Skip to content

कोणीतरी निघून गेल्यावर जी पोकळी तयार होते त्यातूनच होतो, एक भक्कम स्व-विकास!

कोणीतरी निघून गेल्यावर जी पोकळी तयार होते त्यातूनच होतो, एक भक्कम स्व-विकास!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आज दोन वर्ष झाली समीरला जाऊन. किती अकल्पनीय होत ते सर्व. आदल्या दिवशी आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश केला होता आणि दुसऱ्याच दिवशी समीर मला, आम्हा सर्वांना सोडून गेला. त्यावेळी तर अस वाटलं समीर मलापण त्याच्या सोबतच घेऊन गेला. कारण त्यावेळी त्याच्याशिवाय माझं अस काय वेगळं अस्तित्व होत? त्यावेळी. कारण आताची परिस्थिती वेगळी आहे. मला पहिल्यापासून लग्न संसार याची खूप हौस होती. घराच्याना फार त्रास न देता मी लग्नाला तयार झाले आणि समीरला पसंद केल. आमचं लग्न अगदी थाटामाटात झालं. त्यानंतरच माझं आयुष्य म्हणजे मी समीर आणि माझा संसार बस्स!!

माझं आयुष्यच त्याच्याभोवती फिरत होत. घर सजवायची मला खूप हौस. त्यासाठी मी सारखी काही ना काही करत बसायचे. बाकीची अगदी समीर सुद्धा जेव्हा आग्रह करून सांगत होता कामाला माणसं ठेवू तेव्हा मी हट्टाने ती सर्व जबाबदारी माझ्यावर घेतली. कारण हे माझं घर होतं, यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते करण्यात मला मनस्वी आनंद होता. त्यात मला कोणाचाही हस्तक्षेप नको होता. मी दिवस दिवस भर घरात असायचे. पण मला कधीच कंटाळा आला नाही.

घराबाहेरची जी काही काम असायची ती बहुतेकदा समीरच करायचा. त्यामुळे मला काही करावं लागायचं नाही. तो माझी खूप मोठी support system होता. भक्कम आधार होता. तो माझ्यासोबत आहे तर मी कधीच एकटी पडणार नाही याची मला खात्री होती. समीरला पण माहीत होत की मी घरात असले तरी खूप काही करत असायचे त्यामुळे त्याने कधी माझ्यावर जास्त भार टाकला नाही. न सांगताच तो बऱ्याच गोष्टी करायचा. मी बऱ्याच गोष्टी मध्ये त्याच्यावर अवलंबून होते पण मला त्याचं कधीच काही वाटलं नाही.

कारण ज्याच्यावर मी विसंबून होते तो माझाच तर होता. लग्न झाल्यापासून अस कधी झालं नाही की तो खूप दिवसासाठी बाहेर गेला किंवा मी गेले. त्यामुळे समीर शिवाय जगणं म्हणजे काय हेच मला माहित नव्हत. त्यामुळे जेव्हा तो आम्हा सर्वांना असा अचानक सोडून गेला तेव्हा माझ्यासाठी तो एक धक्का होता म्हणण्यापेक्षा एक न पटणारी गोष्ट होती, एक आश्चर्य होत. कधी कुठला आजार नसलेली व्यक्ती, आनंदात असणारी व्यक्ती अशी अचानक कशी काय जाऊ शकते हेच मला समजत नव्हत. माझा विश्वास म्हण्याहुनही जास्त हा माझा आग्रह होता, माझा अट्टाहास होता की त्याने मला सोडून जाऊ नये.

पण तो गेला हे वास्तव होत. स्वीकारायला मला खूप काळ गेला. हा काळ अंगावर शहारा आणणारा होता. कारण त्या काळात समीर गेल्याच एक दुःख होतच पण माझी पण अवस्था अशी झाली होती की माझं फक्त शरीर राहील होत. ना मी त्या काळात कोणाशी बोलत होते, ना नीट खात पित होते, झोपत होते. माझ्या या अवस्थेला घरातली सर्वच घाबरून गेली होती. समीर गेल्याने सर्वांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होतीच. ती भरून निघणार नव्हती. हे कोणीही नाकारत नव्हत.

