‘लिव्ह इन’ म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही,तर स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा एक प्रवास होय.
मेराज बागवान
‘लिव्ह इन’ आजकाल सर्वत्र हा शब्द ऐकायला,वाचायला मिळतो आहे.लग्न संस्था,’लिव्ह इन’ यावर अनेक ठिकाणी चर्चा,वादविवाद ऐकायला मिळतात.अगदी न्यायव्यवस्थेपर्यंत ‘लिव्ह इन’ हा विषय जाऊन पोहचला आहे.
पण अजूनही ‘लिव्ह इन’ ही संकल्पना समाजमान्य नाही आणि कायदेशीर देखील नाही.काय आहे हे ‘लिव्ह इन’.प्रत्येकाची याबाबत वेगवेगळी मते असू शकतील,असतील.ह्या लेखाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयावर,त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक समस्येवर आणि एकंदरीत आजच्या तरुणाईच्या मानसिकतेवर जो काही परिणाम होत आहे हेच फक्त सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न.
आजकाल ‘लिव्ह इन’ ही संकल्पना काही तरुण मुला-मुलींच्या मनावर इतकी रुजली आहे की जणू ते ‘लिव्ह इन’ ला लग्नाच्या ऐवजीचा पर्याय मनात आहेत.आजची तरुणाई लग्नाला तयार नाही,पण ‘लिव्ह इन’ ला मात्र आहे.पण हे ‘लिव्ह इन’ आहे तरी काय? ‘लिव्ह इन’ म्हणजे आपल्या जोडीदाराबरोबर/आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न न करता एकाच घरात राहणे, म्हणजेच एकत्र राहणे होय.ह्यात कोणतीही बांधिलकी किंवा संसार करणे हा विषय नाही.पण हे वाटतं तितक सोपं नाही.’लिव्ह इन’ही संकल्पना समाजावर खूप मोठा प्रभाव टाकणारी आहे.आणि तरुणाईच्या मानसिकतेवर देखील प्रचंड परिणाम करणारी अशी ही एक बाब आहे.
‘प्रेम विवाह’,’अफेअर’,’प्रेमसंबंध’ हे काही आज नवीन राहिलेले नाही.पण आपल्या समाजाने आजही ते मनापासून स्वीकारलेले नाहीत हे देखील तितकेच खरे.दिवसेंदिवस प्रेम विवाह चे प्रमाण वाढत आहे आणि ते तुटण्याचे देखील.पण तो प्रेम-विवाह करण्याआधी काही जोडपी ‘लिव्ह इन ट्राय’ करित आहेत.पण थोडा विचार केला तर ,लिव्ह इन ही फक्त ट्राय करायची गोष्ट नाही.
ती एक खूप मोठी जबाबदारी आहे.संसार नाही,कायदा नाही,बांधिलकी नाही,एकमेकांची जबाबदारी नाही.पण तरी देखील नैतिक जबाबदारी खूप आहे.लिव्ह इन म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही, तर एकमेकांना संपूर्णतः ओळखणे, आणि जोडीदाराला ओळखता ओळखता स्वतःला देखील खऱ्या अर्थाने ओळखणे.म्हणजेच ‘लिव्ह इन’ हा एक प्रवास आहे स्वतःला आणि जोडीदाराला देखील ओळखण्याचा.आणि हे सर्व ओळखून स्वतःचे अस्तित्व,स्वतःची किंमत उमजण्याचा एक प्रवास.
आज समाजात आपण ‘लिव्ह इन’ मधून घडणाऱ्या अनेक विकृती,वाईट घटना पाहत आहोत,ऐकत आहोत,वाचत आहोत.खून, बलात्कार, अन्याय,अत्याचार, मानसिक आघात हे सर्व ह्या ‘लिव्ह इन’ मध्ये होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.
आणि ही एक सामाजिक शोकांतिका आहे.ही सर्व नकारात्मकता पाहिली की ,अनेक गोष्टींवर विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे हे लक्षात येईल.जेव्हा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणतो,तेव्हा ‘नाते’ हा विषय येतोच.पण लग्न येत नाही.पण म्हणून काही गोष्टी विसरून चालत नाही.
जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री लिव्ह इन चा निर्णय घेतात तेव्हा त्या पुरुषाने आणि त्या स्त्रीने खूप गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.जसे की, हा मुलगा/मुलगी कसा आहे,ह्याच्या/हिच्या काय आवडी निवडी आहेत,जीवन कसे तो/ती व्यतीत करीत आहे,त्याचा/तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, विचार कसे आहे,भावनिकता कशी हाताळत आहे,समोरच्याला किती आदर देत आहे, किती प्रमाणात समजून घेत आहे,एकमेकांची बाजू कितपत ऐकून घेत आहे.
