कोणतीही गोष्ट भीतीने केली की त्यामध्ये काहीतरी राहून जातंच.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
गणेशचा ऑफिसचा आज पहिलाच दिवस होता. त्याची मुलाखत उत्तम पार पडली होती व लगेच त्याला जॉईन व्ह्यायला सांगितले होते. गणेशला त्याच्या विषयातले चांगले ज्ञान होते, तो हुशार होता फक्त त्याची एकच कमजोरी होती ती म्हणजे त्याला अचानक काही करायला सांगितले तर तो घाबरून जायचा. आता एखाद काम दिले आहे आणि त्याला करून देण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ आहे अस सांगितल तर तो छान काम करे. काही कसूर ठेवत नसे. पण तेच जर आता लगेच मला हे काम पूर्ण करून हवे आहे अस कोणी सांगतील तर मात्र त्याची भंबेरी उडून जायची.
नेमक तेच आज ऑफिसमध्ये झालं. बॉसने त्याला एक काम दिल जे दोन तासात पूर्ण करून द्यायचे होते. आता ऑफिस जॉईन केल्यावर काम हे करायलाच लागणार याची त्याला कल्पना होती. पण पहिल्याच दिवशी अस time bounded काम मिळेल अस त्याला वाटल नव्हत. बॉस समोर तो कसतरी हो म्हणाला. कारण काही पर्यायच नव्हता. पहिल्याच कामाला तो नाही म्हणू शकत नव्हता. तो फाईल घेऊन आपल्या टेबलवर येऊन बसला.
दोन तासात काम करायचे आहे, ते पूर्ण होईल की नाही, त्यासाठी आपण कशी सुरुवात करायची हे सर्व बाजूलाच राहिलं. गणेश आधीच या विचाराने घाबरला की मला कसही करून हे काम आताच पूर्ण करायचं आहे. सुरुवात करायच्या आधीच माझ्याकडून काही हे दोन तासात पूर्ण होत नाही, आज पहिलाच दिवस त्यात जर मला वेळ झाला तर बॉस रागावणार, माझी इमेज खराब होणार असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. होता नव्हता तो कॉन्फिडन्स कमी झाला. आणि काम पूर्ण करायच्या नादात त्याने घाई करायला सुरुवात केली.
या भीतीने की पूर्ण झाल नाही तर आपण ओरडा खाऊ. आणि याचा परिणाम कामावर झालाच. कारण भीती पोटी तो ते काम लवकर कसं संपवता येईल हे पाहत होता. पण आपण ते कितपत नीट करतोय? त्यात बारीक सारीक काही चुका राहिल्यात का? त्यातले तपशील याकडे त्याने लक्षच दिलं नाही. फक्त मला हे दोन तासात कसही करून पूर्ण करायचच आहे असा विचार डोक्यात ठेवून त्याने ते काम कसंबसं केल.
जेव्हा तो बॉससमोर गेला तेव्हा व्हायचं तेच झालं. फाईल मध्ये खूप चुका झाल्या होत्या, त्यांना हे देखील समजलं होत पूर्ण करायच्या नादात त्याने घाई केली होती. पण त्याला बॉस काहीही बोलले नाहीत. कारण त्यांना माहीत होत की पहिल्या दिवशी अस होत. त्यांनी गणेशला समोर बसवून सांगितलं की “अरे, मी जरी दोन तासात काम पूर्ण कर बोललो असलो तरी अस कुठे म्हटल नव्हत की अगदी त्याच वेळेला मला दिलं पाहिजे. तुझा पहिला दिवस आहे,
अजून तुला कामाचा अनुभव नाही त्यामुळे वेळ जरा मागे पुढे होऊ शकतो. आपण वेळ का देतो कारण शिस्त लागावी म्हणून! पण तू तर घाबरूनच गेलास. अस घाबरत कोणत काम केलं तर चुका होणार. तू इतका हुशार आहेस, पण या भीतीने मागे पडशील. तुझ्यात आत्मविश्वास देखील आहे, तू काम नीट करू शकतो हे मला माहीत आहे पण ह्या सर्व गोष्टी योग्य वेळी वापरता पण आल्या पाहिजेत ना. आज पहिला दिवस म्हणून तुला माफ केलं.
पण पुन्हा अस होता कामा नये. Okay.” गणेशने ज्या भीतीपोटी इतका गोंधळ घातला तस काही झालं नव्हत. उलट बॉसने त्याला समजून घेऊन चांगल्या गोष्टीच सांगितल्या. त्याला समजलं की आपल्या या भीतीने आपण स्वतःचच नुकसान करून घेत आहोत. आता या क्षणापासून आपण जे काही काम करू ते आत्मविश्वासाने व न घाबरता करू असे त्याने मनाशी ठरवले व तो केबिन बाहेर पडला.
भीती ही भावना सर्वांना येतेच. कारण ही आपल्या अस्तिवाशी संबधित अशी भावना आहे. अगदी आदिम काळापासून चालत आलेली आहे. जिथे खरच माणसाला कसला ना कसला धोका जाणवायचा. पण आता तशी परिस्थिती आहे का? की जिथे आपल्याला पावला पावलावर धोका आहे. सुरुवातीच्या काळात भीती जाणवली की माणूस तीन प्रतिक्रिया द्यायचा लढा, पळा किंवा स्तब्ध होऊन जा. त्या काळात जंगली श्वापद, नैसर्गिक आपत्ती अचानक ओढवायची त्यामुळे अश्या प्रतिक्रिया माणूस देत होता.
पण आता प्रत्येक क्षणाला तस होत का की जिथे आपल्याला पळून गेलं पाहिजे किंवा फ्रीज झालं पाहिजे? आणि आपण पळणार तरी कुठवर? कधीतरी आपल्याला सामना करायला लागतो. मग हा सामना कसा करायचा? गणेश सारखं मनात भीती ठेवून, घाई गडबड करून का संयम ठेवून, मनाला शांत करून? तर आपल्याला आपल्या मनाला आधी स्थिर केल पाहिजे. त्यासाठी लढा दिला पाहिजे ते नको तिथे अवास्तव भीती निर्माण करणाऱ्या विचारांशी. त्यांना प्रश्न विचारून.
खरच माझी भीती वास्तवाला धरून आहे का? खरच मला वाटत तितकं माझं अस्तित्व धोक्यात आहे का? असे प्रश्न विचारून त्याची सत्यता तपासली पाहिजे. बऱ्याच मुलांना स्टेज fear असत. त्यांना बाकीच्या वेळी ती गोष्ट करायला काही वाटत नाही. पण तीच गोष्ट स्टेजवर कर म्हटल की मूळ घाबरतात. अगदी मुलच काय, बरीच मोठी माणसं देखील घाबरतात. का? तर समोर इतका समूह आहे, माणसं आहेत. मला हसतील, मला बोलतील अस वाटून.
पण अस होण्याचं प्रमाण खूप कमी असत. झालं तर इतकं वाईट नसत जितकं आपण समजतो. पण आपण अस डोक्यात घेऊन आपली स्टेज वरची कामगिरी खराब करून टाकतो. म्हणूनच जर योग्य पद्धतीने काम करायचं असेल, पुढे जायचं असेल तर डोक्यातील भीती काढून टाकून त्याचा हळू हळू धीराने सामना केला पाहिजे. तरच आपण पुढे वाटचाल करू शकतो.
