Skip to content

“कोणी टाळत असेल तर चूक शोधत बसू नका, गरज संपली म्हणून विषय संपवून टाका.”

“कोणी टाळत असेल तर चूक शोधत बसू नका, गरज संपली म्हणून विषय संपवून टाका.”


मधुश्री देशपांडे गानू


आज सोमवार… राधा अगदी आतुरतेने अनयच्या फोनची वाट बघत होती. हल्ली त्याचे फोन कमी झाले होते. राधा फार अधीर असायची त्याचा आवाज ऐकायला. पण अनयला मात्र तिला फोन करायला वेळ मिळत नव्हता. राधा आणि अनय, पाच वर्षांपासून एका गोड प्रेमाच्या नात्याने बांधले गेले होते. दोघेही उत्तम करियरिस्ट. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. एकमेकांशिवाय एक क्षणही करमत नसे दोघांना. प्रत्येक गोष्ट शेअर करायचे.

छोट्यातील छोटी गोष्ट कधी एकदा एकमेकांना सांगेन, असं व्हायचं त्यांना. फक्त दोघांच्या घरी अजूनही माहित नव्हतं. त्यातून अनयची बंगलोरला बदली झाली. राधा मुंबईत. आता दोघांच्या भेटीगाठी कमी होऊ लागल्या. “लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप”. रोज फोन, व्हिडिओ कॉल्स चालूच होते. एकमेकांना न भेटता कसं राहणार आपण?? हा प्रश्न आ वासून उभा होता. पण दोघेही समजूतदार होते. करिअरला प्राधान्य द्यायचं हेच वय आहे, हे दोघांनाही पटत होतं. जशी सुट्टी मिळेल तसा अनय मुंबईला धाव घ्यायचा. कधी एकदा राधाला भेटेन असं त्याला व्हायचं. त्या भेटीची ओढ, आतुरता काही वेगळीच असायची.

गोड आठवणी बरोबर घेऊन परत दोघे आपापल्या कामात व्यग्र होत. पण अलीकडे काही महिन्यांपासून अनयच्या वागण्यात, बोलण्यात बदल होऊ लागला. त्याचं वारंवार मुंबईला येणं कमी होऊ लागलं. रोज न चुकता ओढीने फोन करणारा अनय आता आठवड्यातून तीनदा, दोनदा फोन करू लागला. राधाने कारण विचारलं की काम खूप आहे, कामाचं प्रेशर आहे असं सांगून वेळ मारून न्यायचा. बोलण्यात, भेटण्यातही ती पूर्वीसारखी ओढ जाणवत नव्हती. प्रेमाचे शब्द, कौतुकाचा शब्द, काळजी, आपुलकी हे तर संवादातून हद्दपार झाले होते.

फक्त कोरडे बोलणं ऊरलं.. राधाला हे सगळं खूप जाचत होतं. अनय आपल्याला टाळतोयं हे तिला स्पष्ट जाणवत होतं. तिला या सगळ्याचा प्रचंड त्रास होत होता. काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडलंय हे तिला सतत जाणवत होतं. संवादाची आत्मीयता, वेळ दोन्हीं कमी झालं होतं. विचारल्यावरही समाधानकारक उत्तर तिला मिळत नव्हतं. राधाला याचा इतका त्रास झाला की शेवटी ती आजारी पडली. तिने खूप विचार केला. अनय तर काहीच स्पष्टपणे सांगत नव्हता. फक्त वेळ मारून नेत होता. हे असं किती काळ चालणार? नक्की कुठे, कोणाचं, काय चुकलं??? याचा राधा दिवस-रात्र विचार करायची. पण उत्तर काही मिळत नव्हतं.

प्रेमाने, रुसून, चिडून, अबोला धरून अनेक प्रकारे तिने अनयच्या मनातलं खरं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण कशाचाच उपयोग होत नव्हता.

शेवटी राधाने संपूर्ण विचारांती निर्णय घेतला. आता या नात्याची ओढ आणि गरज दोन्हींही अनयच्या दृष्टीने संपली, हे तिच्या अंतर्मनाला स्पष्ट जाणवलं. आणि तिने अनयला स्पष्ट नकार दिला. आजपासून आपलं नातं संपलं, हे तिने स्पष्टपणे सांगितलं. तिला त्यावेळी अत्यंत मानसिक त्रास झाला. हा निर्णय पचवणं खूप अवघड होतं. पण संपलेल्या नात्याचं ओझं वागवून काहीच उपयोग नव्हता. उलट काही काळ गेल्यानंतर तिचं तिलाच हलकं वाटू लागलं. आपला निर्णय योग्य होता हे तिला पटलं. कारण कशाहीपेक्षा स्वाभिमान सर्वोच्च स्थानी असायला हवा. तो पायदळी तुडवून कोणतंही नातं निभावू नये, हे तिला पूर्ण पटलं होतं.

वाचक हो, माणूस म्हणून जगताना या जीवनरुपी प्रवासात अनेक प्रवासी भेटतात, दूर जातात. अगदी जीवापाड जपलेली प्रेमाची नाती ही अनोळखी होऊन जातात. फक्त काही थोडीच नाती आयुष्यभर साथ करतात. कोणत्याही नात्यात नात्याची ओढ, प्रेम, गरज दोन्हींकडून समान असायला हवी. तरच त्या नात्याला अर्थ आहे. एकानेच नातं निभावायचा कितीही प्रयत्न केला, कितीही प्रेम दर्शवलं तरी ते दुसऱ्यापर्यंत त्याची इच्छा नसेल तर पोहोचतच नाही. मग रुसवे फुगवे, वाद, चिडचिड, संशय, स्वामित्वाची भावना हे सगळं दाखवूनही काहीही उपयोग होत नाही. अशावेळी शांतपणे कोणाचीही चूक न शोधता त्या नात्याला तिलांजली द्यावी.

आपण त्या व्यक्तीसाठी आता महत्त्वाचे राहिलो नाही, हे वास्तव स्वीकारावं. आणि अशा नात्यातून अलगद बाजूला व्हावं. जेवढ्या लवकर तुम्ही हे वास्तव स्वीकाराल तेवढी तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक फरफट होणार नाही. हा निर्णय सर्वस्वी तुमचा तुमच्या भल्यासाठी तुम्हीं घ्यायलाच हवा.

कित्येक वेळा अशा नात्यात आपल्याला closure हवा असतो. स्पष्टपणे बोलणं हवं असतं. पण त्याचीही अपेक्षा न करता विषय संपवून टाका. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. ते अविरत सुरूच राहतं. आणि बदल अनिवार्य आहे. अशी नाती तुम्ही जेवढ्या लवकर संपवाल तेवढेच नवीन नात्यांना वाव मिळतो. इथेच अडकून पडू नका. तुमचे आयुष्य आनंदी, शांत, समाधानी असणं हा तुमचा अधिकार आहे. अशा गरज संपलेल्या नात्यांमध्ये अडकून तुमचा आनंद गमावू नका. स्वाभिमान सर्वोच्च स्थानी ठेवून तुमचा आनंद मनापासून जपा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!