Skip to content

कोणीतरी लादलेलं मत भीतीपोटी तसंच पुढे रेटू नका, त्यासाठी हे करा.

कोणीतरी लादलेलं मत भीतीपोटी तसंच पुढे रेटू नका, त्यासाठी हे करा.


हर्षदा पिंपळे


आपण जन्माला येतो.जन्माला येतानाच आपल्या असंख्य जणांसोबत नाळा जोडल्या जातात. कुणी लहानाच मोठ्ठ करतं तर कुणी संस्कार करतं तर कुणी अजून बरच काही करतं.इतकच नाही तर त्यांनी आपल्यासाठी हे हे केलं म्हणून आपण त्यांच ऐकलं पाहिजे वगैरे. ते मोठे आहेत, अनुभव आहे वगैरे वगैरे. खरं तर या गोष्टी नाकारण्याच कारण नाही.

पण या पलिकडे जाऊन आपलं स्वतःच स्वतंत्र असं अस्तित्व असतं की नाही…?आणि ते असायला हवं की नको…?आपल्याला आपली काही मत-मतांतरे असतातच नं…? की सातत्याने आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मताशी सहमत असतो…?

अरे,या सगळ्या गोष्टी स्विकारणं काही चुकीच नाही. परंतु या सगळ्यात आपलं असं वेगळं अस्तित्व आहे हे आपण विसरता कामा नये.हल्ली आपण सहजपणे आपलं अस्तित्व विसरून जातो. आपली मतं आपण सहसा व्यक्तच करत नाही.आपण सातत्याने दुसऱ्याच्या मतात सहभागी होतो.कधी ते मत योग्य वाटतं म्हणून…

आणि कधी कधी ती व्यक्ती नाराज होईल म्हणून, त्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून..आपण त्या व्यक्तीच्या मतामध्ये सामील होतो.कधी कधी तर मतं आपल्यावर लादली जातात आणि भीतीपोटी आपण त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. केवळ भीती वाटते म्हणूनही आपण त्याच मताला मान्यता देतो.तर असं भीतीपोटी एखाद्या मताला पुढे रेटणं कितपत योग्य आहे…???

आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात आणि जातात. त्या वेळी आपण कितीदा आपली मतं इतरांवर लादतो आणि आपणही कितीदा दुसऱ्याच्या दबावाखाली दबले जातो याचा एकदा विचार जरूर करायला हवा. कोणतीही गोष्ट असूद्या, कोणताही प्रसंग असूद्या पण कोणीतरी लादलेलं मत कधीच भीतीपोटी तसच पुढे रेटू नका.त्या मताला अनेकदा काहीच अर्थ नाही.

सतत असं भीतीने एखादं मत पुढे रेटून काहीच साध्य होत नसतं.यामुळे आपण आपलं मत कधीच मांडू शकत नाही. व्यक्त करू शकत नाही.आपल्याला काय वाटतय ते त्या भीतीमुळे आपण दाबून ठेवतो.स्वतःच मत कुणावर लादण्याचा कुणालाही अधिकार नाही परंतु स्वतःच मत व्यक्त करण्याच स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाला आहे.

पण अनेकदा दबावाखाली येऊन आपण आपली मतं पुढे रेटत राहतो.आणि नंतर मात्र पश्चाताप करत राहतो.त्यापेक्षा अशावेळी ही मतं पुढे रेटत राहण्यापेक्षा काही गोष्टी आपण अवश्य केल्या पाहिजे. तर तुमच्यावरही कुणी जर अशी मतं लादत असेल तर ती मतं रेटून पुढे नेण्यापेक्षा काही गोष्टी करून पहा. तर यासाठी काय करायला हवं ते आपण पाहूयात-

*लादलेलं मत महत्वाच की आपल्या मनाला आणि बुद्धीला काय पटतय ते महत्त्वाच याचा विचार करून निर्णय घ्या.

*स्वतःलाही स्वतःच स्वतंत्र मत असणं गरजेच असतं हे लक्षात घ्या.

*समोरच्याच मत आपण स्विकारायच की त्याच समोरच्याच्या मताखाली स्वतःला दाबून ठेवायच याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

*आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे हे स्वतःला निक्षून सांगा.




*स्वतः आत्मविश्वासाने जगायला शिका.स्वतःच्या मतावर स्वतः ठाम रहायला शिका.कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मतावर ठाम होत नाही तोपर्यंत लोकं तुमच्यावर वेगवेगळी मतं लादत रहातात.

*स्पष्टपणे नकार देण्याची हिम्मत ठेवा. नाही म्हणायला शिका.

कारण कधी कधी गप्प राहिल्यानेच समोरच्याची हिम्मत वाढते.समोरचा त्याचं मत आपल्यावर लादायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे नकार देत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लादलेल्या मतांच्या ओझ्याखाली दडपून रहाल.आणि तुमच मत तुमच्यापर्यंतच राहील. तुमचं मत इतरांना कळणारच नाही. तुम्हाला काय वाटतय याचा विचार कुणी करणारच नाही. त्यामुळे तुमच मत समोरच्याला आवर्जून सांगा.


*वेळ पडल्यास दुर्लक्ष करून पुढे जा.

*स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

*जर खरच स्वतःच मत योग्य असेल तर ते योग्य पद्धतीने मांडायला शिका.मत मांडायची संधी मिळत नसेल तर ती मिळवायचा प्रयत्न करा.

*शांत बसण्यापेक्षा व्यक्त होण्यावर अधिक भर द्या.

आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे लादलेल्या मताला बळी पडू नका. स्वतःला काय योग्य वाटत याचा सर्व बाजूंनी विचार करा. स्वतःची मतही इतरांवर लादू नका.यापेक्षा प्रत्येक योग्य मताचा आदर करायला शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


1 thought on “कोणीतरी लादलेलं मत भीतीपोटी तसंच पुढे रेटू नका, त्यासाठी हे करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!