लोक तोंडाला येईन ते बोलतील, पण त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“आज होतोय का स्वयंपाक तुझा? की आम्हाला उपाशी मारायचा बेत आहे? कुठल्या मुहूर्तावर माझ्या मुलाचं लग्न तुझ्याशी लावून दिलं काय माहीत. ना कामाचा उरक माहीत आहे ना पद्धत. मुंगीच्या चालीने सर्व करत बसायचं.” गंगा बाईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता. हातात देवाची माळ पण सर्व लक्ष सुनेच्या कामाकडे. सरू, सरस्वती त्यांची सून. ती आत जेवण बनवत होती. लग्नाला जवळपास पंचवीस वर्ष झाली होती.
पण सासू सासऱ्यांच बोलण अगदी नव्या नवरीसारख ऐकून घ्यावं लागतं असे. पण तिने कधीच मनाला लावून घेतल नाही. या सर्व गोष्टी ती हसण्यावारी न्यायची. आता देखील सासू इतकं बोलत होती तरी ती त्यांच्या बोलण्याने चिडून किंवा वैतागून न जाता जेवण बनवण्याकडे लक्ष देत होती. तिच काही उत्तर नाही हे पाहून सासूबाई परत ओरडू लागल्या. “तुला काही ऐकायला येत का नाही? मला माहित आहे हे सर्व तू मुद्दाम करतेस.” तेव्हढ्यात सरू जेवणाच ताट घेऊन बाहेर आली व त्यांना देत म्हणाली, “अहो आई मुद्दाम का करू मी? जेवण तयार व्हायला नको का? घ्या जेवा!”
आताही ती सासूशी नीट बोलत होती. त्यांचं हे बोलण तिच्या मुलीच्या म्हणजेच मनालीच्या कानावर पडल. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. तिला आपल्या आजीचा हा असा स्वभाव अजिबात आवडत नसे. सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या आईला सारखं बोलण खाव लागत याच तिला वाईट वाटे. आता देखील तिने आजीच बोलण ऐकलं होत व तिला ते अजिबात आवडल नाही. ती आत येताच म्हणाली, “आजी तू का ग सारखं आईला बोलत राहते? ती तुमचं सर्वांचं इतकं करते तरी तुम्ही तिला घालून पाडून बोलता.
कधीतरी तिच्याशी नीट बोला ना!” मनाली आपल्याला बोलते हे पाहून आजीला राग आला. ती त्यावर पण सरूलाच बोलू लागली. “वा! चांगले वळण लावले आहेस हा मुलीला. मोठ्यांना उलट बोलायच, त्यांच्यावर ओरडायच अगदी छान जमत.” मनाली यावर परत काहीतरी बोलणार होती तेव्हड्यात सरूने तिला डोळ्यांनी शांत केल आणि आत जायला सांगितलं. ती गेल्यावर सरू सासुकडे येऊन म्हणाली, “आई तुम्ही काय तिचं मनावर घेता, लहान आहे ती अजून. नंतर समजेल तिला पण.” “हो खूपच लहान आहे. सर्वांना बोलायला लहान आहे. लग्नाच वय झालंय तरी ही अस वागते. कोण करेल हिच्याशी लग्न?” अस म्हणत त्यांनी जेवायला सुरुवात केली. सरू पण तिथून उठली व मनलीच्या खोलीकडे यायला निघाली.
मनाली खोलीत तोंड फुगवून बसली होती. सरूने तिला दारात उभ राहून पाहिलं तर तिला हसूच आल. ती आत येत म्हणाली, “अरे वा! आज कोणाच्यातरी तोंडात आधीपासूनच खाऊ आहे असा दिसतोय. म्हणजे परत जेवण वाढायला नको.” मनाली अजूनही तोंड फुगवून च बसली होती. सरू तिच्या जवळ येऊन बसली व तिला स्वतःकडे केल. तस मनाली बोलू लागली. “आई मला नाही बोलायच तुझ्याशी. एकतर आजी आजोबा तुझ्याशी कसेही बोलतात, तरी तू ऐकून घेते आणि मी तुझी बाजू घेऊन बोलले तरी तू मलाच गप्प करतेस. मला अजिबात आवडत नाही ती तुला अस बोलतात ते. तु त्यांना का कधी बोलत नाहीस? अस वाटत तुला कश्याच काही वाटतच नाही.
तु काही बोलत नाहीस ना म्हणून ती तस करतात. मी तुझ काही ऐकणार नाही, यापुढे ती तुला काही बोलली तर मीपण काहीतरी बोलणार. मला राग येतो.” तिच्या या बोलण्यावर सरू हसत म्हणाली, “बर बाई तू माझी बाजू घेऊन बोल. पण त्याने काय होणार? तुझ ऐकून त्या काहीतरी बोलण, परत तू बोलणार. यातून विषय लांबणार. काय मिळालं यातून? विनाकारण मनस्ताप.” त्यावर मनाली म्हणाली, “मग काय सर्व सहनच करत बसायचं का? तुला कसा काय ग राग येत नाही. तु सर्व हसण्यावारी नेतेस. मला नाही जमत बाबा!”
सरू म्हणाली, “अग कोण म्हणत मला राग येत नाही. मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा मला पण माझ्या आईला कोणी काही बोललं की राग यायचा. मी ही चिडायचे. तेव्हा माझी आई म्हणजेच तुझी आजी मला काय म्हणायची माहीत आहे. बोलणारी बोलत राहतील. ते काही आपल्या अंगाला लागत का? नाही ना! समोरचा कितीही बोलला तरी आपण ते आपल्याला लावूनच नाही घेतल तर आपल्याला का त्रास होईल. आईने सांगितलेली गोष्ट मला खरच पटली.
आता तूच बघ, तुझी आजी वैगरे बोलते पण मी शांत आहे हे पाहून नंतर गप्प देखील होते. तेच जर मी त्यांच्या बोलण्यावर चिडून काहीतरी उलट उत्तर दिलं तर होणार काय? गोष्टी वाढणार आणि त्रास मलाच होणार. म्हणून मी त्यांच्या गोष्टी मनावरचं घेत नाही. कोणाला त्रास होतो का यातून? नाही. आपण जर समोरचा बोलला त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देत राहिलो तर आपलं मन आपल्या ताब्यात नाही असा त्याचा अर्थ होतो. आपण सरळ सरळ समोरच्याला हवं तसच वागतो अस यातून दिसून येत. तेच जर आपलं मन आपल्या ताब्यात असेल तर समोरचा माणूस आपल्याला काहीही बोलला तरी आपल्यावर त्याचा चुकीचा परिणाम होणार नाही.
तु आता बाहेरच्या जगात हळू हळू वावरू लागशील. तिथेही हेच लागू होत. अस कधीही समजू नकोस की समोरचा चुकीचा वागला म्हणून मला अस करावं लागतंय. शेवट पर्यंत तुझ्याकडे पर्याय असेल की या सर्व गोष्टींचा स्वतःवर परिणाम करून घ्यायचा की नाही.” “आई किती सहजपणे तू सर्व समजावून सांगतेस ग! अब मुझे समझ आया आपके इस मुस्कुराहट का राज.” “समजल ना, तर मग चल आता जेवायला.” अस म्हणत सरू उठली मनाली पण उठून तिच्यासोबत जेवायला निघून गेली. जाताना दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होत.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
