Skip to content

क्षणभरासाठी आवडलेल्यांना लगेचच आयुष्यभरासाठी आपलंस करून घ्यायचं नसतं.

क्षणभरासाठी आवडलेल्यांना लगेचच आयुष्यभरासाठी आपलंस करून घ्यायचं नसतं.


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


काही माणसे जेव्हा आपल्या आयुष्यात येतात , तेव्हा लगेच ती आपलीशी वाटू लागतात , एक खूप छानसा bond तयार होतो आपला त्यांच्याशी. आणि काही माणसे वर्षानुवर्षे आपल्या अवतीभोवती असतात , आपण त्यांच्या आणि ते आपल्या सहवासात असतात पण त्यांच्याबद्दल ‘आपलीशी ‘ अशी भावना कधीच येत नाही , कोणत्याही प्रकारचा जिव्हाळा आपल्याला त्यांच्याबद्दल वाटत नाही .

रक्ताच्या नात्याची माणसे कधी – कधी पाठ फिरवताना दिसतात आणि एखादा नुकताच भेटलेला व्यक्ती किती सहजपणे मदत करून जातो , अशी अनेक उदाहरणे आपल्याला जगात पाहावयास मिळतात.

नुकतीच जीवनात आलेली माणसे , ज्यांच्याबद्दल अल्पावधीतच जिव्हाळा , प्रेम वाटू लागतं अशी माणसे फार कमी भेटतात. तरीसुद्धा खूप जिव्हाळा वाटतोय किंवा आपलेपणा वाटतोय म्हणून लगेच घाईघाईत त्यांना आपलंसं करून घेऊ नये. ठराविक वेळ जाऊ द्यावा. माझं म्हणणं असं नाही की , ती माणसे वाईटच असतील , वाईट असो वा चांगली ते आपल्याला वेळ आल्यावर कळतंच .

पण जर आपण सावधतेने आणि धीराने घेतलं तर आपलं काहीच नुकसान होत नाही. त्यामुळेच असं म्हणतात की , Don’t make a permanent decision based on temporary emotions म्हणजेच क्षणिक वाटणाऱ्या भावनांवरून कोणतेही निर्णय घेऊ नयेत.

कधी-कधी एखाद्या क्षणी एखादी गोष्ट , एखादी व्यक्ती खूप योग्य वाटते. त्या क्षणी सर्व बाजुंनी विचार करून पहिला तरी सर्व योग्य भासत असतं . पण नंतर मात्र त्या गोष्टीतले , व्यक्तीतले बाकीचे असे काही point दृष्टीस येतात , कधी अनुभवाने तर कधी आपल्यावरचा त्यांचा प्रभाव कमी झाल्याने , की त्यावेळी आपण जो निर्णय घेतला त्याचा पच्छाताप व्हायला लागतो.

यात चूक ना आपली असते ना त्या व्यक्तीची पण अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत तर परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात . क्षणभराच्या भावनेला भुलून आपण आपल्यावर नको तेच ओढवून घेतो .

आपण एखाद्या व्यक्तीला ‘ आपलंसं ‘ करतो म्हणजे नक्की काय करतो? मनापासून ज्याला आपण ‘आपलं’ मानतो , त्या व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास ठेवतो. त्याची मदत करणे , त्याच्या सुख-दुःखात सामील होणे या सगळ्या गोष्टी करणे हे आपण आपले कर्तव्य समजतो . पण ज्या व्यक्तीला आपण ‘आपलं’ मानतो , तिच्या आयुष्यात आपलं स्थान काय आहे हे आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याचा विचारही करत नाही.

आणि जेव्हा कळतं तेव्हा जर् त्या व्यक्तीच्या मनात सेम भावना नसतील , किंवा सेम स्थान नसेल जे आपण त्यांना देतो किंवा आपण त्यांना फार महत्वाचे वाटत नसू तेव्हा आपले डोळे उघडतात , फार वाईट वाटत . आता एवढीच परिस्थिती असेल तरी एक वेळेस आपण समजून घेऊ शकतो पण जर ती व्यक्तीच फ्रॉड निघाली तर मात्र तिने आपला गैरफायदा घेतल्याची भावना आपल्याला जास्त त्रास देते. दुःखापेक्षा फसवणूक झाल्याची भावना जास्त त्रासदायक ठरते .

माणूस भावनेच्या आहारी गेला की logically विचार करणारा मेंदूचा भाग बंदच झाला म्हणून समजा . आणि logical part बंद झाला की , आपल्याला समोरच्या त्या व्यक्तीतले किंवा वस्तूतले फक्त चांगले गुण किंवा भाग नजरेस पडतात. त्याचे अवगुण आपल्या भावना बरोबर गाळून वेगळ्या करून टाकतात आणि पृष्ठभागावर फक्त चांगल्याच गोष्टी दिसतात.

पण जेव्हा त्या भावनांच्या प्रभावातून आपण बाहेर पडतो तेव्हा मात्र आपल्याला प्रश्न पडतो की , हे सगळं माझ्या तेव्हाच कसं लक्षात नाही आलं? तेव्हाच जर् कळलं असतं तर आज मी इथपर्यंत आलेच नसते .

आपल्या भावना , मग त्या कोणत्याही का असेनात , व्यक्ती , वस्तू , घटना , विचार , कशाही बद्दल का असेनात लगेच त्यांच्या प्रभावाखाली न येता थोडासा धीर धरून , विचार करून निर्णय घेतला तर मनस्तापापासून , त्रासापासून किंवा काही चुकांपासुन आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो .


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “क्षणभरासाठी आवडलेल्यांना लगेचच आयुष्यभरासाठी आपलंस करून घ्यायचं नसतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!