लहानपणी शरीरसंबंध ठेवण्याच्या केलेल्या जबरदस्तीमुळे पुढे चालून या समस्या उद्भवू शकतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
लहानपण, बालपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यतील आठवणींनी भरलेला काळ, पुन्हा पुन्हा जगावा असा वाटणारा काळ. माणूस जस जसा मोठा होत जातो, प्रपंचात, कामात अडकत जातो तेव्हा डोळे बंद करून रमतो तो त्याच्या बालपणामध्येच. कारण बालपण असतच तितकं सुंदर आणि स्वच्छंदी. जसं एखाद छोट फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर जात असत, बागडत असत तशीच लहान मुल असतात. खऱ्या जगाशी अजून ओळख व्हायची असते.
आयुष्य असत ते खेळणं, मजा मस्ती, शाळा यांच्याभोवती फिरत असत. ना आजची काळजी असते ना उद्याची चिंता. आपल्या एकंदरीत आयुष्याचा जरी आपण आढावा घेतला तर लहानपणी जो आपण आहे त्या क्षणाचा आनंद घेत, तो क्षण भरभरून जगतो तो आपण पुढे मोठे झाल्यावर तितका जगत नाही.
बऱ्याच गोष्टी समजत जातात ज्या नाकारता पण येत नसतात. पुढच्या काळात पण आपण प्रयत्न करतो तस जगायचा पण लहानपणी जे आपसूक आनंद घेणं असत ते मात्र कमी होऊन जात.अस हे लहानपण असत. एखाद्या सुंदर स्वप्नासारखं. पण हे सुंदर स्वप्न अनेक वेळा तोडल जात, त्याला तडा पडतो. आणि हा तडा, हा ओरखडा घालवायचा म्हटला तरी जात नाही, त्याचे डाग तसेच राहतात. लहानपणी जर काही मुलावर काही आघात झाले असतील, काही चुकीचे अनुभव वाट्याला आलेले असतील तर त्याचा परिणाम पुढच्या पूर्ण आयुष्यावर पडतो.
आपलं लहानपण म्हणजे इमारतीचा जसा पाया असतो तस असत. तो जर डळमळला, खराब झाला तर इमारतीवर त्याचा परिणाम होतोच. अनेक मुलांना लहानपणी वेगवेगळ्या अनुभवांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये खूप जास्त गरिबी असेल, पालकांचे वाद असतील, त्यांचा घटस्फोट असेल आणि दुर्दैवी आणि मुलांच्या मनावर, शरीरावर आघात करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे लैंगिक शोषण.
कोणत्याही प्रकारच्या घटना या प्रभाव टाकतातच. पण ही एक अशी गोष्ट आहे जी मुलांचे लहानपण घालवून टाकते. त्यांची निरागसता, त्यांचं ते कोवळ वय खराब करून टाकते. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या, त्यांच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा, तसा प्रयत्न केल्याच्या घटना होतात, तश्या बातम्या देखील आपण वाचतो. माणूसपणाला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि याहूनही वाईट गोष्ट ही आहे की अस कृत्य करणारी बऱ्याचदा त्या मुलाची जवळचीच व्यक्ती असते. आपण अनोळखी व्यक्तिपासून जपून राहण्याचा प्रयत्न करतो पण अनेकदा आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडून चुकीचे अनुभव मिळतात.
मुलांच्या बाबतीत अगदी हेच होत. काका, मामा अगदी सख्या व्यक्तीकडून अश्या गोष्टी होतात आणि मुलगा मुलगी दोन्हीच्या बाबतीत होतात. त्यावेळी मुल पण अजाण असते, काहीही समजण्याच ते वय देखील नसत आणि जरी काहीतरी चुकीचं होत आहे हे समजत असल तरी त्याला विरोध करण्याची किंवा त्याच्याबद्दल काही बोलण्याची त्यावेळी क्षमता नसते.
पण त्यावेळी जे काही अनुभव येतात ते पुढे त्याच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडतात. Freud च्या म्हणण्यानुसार मोठेपणी माणसाला ज्या काही मानसिक विकृती किंवा आजार निर्माण होतात त्याच मुळ हे लहानपणी घडलेल्या घटनामध्ये असत. या घटना जरी मुल वरकरणी विसरलं असल तरी अबोध मनामध्ये म्हणजेच unconsious mind मध्ये तसच असत. याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या सामजिक जीवनावर पडतो.
