Skip to content

कोणालाही स्वतःच्या निर्णयांमध्ये बांधून ठेऊ नका.

कोणालाही स्वतःच्या निर्णयांमध्ये बांधून ठेऊ नका.


अपर्णा कुलकर्णी


पूर्वा आज लवकर उठून तयार झाली होती. शॉर्ट टॉप आणि जीन्समध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. आज तिचा नोकरीचा पहिलाच दिवस होता म्हणून ती खूप एक्साईट होती. ती तयार होऊन खाली येत आईला म्हणाली, आई डबा दे पटकन मला आज लेट व्हायचं नाही. तसे खाली बसलेले अण्णा तिच्याकडे पाहून, तिला म्हणाले पूर्वा तुला मी हजारदा बजावलं आहे असले टीचभर कपडे घालून गावभर हिंडलेल मी खपवून घेणार नाही.

तुला एकदा सांगून समजतच नाही का ?? प्रशांत, सुरेखा, विमल सगळे इकडे या, आण्णांच्या आवाजाने सगळेच हातातील कामे टाकून धावत आले. प्रशांत, सुरेखा तुमच्या पोरीला जरा समजावून सांगा. काय थेर आहेत ही ?? तुम्ही कोणीच तिला कसे बोलत नाही. बघ प्रशांत कसे कपडे घातले आहेत तुझ्या लाडक्या लेकीने.

अण्णा हे कपडे टीचभर नाहीत चांगले अंगभर आहेत आणि प्लीज आता तुम्ही उगाच नको त्या गोष्टी वरून सीन क्रिएट करू नका आज माझा नोकरीचा पहिलाच दिवस आहे आणि मला काम छान करायचे आहे. उगाच तुमच्यामुळे सगळा दिवस खराब नको व्हायला. पूर्वाच्या या बोलण्याने अण्णा अजुनच चिडले आणि हातात काठी घेऊन उभा रहात म्हणाले हेबघ पुर्वे तू मला अक्कल शिकवु नको. चार पैशांची नोकरी लागली म्हणजे शिंग फुटले का तुला ?? अण्णांचा चढलेला पारा पाहून सुरेखामध्ये पडली आणि म्हणाली, अण्णा मी सांगते तिला समजावून तुम्ही चिडू नका आणि पुर्वाचा हात घरून तिला किचनमध्ये घेऊन गेली. पूर्वा काही बोलणार इतक्यात सुरेखा म्हणाली हे बघ पुर्वा उगाच अण्णांच्या तोंडाला तोंड देत जाऊ नकोस.

तुला माहित आहे ते किती कडक शिस्तीचे आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम आहेत.मग उगाच का भांडत बसायच ?? आजोब आहेत ते तुझे जरा वयाच तरी भान ठेवत जा बोलताना. बोल तूही मलाच बोल आई, मला माहित आहे ते कसे आहेत पण प्रत्येक वेळी ते बरोबर असतीलच असे नाही ना आई. आता काय खराबी आहे या कपड्यात ?? आज नोकरीचा पहिलाच दिवस म्हणून किती एक्साईट होते मी, मला गुडलक द्यायचं सोडून उगाच काय वाद घालत बसले. जाऊदे असे म्हणत पुर्वा डबा न घेताच तणतणत गेली.

अण्णा त्यांच्या खोलीत आराम करत होते, तिथे विमल चहा घेऊन आल्या. चहा देत त्या म्हणाल्या, अहो, आपली पुर्वा जरा अल्लड आहे त्यात तिचाही स्वभाव जरा हट्टी आहे. तुम्ही आजोबा आहात तिचे, जरा सबुरीने घेत चला. आता या वयात इतका राग राग कारणं बरं नाही. किती छान दिसत होती पुर्वा त्या कपड्यात आणि आताच्या मुली हेच कपडे वापरतात. आपणही चालीरीती सोडून जरा यांच्या प्रमाणे बदलायला हवे. उगाच वाट्टेल ते बोलू नको विमल. जमाना बदलला म्हणून काय झालं ?? उद्या ही पोरं उघडी फिरायला लागतील ?? ते ही बघत बसायच का आपण ?? ते काही नाही.

तुला चांगलच माहीत आहे आजवर मी घेतलेला कोणताही निर्णय चुकला नाही आणि त्यासाठी मला पश्चात्ताप करावा लागला नाही. त्यामुळे मी ठरवल आहे आता पुर्वाचे लग्न लावून द्यायचं. अहो पण आताच तिला नोकरी लागली आहे जरा तिच्या कलेने घ्या विमल म्हणाली. मी तिला शिकण्याची मुभा दिली म्हणूनच शेफरली आहे ती मागेच तिचे लग्न उरकून टाकायला हवे होते. आता मी तिच्या लग्नाचे बघणार आहे आणि माझ्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही अण्णा ठणकावून सांगत म्हणाले. बिचाऱ्या विमल काहीच बोलू शकल्या नाहीत.

शेवटी अण्णांनी पुर्वासाठी एक स्थळ आणलेच. याची कल्पना पुर्वालाच काय तर प्रशांत आणि सुरेखा, विमल यांनाही नव्हती. रविवारचा दिवस होता, सगळे निवांत सुरू होते सुटीचा दिवस असल्यामुळे. तेवढ्यात अण्णांनी आज पूर्वला मुलाकडची मंडळी पाहायला येत असल्याचे सांगितले. घरात त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याची कोणातच हिम्मत नव्हती. पण आता पूर्वाचा पारा चढला होता.

