Skip to content

कुटुंब एकत्र जेवायला बसतं तेव्हा दिवसभराचा तणाव कमी होतो, हे खरंय का?

कुटुंब एकत्र जेवायला बसतं तेव्हा दिवसभराचा तणाव कमी होतो, हे खरंय का?


पुजा सातपुते


आज हा लेख लिहताना जाणीव झाली, कधी कधी आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना किती ग्रांटेड घेतो ना. आपल्याला असं वाटतं ही लोकं कुठे जाणार, ती तर कायम आपल्या पाशीच आहेत. मग काय सारखं सारखं वेळ घालवायचा यांच्याबरोबर. असा विचार करून आपण आपल्या लाइफ मध्ये इतके बिझी होऊन जातो कि एके दिवशी जेव्हा आपल्याला आपलं मन मोकळं करावसं वाटतं तेव्हा वेळ आणि ही माणसं दोघेही निघून गेलेली असतात आणि मग आपल्याला आपलं कुटुंब किती महत्वाचं आहे याची जाणीव होते.

पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धत होती, काही घरात आजही आहे. त्या काळी लोकं हवी हवीशी वाटायची, कामं एकत्र मिळून करायची , एकत्र सण साजरा करणं, जेवायला बसणं, हसणं खिदळणं यात वेळ कसा जायचा कळायचं सुद्धा नाही. जेवण करताना गप्पा गोष्टी, आपल्या पूर्ण दिवसाचा कार्यक्रम सांगणं, कधी दिवस खराब गेला तर मन मोकळं करणं, थोडे धीराचे शब्द ऐकल्यावर जीवात जीव येणं, चुकलं असेल तर हक्कानी रागावून समजावणं, हे जे कोणी अनुभवलं असेल आणि अनुभवत असेल त्यालाच याची कदर असणार.

नंतर काही वर्षांनी विभक्त कुटुंब पद्धत सुरु झाली. यात गैर असं काही नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यामुळे कुटुंबातील सदस्य कमी झाले. मग वेळ कमी पडायला लागला. कधी कामामुळे तर कधी कुठल्या कारणाने आणि मग कोणाचाच कोणाला पायपोच नाही. उशिरा घरी येणं, आपापल्या सोईनुसार वागणं, ना जेवायला एकत्र, ना बोलायला कोणाला वेळ. यामुळे आपलं मनातलं सांगायला कोणी नाही आणि मग त्याकारणाने नेगेटिव्ह इमोशन्स वाढणं, डिप्रेशन येणं हे साहजिकच आहे.

पूर्वी आपल्या घरी कोण ना कोण तरी मोठी माणसं असायची जी आपल्याला समजून घ्यायची, मार्गदर्शन करायची, ज्याच्यासमोर आपण आपलं मन मोकळं करायचो. एकत्र जेवणाचा नियमच असायचा आणि मोठ्यांच्या धाकापाई आपल्याला तो पाळावाच लागत असे. पण ती वेळ किती महत्वाची होती याची जाणीव आज होत आहे.

कुटुंब जेव्हा एकत्र जेवायला बसतं तेव्हा दिवसभराचा तणाव किती कमी होतो ना. आपले जे काही टेन्शन आहे ते मन मोकळेपणानी बोलू शकतो, आपला आनंद साजरा करू शकतो, हसणं खिदळण्यामुळे कसा आपला ताण तणाव निघून जातो हे कळत सुद्धा नाही. आपण कितीही कन्फयुज असो आपलं कुटुंब जर आपल्या जवळ असेल तर सगळं सोप्पं वाटायला लागतं. कितीही भांडणं झालीत तरी आपली माणसं, आपलं कुटुंब कधीच आपल्याला सोडून जात नाही. वाद, मतभेद होतात आणि ती झालीच पाहिजे नाहीतर काय मज्जा आयुष्यामध्ये, पण हे होऊनही जे आपल्याला सोडून जात नाहीत तीच खरी नाती.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला वेळ देत असतील तर स्वतःला लकी माना आणि हे कायम स्वरूपी जपा. पण जर काही कारणामुळे आजपर्यंत तुम्हाला वेळ द्यायला जमलं नसेल तर आत्ता पासून सुरु करा. एकत्र कुटुंब असो किव्हा विभक्त. फार काही नाही तर एकत्र जेवणाचा, बाहेर फिरायला जाण्याचा किव्हा अशाच गप्पा गोष्टींचा बेत बनवा. रोज नाहीतर वीकएंडला तरी. बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किती बरं वाटेल, तुमचं टेन्शन निघून जायला नक्कीच मदत होईल. कामामुळे कधी कधी आपण आपल्या जवळच्या लोकांना वेळ देऊ शकत नाही पण 24 तासापैकी 1 तास जरी तुम्ही त्यांच्याबरोबर घालवला तर तुम्हाला तुम्ही आज पर्यंत काय मिस करताय याची नक्कीच जाणीव होईल.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्या कुटुंबा सोबत योग्यप्रमाणे घालवा. आपल्या जवळच्या लोकांना ग्रांटेड घेऊ नका. आनंदी राहा, हसत राहा आणि प्रत्ये्यक क्षणाचा योग्य वापर करा. आपला वेळ आणि आपली जवळची माणसं आपल्या पासून दूर जाऊ देऊ नका. त्यांना जपा आणि त्यांच्या बरोबर त्यांचा हक्काचा वेळ घालवा आणि बघा तुमचं आयुष्य उठावदार व्हायला किती मदत होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!