Skip to content

प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंब तुमच्या नियंत्रणात असण्याची काही गरज नसते.

प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंब तुमच्या नियंत्रणात असण्याची काही गरज नसते.


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


कुटुंब जिथे आपली माणसं असतात. जिथे आपण वेगवेगळे असूनही एक असतो. म्हणूनच तर याला कुटुंब असे म्हटले जाते. ज्यामध्ये आपले आई, बाबा,आजी आजोबा, भावंडं, काका काकू अशी अनेक नाती अंतर्भूत असतात. आताच्या काळात फक्त आई बाबा आणि मुल अस चित्र दिसत असल तरी अनेक ठिकाणी अजून एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते. एक सुदृढ कुटुंब आपला फार मोठा आधार असते. जे आपल्याला कधी एकट पडू देत नाही. ज्यात निर्णय वेगवेगळे असेल तरी त्यात एकमत आणायची ताकद असते. अश्या या कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा काहीतरी रोल निभावत असते, भूमिका पार पाडत असते.

पालक म्हणून झालच पण त्यापलीकडे काही भूमिका या ठरलेल्या असतात. ज्यातून कोणी कोणता निर्णय घ्यायचा, घर कसं चालवायचं, मुलांना सांभाळणे या सर्व गोष्टी येतात.

आता हे सर्व करत असताना प्रत्येक कुटुंबात अशी एखादी व्यक्ती असते जी घरातील प्रमुख असते. जिच्या मार्फत घर चालत असत. त्या व्यक्तीचा शब्द हाच अखेरचा शब्द मानला जात असतो. बरेचदा हे स्थान घरातल्या कर्त्या पुरुषाकडे असते. तसेच एकत्र कुटुंब असेल तर आजोबा, आणि यांच्याकडे तो हक्क असतो. घराच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत कोणतेही निर्णय असतील तर ते त्यांना विचारून घेतले जातात. त्यांच्या परवानगी शिवाय काहीही होत नाही. अस केलं तर तो त्यांचा अपमान मानला जातो. अशी बरीच कुटुंब असतात जिथे मुलींना शिकायला पाठवयाचे असेल, ट्रीप असेल किंवा अगदी कपडे असतील त्याची परवानगी घ्यावी लागते. हे मुलांच्या बाबतीतही होत. घरचा बिझनेस वैगरे असेल आणि मुलांनी समजा वेगळं काहीतरी करायचं ठरवलं तरी ते आधी घरातल्या मोठ्यानं सांगावं लागत, त्यांची परमिशन घ्यावी लागते.

यातून या व्यक्तींमध्ये नकळत एक नियंत्रणाची भावना निर्माण होते. कोणीही आपल्या शब्दाबाहेर जाऊ नये, आपला शब्दाचं शेवटचा असला पाहिजे, जे काय होईल ते माझ्या म्हणण्यानुसार व्हायला पाहिजे अशी एक विचारसरणी तयार होते. मोठ्यांचा मान राखला पाहिजे, कुटुंबाला एकप्रकारची शिस्त असली पाहिजे या हेतूनं तयार केलेलं हे नियम या अपेक्षा एक मर्यादेनंतर अट्टाहास, आग्रह बनून जातात. त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं की लगेच घरात वाद निर्माण होतात. पण हे होण स्वाभाविक आहे. कारण आपल्याला कितीही वाटलं तरी आपण कोणाला नियंत्रणात ठेवू शकत नाही.

जरी आपलं कुटुंब आपलं सर्व म्हणणं ऐकत असल तरी त्यामागे कारण वेगळी असतात. तो आदर असतो. ते प्रेम असत. पण याचा अर्थ आपण आपल्या पूर्ण कुटुंबाला नियंत्रणात ठेवू शकतो असा होत नाही. अस झाल आणि सर्व ऐकत असेल तरी तो एकप्रकारचा दबाव होऊन जातो. आपण आपले निर्णय त्यांच्यावर अनेकदा लादतो. ज्यातून त्रासच होतो. आणि आपलं ऐकलं नाही की आपल्याला त्रास होतो. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणालाही कंट्रोल करू शकत नाही. कारण कुटुंब असल तरी प्रत्येकाचे स्वभाव, विचार, भाव भावना वेगळ्या आहेत. थोडक्यात प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. आपल्याला एखादी गोष्ट पटत असेल ती समोरच्याला पटेलच अस नसत. त्यामुळे आपण कोणावरही, मग ती व्यक्ती असुदे किंवा परिस्थिती नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि अस असण्याची काही गरजही नसते. दर वेळी माझा कुटुंब माझ्या नियंत्रणात असल पाहिजे असा आग्रह तरी आपण का करावा? प्रत्येक व्यक्तीला स्वतःची बुद्धिमत्ता आहे, मत आहेत. त्यानुसार ते योग्य प्रकारे वागू शकतात.

अगदी सोप उदाहरण घेऊ, वाळू आपण जितकी घट्ट पकडतो तितकी ती मिठीतुन निसटते. वाळूला जर मुठीत ठेवायच असेल तर अलगद धरावं लागत. तसच कुटुंब एकत्र बांधून, जपून ठेवायच असेल तर आपलं मन हे नियंत्रण ठेवणार नसून विश्वास, पाठिंबा देणार असावं लागत. ह्याचीच अपेक्षा कुटुंबाला असते. आणि यालाच प्रभाव टाकण अस म्हणतात. आपण कितीही एकत्र असलो तरी प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व असत. मग ते लहान मुल असल तरी. त्याचा आदर करून आपण तस वागावं लागत. अश्या विश्वास आणि मायेच्या धाग्यांमध्ये ही नाती गुंफावी लागतात. चुकीचा निर्णय घेतला जात असेल तरी समोरच्याला त्रास न होता आरसा दाखवावा लागतो आणि योग्य निर्णयासाठी मार्गदर्शन करावे लागते. अस केल तर शक्यता जास्त असते व्यक्तीने ऐकण्याची. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण कोणालाही कंट्रोल करू शकत नाही. पण आपण आपल्या चांगल्या गुणांनी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!