Skip to content

“Life तुम्हांला रोज एक संधी नक्की देत असते, आणि त्याला ‘आज’ असे म्हणतात.”

“Life तुम्हांला रोज एक संधी नक्की देत असते, आणि त्याला ‘आज’ असे म्हणतात.”


मधुश्री देशपांडे गानू


“आगे भी जाने ना तू ,

पीछे भी जाने ना तू ..

जो भी है बस यही एक पल हैं……..”

“वक्त” या हिंदी चित्रपटातील हे गीत जीवनाचे अचूक सार आहे. फक्त आत्ताचा क्षणच आपल्या हातात असतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आता ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर तिचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ तिच्याबरोबर असतो. येणाऱ्या अनुभवांनी माणूस समृद्ध होतो, शहाणा होतो, दयाळू होतो, किंवा कठोर होतो.. कधी भावनाहीन, कोरडा होतो. आज आत्ता आपण जे आहोत ते या सगळ्याचा परिपाक आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आयुष्याला आपण वेगळे त्या त्या परिस्थितीला साजेसे हवे असतो. कालचे आपण उद्या तसेच असतोच असे नाही.

तरीही रोज नव्याने उगवणाऱ्या दिवसाला आपण नव्या ऊर्जेने, आशेने सामोरे जातो. कारण फक्त आजचा दिवस आपल्या हातात असतो. “आज आत्ता माझ्या समोर असलेली संधीच मला माझा ‘उद्या’ प्रगल्भ आणि संपन्न देणार असते.” भूतकाळात घडून गेलेल्या बर्‍यावाईट घटनांचा आज तुम्हांला काहीच उपयोग नसतो. हो, पण या अनुभवांनी तुम्हांला बरंच काही शिकवलेलं मात्र असतं. तुमच्या ‘आज’ ला तोंड देण्यासाठी समर्थ बनवलेलं असतं.

त्याच प्रमाणे तुमची ‘आज’ची संधीच तुमचा भविष्यकाळ ठरवत असते. रोज नवा येणारा ‘आज’ रोज नवी संधी घेऊन येतो. फक्त तुमची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक, वास्तववादी हवी. तुम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायला हवा. तरच तुमचा ‘आज’ तुम्हीं संपूर्णपणे जगता. आज एक पायरी चढलात तर उद्या कळस गाठण्याचे सामर्थ्य तुमच्यात येतेच.

पण तुम्हीं जर चिंता, ताण, नकारात्मक भावना यांनी ग्रासलेले असाल तर मात्र संधी आलेली, गेलेलीही तुमच्या लक्षात येत नाही.

ज्याप्रमाणे भूतकाळाचा अति विचार करून त्यात अडकून पडणे ‘आज’ व्यर्थ आहे. त्याच प्रमाणे भविष्यकाळाचा अतिविचार, चिंता, ताण घेऊन तुम्हीं तुमचा ‘आज’ शंभर टक्के जगू शकत नाही. म्हणजेच जीवन तुम्हांला रोज एक नवी संधी देत असतं, ते म्हणजे “आजचा दिवस”. फक्त ‘आज’ आत्ताचा हा क्षणच सर्वस्वी माझा आहे. आणि मी तो संपूर्ण आनंदाने, विश्वासाने भरभरून जगणार, ही खात्री तुम्हांला हवीच. ही ताकदीची मानसिकता तुमची असेल तरच तुम्हीं संधी अचूक पकडू शकता. अर्थात यासाठी प्रयत्नांचे सातत्य, मेहनत हवीच.

जीवन रोज नवी संधी देते म्हणजे तरी काय हो???? रोज काय फक्त आर्थिक प्रगती करणे एवढेच जीवनाचे ध्येय आहे?? आज फक्त पैसा कमावून श्रीमंत होणे यालाच आपण यशस्वी म्हणतो ना!! हे आज जरी महत्त्वाचं असलं तरीही जीवन म्हणजे पैसा कमावणे एवढाच संकुचित अर्थ नाही.

तर कालच्यापेक्षा मी माणूस म्हणून आज समृद्ध, संपन्न होण्यासाठी काय प्रयत्न करतो/करते? हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे.

एका व्यक्तीचं कथ्थक नृत्याचे शिक्षण लहानपणी चार-पाच वर्ष झालं. नंतर काही कारणाने ते बंद पडलं. आणि आता पन्नाशीनंतर त्या व्यक्तीला कथ्थक तर नाही, पण भरतनाट्यम शिकण्याची संधी मिळाली. उत्तम गुरू लाभले. अनेक वर्षांनी शिकण्याची दुर्दम्य इच्छा ‘आज’ पूर्ण होत होती. त्या व्यक्तीने आपली पाटी कोरी करून नम्रपणे शिक्षण घ्यायला हवे. मला काही येतं अहंभाव नको. गुरुंनी शिकवलेले प्रामाणिकपणे आत्मसात करायला हवे. म्हणजे जीवनाने परत एक सोनेरी संधी उपलब्ध करून दिली. आता त्याचं सोनं करणं, नृत्याचा निखळ, निर्मळ आनंद मिळवणे त्या व्यक्तीच्या हातात आहे. आज वयाच्या 80 व्या वर्षी उत्तम नृत्य करणाऱ्या आजी आपण पाहतो आहोतच.

जसं मी नेहमीच सांगते, इथे कोणीच परिपूर्ण नाही. पण जीवन तुम्हांला रोज एक नवीन संधी देतं. “स्वतःशी संवाद साधण्यासाठी, स्वतःमधले दोष ओळखून त्यावर काम करण्यासाठी, स्वतःमधले गुण ओळखून ते वृद्धिंगत करण्यासाठी, सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी, एक माणूस म्हणून प्रगल्भ होण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी, आत्मभान येण्यासाठी, स्वतःवर निसंशय, मनमुराद प्रेम करण्यासाठी, स्वतःच्या प्रेमाच्या माणसांवर प्रेम करण्यासाठी, आपली प्रेमाची नाती जपण्यासाठी, रुसवे-फुगवे, हेवेदावे विसरून एकत्र येण्यासाठी…..

किती किती अगणित गोष्टींसाठी जीवन तुम्हांला पुन्हा पुन्हा संधी देत असतं. फक्त तुम्हांला ती संधी ओळखता यायला हवी. आणि फक्त ‘आजच’ संपूर्ण आपला आहे हे समजून उमजून संधीचं सोनं करायला हवं. निदान शंभर टक्के प्रयत्न करायला हवेत.

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. कोणत्याही क्षुल्लक, नकारात्मक भावनांसाठी ते वाया घालवू नका. प्रत्येक क्षण, क्षण येथे संधी आहे. प्रत्येक क्षण भरभरून जगा. सत्कारणी लावा. तुमचा ‘आज’ तुमच्या उज्वल, आनंदी भविष्याची नांदी ठरू द्या….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!