पण त्यामुळे मी जी माझी अवस्था करून घेतली होती त्यातून मला बाहेर काढण पण गरजेचं होत. स्वतःचा मुलगा पण तर त्यांनी आधीच गमावला होता आता त्यांना स्वतःची मुलगी गमवायची नव्हती. आमच्या घरात कोण सून जावई अस नव्हत. आम्ही दोघंही दोन्ही कुटुंबाची मुल होतो. मी स्वतःला त्या काळात सावरूच शकत नव्हते. मला सावरलं, त्यातून बाहेर काढलं ते माझ्या घरातल्या माणसांनी, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या आधाराने. हे सावरण पण तितकं सोपं नव्हत.

कारण जेव्हा मी भानावर आले, इकडे तिकडे थोडफार वावरु लागले तेव्हा मला समजलं की मी किती अवलंबून होते समीरवर. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर येऊन थांबत होती. तो असताना हे अवलंबून राहण मला आवडत होत. कारण यात एकप्रकारचा विश्वास होता. मला नाही जमल तर तरी समीर आहे असा. पण आता, आता काय करणार? आता सर्व माझं मलाच करावं लागणार होत. आतापर्यंत फक्त घरातली कामं करायची सवय होती. त्याच्या बाहेरच जग मी पाहायला गेलेच नव्हते.

पण आता मला त्याचं जगात एकटीने प्रवास करावा लागणार होता. तिथले व्यवहार शिकावे लागणार होते. घाबरत घाबरत दोन पावलं पुढे पुढे टाकत मी शिकले. सोबत घरातली लोक होतीच. ह्या काळात मी स्वतःला पूर्ण नव्याने ओळखायला शिकले, माझ्यातले गुण जे मी आतापर्यंत ओळखलेच नव्हते, कुठेतरी दाबून टाकले होते ते मला हळू हळू समजू लागले. मी घर हौसेखातर सांभाळत होते, सजवत होते. पण ते सजविण्यासाठी लागणारी दृष्टी, ती कला माझ्याकडे आहे हे मला आता समजू लागलं.

आधी पण जेव्हा समीर माझी ही सजावट पाहून कौतुक करायचं, गुणगान गायचा तेव्हा मी हसण्यावारी न्यायचे. कोणतीही गृहिणी आपल्या घरासाठी हे करतेच अस मी म्हणायचे. पण आता मला समजलं मी कळत नकळत माझ्या कलेला नाकारत होते. आता समीर गेल्यावर जेव्हा मी एकटी वावरू लागले सर्व गोष्टी करू लागले तेव्हा मला हे समजलं. मनाशी ठरवलं ज्यात आपला हात आहे तीच गोष्ट आपण अजून नीट शिकायची. मी इंटेरियर डिझाइनिंग चा कोर्स केला. इथेच थांबले नाही तर माझं ऑफिस पण काढलं. सर्वांना आपल घर सजलेलं, नटलेल आवडत.

हीच गोष्ट लक्षात घेऊन मी क्लायंट घ्यायला सुरुवात केली. पण माझं पहिलं क्लायंट मात्र मी स्वतःच झाले. कारण आमचं ते घर जे समीर गेल्याने तसच पडून राहील होत, ज्या फक्त मातीच्या भिंती म्हणून उभ्या होत्या, त्यांना माया हवी होती, त्यांना पण घरपण यायला हवं होत. म्हणून सगळ्यात आधी मी माझं ते घर सजवल अगदी तसच जसं समीरला आवडलं असत. त्याच घरात आता माझं ऑफिस आहे आणि तिथेच मी राहते. पण आताही मला एकट वाटत नाही कारण या घराच्या रूपाने, त्याच्या सजावटीतून सतत मला समीर आसपास असल्याची जाणीव होते आणि तो माझ्या सोबतच असणार आहे. आठवणीच्या रुपात, या घराच्या रुपात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!