपला वेळ कुठे घालवायचा, कोणासोबत घालवायचा हे आपल्याला माहीत पाहिजे. बरेचदा अशी माणसं समोरून बोलायला आली की आपण आपलं काम बाजूला ठेवून त्यांच्याशी बोलत बसतो, आपला वेळ फुकट घालवतो. आपल्याला माहीत असत की यातून काहीही चांगल निष्पन्न होणार नाही.
उलट त्यांचं वागणं, बोलण आपल्याला तापदायक ठरणार. फक्त त्यांना कसतरी वाटेल म्हणून आपण वेळ घालवत असू तर हे योग्य नाही. आपण अस करून त्यांना दाखवून देतो की आपल्याला पण यात इंटरेस्ट आहे. म्हणून अस न करता जितकं शक्य होईल तितक लांब राहण्याचा प्रयत्न करा. संपर्क होणार नाही का? तर होणार. पण तो जेवढ्यास तेव्हढा ठेवायचा. एकदा त्या माणसाला समजलं की ही व्यक्ती आपल्याला दाद देत नाहीये की ती स्वतःहून बाजूला होते.
३. अश्या माणसांचा जास्त विचार करत बसायचा नाही: बऱ्याच जणांना सवय असते समोरचा माणूस काहीतरी वागला तर त्यावर अतिवीचार करायची. जरी आपल्याला माहीत असल की ती व्यक्ती तिचा स्वभाव तसाच आहे तरी आपण त्याबद्दल विनाकारण विचार करत आपला वेळ वाया घालवतो. हे करण आधी थांबवलं पाहिजे. अश्या व्यक्तीचा विचार करण्याची काही गरज नाही ज्यातून काही चांगल घडणार नाही. आपल्याला माहीत आहे ती व्यक्ती तशीच आहे, तो तिचा स्वभाव गुणधर्म आहे. हे स्वतः ला सांगायचं आणि विषय सोडून द्यायचा.
४. आपल्या वागण्या बोलण्यात स्पष्टता आणा: आपण कोणत्याही गोष्टीला लगेच हो म्हणतो. ते आपल्याला जमत. पण नाही म्हणणं काही केल्या जमत नाही. योग्य ठिकाणी, योग्य त्या वेळी नाही म्हणणं हे देखील एक कौशल्य आहे. जे आपण शिकल पाहिजे. अश्या व्यक्ती आपल्या कामाच्या आड येण्याचा प्रयत्न करतील, आपला वेळ मागतील. तिथे आपल्याला स्पष्टपणे काही गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. आणि आपण इथे काही त्यांच्याशी भांडायच नाही. त्यांना फक्त याची जाणीव करून द्यायची की आपल्याला त्यांच्या सोबत राहण्यात रस नाही.
५.दुर्लक्ष करायला शिका: आता ही जी लोक असतात ज्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो ती बरेचदा आपल्या जवळची देखील असतात. ज्यांच्यासोबत राहणं आपल्याला भाग असत. कारण नाती असतात. अश्या वेळी काय करणार? रोज उठून यांना सामोर तर जायचं आहे. तर इथे आपल्याला गोष्टींना दुर्लक्ष करता आल्या पाहिजेत. ठीक आहे ही व्यक्ती अस वागते ज्याचा मला त्रास होतो. पण तो त्रास कितीवेळ करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. एका मर्यादेनंतर आपल्याला माहीत झालेलं असत की हा माणूस असाच आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. पण आपण त्याच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष नक्की करू शकतो. यातून आपलाच फायदा होणार आहे. कारण ज्या गोष्टींनी त्रास होतो त्या गोष्टी धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे सोडून द्यायला शिका.
अश्या काही गोष्टी करून आपण स्वतःची मानसिक शांतता टिकवून ठेवू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Verey Verey nices
खूप सुंदर आणि महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
Very nice
Very nice
खूपच छान!