लहानपणी अश्या घटना घडल्यामुळे पुढे चिंता, नैराश्य आणि PTSD म्हणजेच post traumatic stress disorder होतो. आघात पश्चात तणाव विकृती. झालेल्या घटनेची स्वप्न पडणं, सारखं तेच आठवणे, त्या घटनेसारख जरा काहीतरी होताना जाणवलं किंवा कानावर जरी पडल तरी अस्वस्थ होण अश्या गोष्टी होतात. नाते संबंध तयार करता येत नाहीत कारण कोणावर पटकन विश्वासच बसत नाही. अस का होत हे अनेक जणांच्या लक्षात येत नाही पण याची कारण ही आधीच्या गोष्टींमध्ये दडलेली असतात.
Guilt मोठया प्रमाणावर येतो. कारण जे काही झालं त्यात आपली चूक आहे अशी मनात भावना असते. स्वतःच्या शरिराबद्दल, स्वतःवर प्रेम नसणे. कोणी खरच चांगल्या मनाने जरी नात तयार करायला पाहत असेल तरी मनात संशय निर्माण होतो. भीतीची भावना असते. यासारखे अनेक आजार होतात. आता हळू हळू मानसिक आरोग्याबद्दल थोडी तरी का होईना सजगता येत आहे म्हणून अनेक जण स्वतःची अवस्था समजून घेऊन त्यासाठी उपचार करून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात कोण अशी व्यक्ती असेल तर नातेवाईक पण त्यासाठी काहीतरी प्रयत्न करतात.
पण अजूनही अश्या गोष्टींसाठी नेमक कोणाकडे जावं याबद्दल लोकामध्ये तेवढी समज नाही. बरीच जण खूप वर्ष उपचार घेऊनही बरे न होण्याचं कारणच हे असत की दिशा चुकलेली असते. म्हणून अश्या काही समस्या असतील पण योग्य वेळी psychiatrist तसेच psychotherapist यांची मदत घेणे आवश्यक आहे. कारण फक्त औषधाने आजार बरा होत नाही. त्यासाठी मनावर जो परिणाम झाला आहे, त्यातून एक जी धारणा, माणसाची एक विचार पद्धती तयार झालेली असते ती मुळातून बदलणं आवश्यक असत ते काम थेरपी करते.
Cbt,Rebt सारख्या थेरपी आज मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात कारण त्या प्रभावी आहेत. ह्या गोष्टी झाल्या तर अस काही झालं तर त्यातून बाहेर पडण्यासाठी. पण अस काही होऊ नये म्हणून पालकांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट मुलांसोबत चांगल आरोग्यदायी अस नात तयार करा. अस नात जिथे मुलांना तुम्हाला काहीही झालं तरी मोकळेपणाने सांगता आल पाहिजे. आई वडील जर खूप कडक असतील, मुलांचं त्यांच्याशी नीट नात नसेल तर मुल या सर्व गोष्टी मनातच दाबून ठेवतात आणि त्याचा त्रास त्यांना पुढे भोगावा लागतो. म्हणून आपल्या मुलांचे चांगले मित्र व्हा.
तसच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना समजू लागल्यापासून त्यांच्या शरीराची ओळख करून द्या. आपलं शरीर आपण कस सांभाळायचं, चुकीचा स्पर्श कसा ओळखायचा तसच स्व संरक्षण कसं करायचं हे पालकांनी मुलांना शिकवायच आहे. कारण आपण २४*७ त्यांच्यासोबत असू शकत नाही.
त्यामुळे ती जेव्हा बाहेर असतील तेव्हा त्यांना आपलं रक्षण कस करायच हे माहीत पाहिजे. आणि काहीही झालं तरी त्यांनी तुम्हाला येऊन आधी सांगितल पाहिजे अस नात पालकांनी तयार केलं पाहिजे. लक्षात घ्या सुरवातीचा काळ जो मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यावेळी तुम्ही त्याच्यासोबत रहा. नंतर अख्खं आयुष्य एकट्याने पेलण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येईल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
