कोणतीही व्यक्ती स्वतःहून कधीच दुःख ओढावून घेत नाही, तिच्या आयुष्यात प्रसंगच तसे घडलेले असतात.
हर्षदा पिंपळे
सुख पाहतां जवापाडे
दुःख पर्वताएवढे…।। (संत तुकाराम)
जन्मापासून ते मरणापर्यंत माणूस हा नेहमीच त्याच्या सुखासाठी झटत असतो.सुख गेलं की आयुष्यात दुःख हे येतच असतं.माणसाच्या आयुष्यात सुख-दुःखाचा पाऊस पडतच असतो.प्रत्येकालाच सुख हवहवसं असतं.आयुष्यात वारंवार दुःखाच्या झळा सोसायला कुणालाही आवडत नाही.एकवेळ सुखाच्या मागे माणसं धावतातही परंतु दुःखाच्या मागे कोणी धावत नाही. कोणतीही व्यक्ती स्वतःहून कधीच दुःख ओढावून घेत नाही. खरं तर त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रसंगच तसे घडलेले असतात.स्वतःला दुःख ओढावून घ्यायला कुणाला आवडेल बरं…..?
माणसाच्या आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं.नैराश्य, आरोग्याशी निगडित समस्या,अतिचिंता,दारिद्रय, कौटुंबिक कलह,आर्थिक विवंचना, अपुऱ्या इच्छा, अन्याय-अत्याचार, एखाद्या व्यक्तीचं अचानकपणे सोडून जाणं,अपंगत्व येणं,जन्मतःच दृष्टी नसणे,वाचा नसणे वगैरे अशी असंख्य दुःख माणसाच्या आयुष्यात असतात. आता ही दुःखं मनुष्य नेहमीच हाताने ओढवून घेत नाही.
काही व्यक्तींना काही व्याधी अनुवंशिकतेमुळे जडलेल्या असतात. तर काहींना आहार-निसर्गातील हवामान वगैरे यांच्यामुळे व्याधी जडतात.आजारपण कुणालाच आवडत नाही. रोज रोज सलाईन नी औषध गोळ्या खायला इथे कुणीच तयार नाही.शरिराला रोज रोज सुया टोचवून घेणं सोपं नाही.आजारपण हे एखाद्या दुःखासारखच आहे.
एखादा अपघात झाला ,पडलं-झडलं तर अनेकदा त्या व्यक्तीला बोललं जातं की हाताने दुखणं ओढवून घेतलय वगैरे. पण नेहमीच असं असतं असं नाही.कारण सगळ्यांनाच काय दुःख स्वतः ओढवून घ्यायची हाउस मुळीच नसते.अनेकदा समोरची व्यक्ती व्यवस्थित गाडी चालवत नाही. तर कधी कधी रस्त्याची दुरवस्था, किंवा कधी कधी नैसर्गिक अडचणींमुळेही या गोष्टी घडतात.तेव्हा अपघात होतो.शरिराला जखमा होतात.
एखादा कार अपघात असो वा काही नैसर्गिक आपत्ती असोत किंवा विमान कोसळणं असो वा अजून काही. कधी कुणी यामध्ये जखमी होतं तर कुणी मृत्युमुखी पडतं.आपली व्यक्ती गेली याचं दुःख प्रत्येकाला असतं.यामध्ये नेहमीच त्या व्यक्तीची चुक असते असं नाही.परंतु त्या घडलेल्या प्रसंगामुळे अशी दुःखं त्यांच्या आयुष्यात येतात.
आर्थिक चणचण नाही म्हंटल तरी कित्येकांच्या आयुष्यात असतेच.कुणी यासाठी चोरी करतं तर कुणी दिवसरात्र घाम गाळून कष्ट करतो.कुणाचा पैशासाठी घातही केलाही जातो.यातून वेगवेगळी संकटं/दुःख माणसावर ओढवतात.ते माणसाच्या जीवावर बेतलं जातं.
कुणावर अन्याय-अत्याचार होतो.तर तो काही स्वतःहून ओढवून घेतलेला नसतो.कुणी अन्यायाविरुद्ध लढा देतो तर कुणी नाही.अनेकदा चांगल्या गोष्टीसाठी वेळच लागतो.न्याय मिळेपर्यंत अन्यायाच दुःख सलतच असतं.लवकर न्याय मिळत नाही यात त्या व्यक्तीचा तरी काय दोष…???
अशा अनेक गोष्टी घडतात. त्या स्वतःहून ओढावून घेतलेल्या नसतात.त्यामागे कितीतरी गोष्टींचा संबंध असतो.माणसाच्या आयुष्यात तसे प्रसंग घडत असतात. माणूस स्वतःहून दुःखाला भेटायला जात नाही. वेगवेगळ्या प्रसंगातून जसं सुख माणसाच्या आयुष्यात पिंगा घालतं अगदी तसच विविध वाईट प्रसंगांमुळे दुःख माणसाच्या आयुष्यात येरझारा घालत असतं.
सांगायचा उद्देश इतकाच की, दुःखीकष्टी असलेल्या माणसाला तुझ्या कर्माने दुःख ओढावलं असं सातत्याने बोलू नये.कारण नेहमी मनुष्य चूकतो असं नाही. याऊलट त्या माणसाच्या आयुष्यात घडलेले प्रसंग समजून घ्या.देता आलाच तर आधाराच हात पुढे करा.नाहीतर उगाचच त्याच माणसाला दोष देत बसू नका. त्यांच्या आयुष्यात उगाचच अंधार पसरवायला जाऊ नका.
कारण तुमच्यावरही कधी अशी परिस्थिती, असे प्रसंग ओढवू शकतातच.आज आपण बुडत्याला आधार दिला तर उद्या आपल्याला आधार देणारे हात निश्चितच कमी नसतील. कारण दुःख सांगून कधीच येत नाही.आज आपल्या आयुष्यात तर उद्या अन्य कुणाच्या आयुष्यात ते शिरकाव करत असते. नियती ही जेव्हा घात करायचा तेव्हा करते.
म्हणून कुणाच्या दुःखावर हसू नका.आणि कुणाच्या सुखावर जळूही नका. आज दुःखाची जागा दुसरी असेल पण उद्या तीच जागा तुमचीही असू शकते.
प्रत्येक माणूस त्या त्या प्रसंगातून जातो.स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो.सुखासाठी झटताझटता त्याला दुःखाचे पल्ले पार करायलाच लागतात. त्याच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नसतो. त्यातूनच माणूस घडत जातो.दुःखाला भिडत भिडत तो सुखाचा किनारा एक दिवस गाठतोच.
त्यामुळे आलेल्या प्रसंगातून शिकत रहा.सुख-दुःखाचा प्रवास करत रहा.आयुष्य भरभरून जगता येईल तितकं जगत रहा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very good
Very nice..