क्रोध मनात साठवून ठेवू नका,नाहीतर होतील हे परिणाम !
हर्षदा पिंपळे
राग ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे.खरं तर राग ही वाईट भावना आहे असं नाही.आपल्या विचारांमुळे त्या त्या गोष्टीला सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूप प्राप्त होत असतं.रागाचही अगदी असच आहे. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध घडली तर आपल्याला अनेकदा राग येतो.पण प्रत्येकजण हा राग व्यक्त करतोच असं नाही.कित्येक लोकं राग आला तर सरळ सरळ स्पष्टपणे व्यक्त करतात तर कित्येक लोकं हा राग मोकळेपणाने व्यक्तही करत नाही.वारंवार येणारा राग या व्यक्ती मनात साठवून ठेवतात.रागामुळे स्वतःला मानसिक त्रास करून घेतात.आणि याच मानसिक त्रासाचा परिणाम शरिरावरही होत जातो.त्यामुळे राग साठवून ठेवणं योग्य नाही.तो वेळीच व्यक्त करायला हवा.अन्यथा त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.
जसे की,
*मानसिक संतुलन बिघडणे-
क्रोध मनात ठेवणे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.मनामध्ये एकदा का क्रोधाची साठवणूक झाली की मन कोंडायला सुरुवात होते. मनाची घुसमट वाढत जाते.एखाद्या प्रेशर कुकरसारखी मनाची अवस्था होते.यामुळे कशातच लक्ष लागत नाही.मनाची शांतता यामुळे अक्षरशः भंग होते.थोडक्यात सांगायचे झाले तर मानसिक संतुलन यामुळे निश्चितच बिघडू शकते.
*योग्य आहाराकडे दुर्लक्ष होणे-
आपल्या आयुष्यावर किंवा आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे आहार.आपला आहारच व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम शरिरावर होतो.आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये रागाची प्रचंड प्रमाणात साठवणूक असते त्यावेळी तर आपलं आहाराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होतं.एकतर “इच्छा नाही” असं म्हणत कित्येकदा जेवण टाळलं जातं.किंवा अनियंत्रितपणे खाल्ल जातं.आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत राहतात.
*चहा/कॉफीचे अतिसेवन-
मनात राग असताना डोकं जागेवर असणं शक्यच नाही. कित्येकदा डोकं दुखीचं कारण पुढे करून चहा/कॉफीचे अतिरिक्त सेवन केलं जातं.आणि जे की शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतं.
*झोपेवर विपरीत परिणाम-
माणसाच्या मनात विचारांच सत्र चालूच असतं.आणि जर कुणाविषयी मनात राग असेल तर माणसाला त्या दिवशी सहसा झोपही लागत नाही.राग मनात साठवून ठेवला की नैराश्य काही लांब नाही.रात्र रात्र त्यामुळे कैकदा झोपही लागत नाही. विचार करून करून, स्वतःला त्रास करून घेऊन झोप कायमची उडते.सकाळ होत येते तरी कित्येकजण झोपतच नाहीत. आणि नंतर मात्र उशिरा उठायची सवय,निद्रानाश यांसारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.
*शारीरिक संतुलन बिघडणे-
मानसिक संतुलन बिघडलं की शारीरिक संतुलन बिघडायला फारसा वेळ लागत नाही.मनाचं असंतुलन,निद्रानाश, अयोग्य आहार यामुळे शरिरावरही वाईट परिणाम होतात.शुगर, ब्लडप्रेशर,छातीत दुखणे/धडधडणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना आमंत्रण मिळतं.मनाच्या दुखण्याबरोबरच शरिराच दुखणंही मागे लागतं.
*आत्मविश्वास ढासळणे –
राग आला की एखादी गोष्ट आपण जितक्या वेगाने जितक्या कॉन्फिडन्टली करतो तितक्याच वेगाने आपण जर राग साठवून ठेवला तर आपला आत्मविश्वासही ढासळू शकतो.
* नकारात्मक बदल होणे –
मनात क्रोध साठवून ठेवला की त्याचं विष व्हायला वेळ लागत नाही.अशा क्रोधाच्या साठवणूकीमुळे मनावर नकारात्मक बदल घडून येतात.मन नकारात्मक विचार करायला प्रथम प्राधान्य द्यायला सुरुवात करतं.आपलं वागणं/बोलणं हळुहळू नकारात्मक व्हायला सुरुवात होते. चांगल्या गोष्टींनाही आपण बऱ्याचदा नकारात्मक प्रतिसाद देतो.
*संवादाची कौशल्ये बिघडत जातात.संवाद कोरडा पडायला सुरुवात होते.
*आवडीच्या गोष्टींवरचा /छंदावरचा/कामावरचा फोकस पूर्णपणे हालायला लागतो.यामुळे आयुष्य निरस वाटायला लागतं.
*काही वेळा तर सूडवृत्तीचा उगम व्हायलाही सुरुवात होते.मन विध्वंसक वृत्तीच बनत जातं.
खरं सांगायच झालं तर यामुळे आयुष्यच एकप्रकारे उध्वस्त होऊ शकतं.त्यामुळे शक्यतो रागाला साठवून ठेवण्यापेक्षा हळुहळू का होईना व्यक्त करायला शिका.त्या रागाला मोकळा श्वास घेऊद्या. रागाला असं सातत्याने कोंडून ठेवलं तर त्रास वाढत जाऊन नवीन समस्या निर्माण होतील.आणि समस्या वाढत गेल्या की पुन्हा पुन्हा त्रासा हा वाढत जाणार.
म्हणून रागाला वेळीच व्यक्त करा.आणि तेही अगदी सर्जनशील पद्धतीने ! कारण ,आपटून धोपटून आपलच नुकसान होणार असतं.स्वतःलाच त्रास होणार असतो.त्यापेक्षा रागाला व्यक्त करण्यासाठी काहीतरी नवीन आणि क्रिएटीव्ह पद्धत वापरून पहा.ते सगळ्यांच्याच हिताच ठरेल.
राग कंट्रोल होत नाही मान्य आहे पण तो असा एकदम चुकीच्या पद्धतीने बाहेर काढणे आणि साठवून ठेवणे दोन्हीही खरं तर अत्यंत चुकीच आहे. तो मोकळ्या मनाने व्यक्त करता यायला हवा.योग्य पद्धतीने बाहेर काढता यायला हवा. नसेल जमत तर ते कसब नक्की शिकून घ्यायला हवं. अन्यथा परिणाम गंभीर होतील यात शंका नाही.
So..विचार करा आणि anger management वर लक्ष द्या.आयुष्य सुंदर आहे ते मोकळेपणाने जगा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

या लेखाबरोबर विधायक पध्दतीने राग व्यक्त करण्याच्या पध्दती किंवा मार्ग सांगितले तर वाचकांना मार्गदर्शन होऊ शकेल.MM