कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली की ती विष बनते.
गीतांजली जगदाळे
अति तिथे माती !!
ही म्हण आपण जीवनात कधी ना कधी ऐकलेलीच असेल. किती तथ्य आहे ना या म्हणीत ! या म्हणीनुसार अति लोभ करू नये असा त्याचा अर्थ आहे . पण या ठिकाणी कोणतीही गोष्ट अति झाली किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात केली किंवा मिळाली तर तिची माती होते किंवा विष बनतं , म्हणजेच काय तर ती आपल्या काहीच उपयोगाची राहत नाही , पण त्याचा अपव्यय मात्र नक्कीच होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ठरतो. मुलांचे संगोपन करताना त्यांचे वाजवीपेक्षा अति लाड करणे किंवा त्यांना अति धाकात ठेवणे याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो एकतर ती फार हट्टी बनतात नाहीतर गोष्टी लपवून ठेवायला शिकतात . म्हणूनच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्याचा समतोल राखणे हे पालकांचे कर्तव्य असते.
जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट नसते तोपर्यंत ती आपल्याला हवी असते, मग ज्याक्षणी आपल्याला ती मिळते त्याक्षणी आपल्याला फार आनंद होतो आपण देवाचे आभार मानतो , पण त्यानंतर काही दिवसातच याचा आपल्याला विसर पडतो आणि आपण मिळालेल्या गोष्टींना गृहीत धरू लागतो. हा मानवी स्वभावच आहे त्याला कोणी अपवाद आढळणं मुश्कीलच आहे. त्यात एखादी गोष्ट अति प्रमाणात , गरजेपेक्षा जास्तच मिळाली तर त्याबाबतीत आपलं वागणं कसं बरं असेल?
काळजी ,प्रेम यासर्व चांगल्या भावना आहेत. ज्या प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटतात. म्हणजे आपण कोणाची काळजी करण्यापेक्षा कोणी आपली काळजी करणारं असेल तर आपल्याला हवं असतं , त्याचप्रमाणे कोणी आपल्यावर प्रेम करत असेल तर ते ही आपल्याला हवं असतं . पण जेव्हा याच गोष्टी अति प्रमाणात केल्या जातात , किंवा आपल्याला मिळत जातात तेव्हा त्यानेही गुदमरून जायला होतं . म्हणजे जे प्रेम मिळाल्याने आपल्याला आधी आपण भाग्यवान वाटत असतो त्याच प्रेमाने, काळजीने नको-नको होऊ लागत.
आपली space मिळत नाहीए असं वाटू लागत , आणि समोरच्याच जग फक्त आपल्याच भोवताली फिरत याच जे आधी कौतुक वाटत असत , तेच आता जीवघेणं वाटायला लागतं . हे अति प्रेम , काळजी किंवा कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त करणाऱ्या माणसांना त्रासाशिवाय दुसरं काहीच देत नाही. आपण ज्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरून , झोकून देऊन सगळं करतो तीच व्यक्ती आपल्याला नीट वागवत नाही असं वाटायला लागतं . कोणतीही गोष्ट असो मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक गरजेपेक्षा जास्त झाली कि तिने त्रासच होतो.
अति कष्टानमुळे देखील शरीराला त्रास होतो , गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यास पचायला जड जाते त्यानेही त्रास होतो , एखाद्याचा अत्यंत द्वेष करण्यानेदेखील आपली मनःशांती भंग पावते याचाच अर्थ काय तर कोणतीही गोष्ट लिमिट मध्ये , एका मर्यादेतच चांगली वाटते आणि तिचा आपल्याला उपयोग सुद्धा होतो.
पावसाचंच उदाहरण आपण बघुयात. अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ पडतो , पूर येतो , अनेक जीव जातात , अन्न -धान्याची नासाडी होते. तेच पाऊसच पडला नाही तरीदेखील अन्न पिकत नाही , जनावरांना पाणी न मिळाल्याने त्यांचे हाल होतात , कित्तेक जीव जातात . पण तेच जर योग्य प्रमाणात पाऊस पडला तर सगळीकडे हिरवळ दाटून येते अन्नधान्याने भरभराट होते, आपली पृथ्वी जणू नंदनवन च भासू लागते.
म्हणजेच काय कोणतीही गोष्ट गरज असेल तेवढीच असायला हवी . आता तुम्ही म्हणताल प्रेम काय असं मोजून मापून करता येतं का? नक्कीच नाही . पण तरीदेखील आपण काय करतो कसे वागतो याकडे लक्ष दिले असता आपल्याला खूप गोष्टी लक्षात येत असतात. याचाच अर्थ कोणत्याही भावनेच्या भरात वाहवत न जाता भावनेला विचारांचीही जोड गरजेची असते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला