Skip to content

आपल्याला कोणी सोडून गेलं म्हणजे आयुष्य थांबत नाही!!!

आपल्याला कोणी सोडून गेलं म्हणजे आयुष्य थांबत नाही!!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मिस्टर अँड मिसेस साने. एक छोटं पण सुखी समाधानी कुटुंब. मिस्टर साने बँकेत नोकरीला होते व नुकतेच रिटायर्ड झाले होते. दोन मुले होती, दोन्हीही शिकून परदेशी सेटल झाली होती. त्यामुळे घरात उरली होती ही दोघं नवरा आणि बायको. मिसेस साने लग्नाआधी नोकरी करत होत्या. नंतर लग्न झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ संसारात लक्ष द्यायचं ठरवलं आणि मुलं झाल्यानंतर तर ही जबाबदारी अजुनच वाढली व त्या यातच रमल्या. त्यांनी फक्त नवरा, मुलं आणि घर सांभाळल. आता मिस्टर साने रिटायर्ड झाल्यावर त्यांच्या सोबत संध्याकाळी जवळपास कुठेतरी फिरायला जा, मंदिरात बस असं करू लागल्या.

काही दिवसांपासून मिस्टर सानेंची तब्येत खालावली होती. मुलं परदेशी असल्याने त्यांना लगेच येणं शक्य नव्हतं. तिथून पैसे पाठवणे, चौकशी करणे करत होते. बाकी सर्व शुश्रुषा याच करत होत्या. पण तब्येत म्हणावी तशी सुधारत नव्हती आणि दोन महिन्यांनी मिस्टर सानेंनी निरोप घेतला. ते सर्वांना सोडून गेले. जायच्या दिवशी पण त्यांनी मिसेस सांनेंशी खूप वेळ गप्पा मारल्या. इतकी वर्षे त्यांनी घरासाठी आपल्यासाठी कुटुंबासाठी जे काही केलं याची त्यांना जाण होती. कृतज्ञता होती. त्यांच्या बोलण्यातून येत होतं. हे सर्व ऐकून मिसेस सानेंना समाधान वाटले. पण त्यानंतर ते सर्वांना सोडून गेले.

मिसेस सानेंसाठी ही खूप दुखदायक गोष्ट होती. जवळपास अर्ध्याहून अधिक आयुष्य ज्या माणसासोबत काढलं, या माणसासोबत आयुष्यातील सुखदुःख झेलली, चढ-उतार पाहिले तो असा एकाएकी निघून गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखा झाला. मुल आली होती, सर्व विधी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला. पण त्यांचं मन मानत नव्हतं.

कारण मिस्टर साने जरी गेले असले तरी त्या घरात त्यांच्या आठवणी होत्या. त्यामुळे त्या तिथून जायला तयार होत नव्हत्या. मुलही काही दिवसांनी निघून गेली. आता घरात एकट्याच राहिल्या. इतकी वर्ष घर, मुलं, नवरा यात असल्याने त्यांनी बाहेरच काही फार अनुभवलच नाही. त्यामुळे आता या पुढे करायचं काय असा प्रश्न पडला. एका बाजूला आठवणी होत्या ज्या पुढे जाऊ देईनात आणि दुसऱ्या बाजूला आयुष्य. खूप दिवस त्यांनी असेच दुःखात काढले.

एक दिवस घर साफ करताना त्यांना एक जुनी डायरी मिळाली. सहज उघडली असता तर त्यांना एक लिस्ट दिसली. ती होती त्याच्या bucket list. मिसेस सानेंना पहिल्यापासून गाण्याची, शिवणकामाची आवड होती. त्यांनी लग्नाआधी त्याचे शिक्षण ही घेतल होते. ह्याचं गोष्टी इतरांना शिकवाव्यात, आपली कला अजून चांगली जोपासावी ह्या त्यांच्या इच्छा होत्या ज्या संसारात अपूर्णच राहिल्या, त्यांनी फार लक्ष दिले नाही.

या डायरीकडे पाहून त्यांना मिस्टर सानेसोबतचा काही वर्षांपूर्वी चा संवाद आठवला. ते या गोष्टी पाहून म्हणाले होते, “अग इतक्या सर्व इच्छा लिहिल्या आहेस कधी पूर्ण करणार? इतका चांगला आवाज आहे पुढे का नेत नाहीस?” त्यावर या बोलल्या होत्या, “मी यातच आता पूर्णपणे रमले आहे मला आणि काही नको. ” त्यानंतर आता ही डायरी मिळाली होती. त्या ती घेऊन खोलीत आल्या व त्यांनी विचार केला, यांनी मला कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटले नाही, नेहमी प्रोत्साहितच केलं. मीच माघार घेतली.

पण हीच वेळ आहे स्वतःला परत एक संधी द्यायची, आयुष्य नव्याने सुरू करायची, त्यांनी पुन्हा स्वतःचे सर्व छंद नव्याने जोपासण्याचे ठरवले. मुलांना तशी इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही आनंद व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी शिवणकाम, गाण्याचा रियाज परत नेटाने सुरू करून त्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. त्यांना फिरण्याची आवड होती त्यानुसार त्या ट्रीपला जाऊ लागल्या. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा एक वेगळ, नवीन, स्वतंत्र आयुष्य सुरू केलं. मिस्टर साने जरी शरीराने सोबत नसले तरी मनात, आठवणीने सोबत होते आणि त्या बळावर त्यांनी स्वतःचे उरलेलं आयुष्य परत सुरू केला व समाधानी जीवन जगल्या.

आपल्या आयुष्यातून जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्रास हा होतोच. परंतु त्यामुळे आपण आपल आयुष्य थांबवू शकत नाही. असं केलं तर तो स्वतः वर अन्याय ठरेल. म्हणून जरी या गोष्टींचा त्रास होत असला तरी त्यातून शक्‍य तितक्‍या लवकर बाहेर पडून स्वतःला, स्वतःच्या आयुष्याला नवीन चान्स द्या. इतक्या वर्षात जे करायचं राहून गेलं ते करा, नवीन गोष्टी शिका, स्वतःला चांगल्या गोष्टीत व्यस्त करा. नव्याने आयुष्य सुरू करा. कारण, “दुःख आयुष्य संपवित नाही तर आयुष्याला नवीन अर्थ देतं.”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्याला कोणी सोडून गेलं म्हणजे आयुष्य थांबत नाही!!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!