एकमेकांचे विचार जुळत आहेत की नाहीत, करिअर विषयी दोघांचे काय मत आहे, फक्त एकच जण सर्व काही जपतो आहे आणि दुसऱ्याचे त्याकडे मुळीच लक्ष नाही,असे काही आहे का.अशा काही मूलभूत गोष्टींचा प्रत्येक मूला-मुलीने लिव्ह इन मध्ये राहताना विचार करणे गरजेचे आहे.लग्न तर फार पुढची ,तसे म्हणायला गेले तर शेवटची गोष्ट आहे.पण त्याआधी ह्या गोष्टींचा विचार करणे ,आत्मपरीक्षण तसेच जोडीदाराचे निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे.
कधी कधी ‘लिव्ह इन’ मध्ये ‘गृहीत’ धरले जाण्याच्या संधी बऱ्याच वेळा असतात.एक जण स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करू पाहत असतो.आणि दुसरा काही प्रमाणात भावनांच्या आहारी जात असतो.पण असे न होता, दोघांनी आपापली बाजू स्पष्ट ठेवली पाहिजे.जसे की , ‘मला आणखीन थोडा वेळ तुझ्याकडून हवा आहे,आणि त्यानंतरच मी पुढील सहजीवनाविषयी/लग्नाविषयी तुला सांगू शकेल,त्यामुळे तू मला अजून थोडा वेळ दे’.संवादात ही ‘स्पष्टता’ असली पाहिजे.आजकाल मुलगा-मुलगी दोघेही कमावते आहेत.
पण लग्नाआधी ‘करिअर विषयी दोघांनी एकमेकांना स्पष्टपणे आपली मते सांगितली पाहीजेत.जसे की ,’लग्नानंतर मी जॉब स्विच करू पाहत आहे,किंवा लग्नानंतर मी जॉब ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे ,किंवा मग आणखीन काही नवीन करिअर विषयीच्या गोष्टी ,मग त्यामध्ये नोकरीचे गाव बदलणे असेल किंवा आणखीन काही’.
बाकी अनेक गोष्टी आहेत,जसे की ‘शारीरिक संबंध आणि मूल जन्माला घालणे’.ह्या विषयी देखील उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे.तुझी ह्या विषयी काय मते आहेत.मुलांचे संगोपन ह्या विषयी काय विचार आहेत हे देखील बोलणे जरुरी आहे.
तसेच,मानसिक गोष्टी जसे की ,राग,ईर्षा,अहंकार,भीती,नैराश्य, एकाकीपणा, भावनांवर नियंत्रण, निर्णयक्षमता, म्याचुरीटी आणि संयम ह्या काही मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी देखील विचारात घेणे खूप खूप महत्वाचे आहे.एकमेकांच्या ह्या गोष्टी ‘जज’ न करता ‘समजून’ घेता आल्या पाहिजेत.
ह्या सर्व गोष्टी तेव्हाच शक्य होतील जेव्हा,स्वतःची स्वतःशी ओळख होईल,स्वसंवाद होईल आणि एकदा का ह्या विषयी स्वसंवाद झाला की जोडीदारविषयी काय वाटते हे लक्षात येईल.त्याचे मन ओळखता येईल.त्याला समजून घेऊन ,त्याची ओळख पटेल.लिव्ह मध्ये राहणाऱ्या लोकांनी ह्या काही गोष्टी विचारात घेतल्या तर पुढील अनेक गोष्टी ठरविता येईल.तसेच लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यास मोठी मदत होईल.,
‘लिव्ह इन’ हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण आपण एक समाजाचा भाग आहोत आणि आपण जे काही वागू,करू याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काही ना काही परिणाम होत असतो.म्हणून एक समाजाचा भाग म्हणून,एक सामाजिक बांधीलकी म्हणून ह्या सर्व गोष्टी विचारात घेणे खूप जरुरी आहे.
‘लिव्ह इन’ मधून घडणाऱ्या हिंसक घटना ऐकल्या की एक भीषण परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते.’लिव्ह इन’ मधील प्रत्येक जण तसाच वागेल असे नाही.पण प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार व्हावा इतकेच,आणि ह्यातच स्वतःचे आणि इतरांचे भले आहे.तसेच यामुळे कदाचित नात्यांमधील पुढील अनेक अनर्थ टाळता येतील,काही विपरीत घटना कदाचित कमी होतील…
विचार करून पाहा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


–
खूपच छान
छान आहे लेख
छान आहे लेख