“अवतीभवती आपलं म्हणणारं कोणी नसतानाही समाधानी आयुष्य आपण सहज जगू शकतो.”
मधुश्री देशपांडे गानू
“एकला चालो रे”
वंदनीय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका बंगाली देशभक्तीपर गीतात हे लिहिलं आहे. तुमची हाक ऐकूनही कोणी आलं नाही तर तुम्हीं एकटे चालत राहा. खरंच, अशी कित्येक माणसं या जगात असतील ज्यांना हाक मारायला, धावून यायला अवतीभोवती आपली हक्काची माणसं नाहीत. आज शेकडो वृद्धाश्रम, अनाथाश्रम भरून वाहत आहेत. कित्येक बालकांना कुटुंब म्हणजे काय, हेच माहीत नाही. अनेक वयोवृद्ध आता त्यांचा काही उपयोग नाही म्हणून वृद्धाश्रमात त्यांची रवानगी होत आहे.
दोन वर्षात भयंकर अशा कोविडकाळात कुटुंबच्या कुटुंबं संपलेली आपण पाहिली आहेत. एकाच कुटुंबातील एखादी व्यक्ती आज असेल जिला आपलं म्हणणारं कोणी अस्तित्वातच नाही. काय मनस्थिती असेल त्यांची?? कोणत्या trauma मधून जात असतील ते?? आपण कल्पनाही करू शकत नाही. जो यातून जातो त्यालाच हे जळजळीत वास्तव माहीत असतं.
कोणाला आपलं म्हणायला त्याचे आई-वडील नाहीत, तर कोणाला हक्काची स्वतःची मुलं नाहीत, तर कोणाच्या आयुष्याचा जोडीदार डाव अर्ध्यावर सोडून गेलेला, तर कोणी स्वेच्छेने एकटे राहणारे ही आहेत. अशा सगळ्यांचं जीवन कोणा आपल्याशिवाय अपूर्ण आहे. तरी ते आयुष्य जगत आहेतच. पतीच्या/पत्नीच्या अकाली निधनानंतर मुलं आपली असतात. त्यांच्या प्रेमाखातर, संगोपनासाठी ती व्यक्ती जगतेच. त्यातही आनंद, समाधान शोधतेच.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणा आपल्या हक्काच्या माणसाचा वियोग असतोच. त्यावर मात करून आज जे आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण सुखाने जीवन जगतो ना! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी साथ सोडतो. पण काही असे अभागी असतात की ज्यांना खरंच आपलं म्हणणारं असं कोणीच नसतं. ते अगदी एकटे असतात.
खरं तर काहीवेळा तुम्हीं अगदी तुमच्या हक्काच्या, आपल्या माणसांत, कुटुंबात राहत असला तरीही एकटे असता. कधीतरी तुम्हांला एकटेपणा जाणवतो. आजूबाजूला सगळा गोतावळा असूनही तुम्हांला एकटं, उदास वाटू शकतं. पण हे तात्पुरतं वाटत असेल तर ठीकच. जर हे सातत्याने वाटत असेल तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत घेणे इष्ट. कारण एकटेपणा खरंच भयावह असतो. आजूबाजूला माणसं असलेली प्रत्येकाला हवीच असतात. सोपं नाही एकटे जगणं.. कुटुंब, मित्र मैत्रिणी हव्यातच.
पण तरीही काही कारणाने आपल्या अवतीभवती आपलं म्हणणारं कोणी नसेल तरीही आपण समाधानी आयुष्य सहज जगू शकतो.
१) माणूस सामाजिक प्राणी आहे. नवीन मित्र मैत्रिणी आपण सहज मिळवू शकतो. पण सजग राहून.
२) कोणाहीकडून फार अपेक्षा करायच्या नाहीत. अवास्तव तर नाहीच.
३) एकटे असलो तरीही सुंदर, समाधानी, आनंदी आयुष्य जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.
४) आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगण्यासाठी आपण उत्सुक असायला हवं.
५) स्वतःवर लक्ष केंद्रित करून सातत्याने स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं.
६) आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, छंद यामध्ये स्वतःला पूर्ण व्यस्त ठेवणे आपल्याला समाधानी करतं.
७) आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी आपण सक्षम होतो. स्वानुभवातून शिकतो. लवकर प्रगल्भ होतो.
८) एकटे असल्याने स्वावलंबी होतो. कोणावरही अवलंबून राहत नाही.
९) आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन सहजच वास्तववादी होतो. आहे त्यात समाधानी असणं सहज जमतं.
१०) प्राण्यांची, पक्ष्यांची आवड असेल तर आपण त्यांना आपले companion बनवू शकतो. त्यांच्या इतकं निर्व्याज प्रेम कोणीच करत नाही.
११) एकटेपणा आणि एकांत या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत आवडत असेल तर उत्तमच. पण एकटेपणा जाणवत असेल solo trip ला जाणं, मित्र-मैत्रिणींबरोबर जाणं हे आपण करू शकतो.
१२) आवडीच्या छंदात मन रमवू शकतो. त्यात कौशल्य मिळवून त्याचंही व्यवसायात रूपांतर करू शकतो.
१३) मुळात वेळेचे, ऊर्जेचे, पैशाचे सुनियोजन करणे एकहाती होतं. सोप्पं होतं.
आज विविध वयोगटातील अनेक जण solo trip वर जातात. स्वतःचीच कंपनी, सोबत एन्जॉय करतात. स्वतःशी संवाद साधतात. स्वतःवर भरभरून प्रेम करतात. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक चमक येते. आत्मविश्वास येतो.
जगाचे भले बुरे अनेक अनुभव येतात. यामुळे तुम्हीं एक व्यक्ती म्हणून समृद्ध होता. आज अनेक वृद्धाश्रमातील एकाकी वृद्ध आहे त्या परिस्थितीत सहज समाधानाने जगत आहेत. मुळात भूतकाळाबद्दल खेद, खंत, दुःख, अपराधी भावना जपण्यापेक्षा तो सोडून देणंच चांगलं असतं. पुढे काय होईल, याचीही अति चिंता करून काहीच साध्य होत नाही.
एकटे असलात तरीही तुमचं आयुष्य, तुमचा वर्तमान, तुमचा आत्ताच हा क्षण भरभरून जगणं, समाधानाने जगणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. काही वेळा हा एकटेपणाचा काळ तात्पुरता असतो किंवा काही वेळा कायमस्वरूपी. कसाही असला तरी ही आपली मानसिकता मात्र सकारात्मक, आशावादी हवीच. आपण एकटे असलो तरीही या सुंदर जीवनाचा मनमुराद आनंद लुटू शकतो. आस्वाद घेऊ शकतो. समाधानाने जगू शकतो. हो ना!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