मी काहीही झालं तरी इतक्यात लग्न करणार नाही अण्णा, आणि माझ्या लग्नाचा निर्णय घेताना तुम्हाला मला विचारणं तर लांबच पण सांगावस पण कस वाटलं नाही. पूर्वा माझे आणि सगळ्या कुटुंबाचे निर्णय आजवर मी माझ्या पद्धतीने घेतले आहेत. तुझ्या बापाचे लग्नही मी असेच जमवले आणि त्याला मांडवात उभ राहायला सांगितले तसा तो उभा राहिला. त्याचे काहीच वाईट झाले नाही मग तुझ्या बाबतीत मी चुकीचे निर्णय कसा घेईन. तुझे लग्न करून दिल्यावर तू हवी तशी वागायला मोकळी.

प्रशांत समजाव तिला म्हणत अण्णा उठले. थांबा अण्णा आजवर तुम्ही तुमच्या आणि सोबत आमच्याही आयुष्याचे हवे तसे निर्णय घेतले. बाबा तर तुमच्या पुढे आजवर एक अक्षरही बोलू शकले नाहीत, विरोध करणं तर लांबचीच गोष्ट. तुमचे निर्णय, तुमचे विचार, तुमच्या इच्छा यावरच हे घर चालत आले आहे पुढेही ते तसच चालू राहावं हीच तुमची अपेक्षा असेलही पण प्लीज मला यात गृहीत धरू नका. मी आजच्या काळातील एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे, मला माझी मतं, विचार आहेत आणि त्यानुसारच मी वागणार अण्णा.

तुम्हाला वाटतना आजवर तुमचे कोणतेच निर्णय चुकले नाहीत आणि कोणत्याच निर्णयाचा पश्र्चाताप करावा लागला नाही तर तो तुमचा गर्व, अहंकार आहे. किंवा मग तुम्ही त्यावर कधी फेरविचार केलाच नाही रादर त्याची गरजच तुम्हाला कधी वाटली नाही अण्णा. कारण घरातल्या कोणीही कधीच त्यावर आवाज उठवला नाही, विरोध केला नाही. पण आज मी सांगतेय अण्णा तुम्ही किती चुकीचे निर्णय घेतले आहेत ते.

तुम्ही नंदिता आत्यचे लग्न खूप मोठ्या घरात लावून दिलेत पण आजही तिच्याकडे भाजी आणायला पैसे नसतात, ती घराबाहेर एकटी जाऊन एखादी वस्तू खरेदी करू शकत नाही कारण बायकांनी घराबाहेर पडावं हे त्यांच्या नियमांच्या विरुध्द आहे इतकेच काय ती साधी आजीला फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही मग भेटणे तर लांबच. आई आणि आजी दोघींनाही काहीतरी काम करायचे होते लग्नानंतर पण तुम्ही ते करू दिले नाही.

आईला गाण्याची प्रचंड आवड होती पण तुम्हाला आवडत नाही म्हणून तिने गाणे ऐकणे बंद केले. बाबांना इंजिनियर व्हायचेच नव्हते पण तुम्ही जबरदस्तीने त्यांना व्हायला भाग पाडले. घरात कोणीच काही बोलत नाही कारण सगळ्यांना तुमच्या पराकोटीच्या रागाची खूप भीती वाटते. पण म्हणून तुम्ही बरोबर ठरत नाही अण्णा. मी मला हवं तेंव्हा आणि हव्या त्या मुलाशीच लग्न करणार नाहीतर त्या पाहुण्यांसमोर तुमचा अपमान होईल अण्णा.

पूर्वीचे शब्द ऐकून अण्णा सगळ्यांकडे बघतात, विमलने डोळ्यांना पदर लावलेला असतो आणि सुरेखा प्रशांतचीही अवस्था याहून वेगळी नसतेच. अण्णा सगळ्यांकडे बघून विचारतात, पुर्वा म्हणते तेच तुम्हा सगळ्यांचे म्हणणे आहे का ?? यावर कोणीच काहीच बोलत नाही. अण्णा खुर्चीवर मटकन बसतात जणू काही अंगातून सगळी शक्ती निघून गेली आहे.

तेंव्हा प्रश्नात त्यांच्या जवळ जातो आणि गुडघ्यावर त्यांच्या समोर बसत म्हणतो, अण्णा माफ करा मला, मी आजवर तुमच्या समोर कधीच बोलण्याची हिम्मत केली नाही पण पूर्वाचे म्हणणे योग्य आहे. कदाचित तिची सांगण्याची पद्धत चुकीची असेल पण ती बोलते ते बरोबर आहे अण्णा. आजवर जे झालं ते झालं पण आता पुर्वाच्या बाबतीत काही चुकीचे घडायला नको ना ?? समजा तिची इच्छा नसताना आपण तिचे लग्न लावून दिले आणि ती नाहीच तिथे राहू शकली तर ??

अण्णा उठून आपला फोन घेतात आणि म्हणतात, नमस्कार परांजपे, आज माझ्या नाती सोबत दाखवण्याचा कार्यक्रम होऊ शकणार नाही. काही क्षण तिच्या सोबत खऱ्या अर्थाने जगेन म्हणतो. तेंव्हा आपला योग नाही, तसदी बद्दल माफी असावी. अण्णाचे हे बोलण ऐकून पुर्वा तोंडावर हात ठेवते आणि अण्णा हात पसरत म्हणतात आता झालं ना तुझ्या मनासारखं ?? पूर्वा धावतच त्यांना बिलगते तेंव्हा अण्णा म्हणतात कोणालाही स्वतःच्या निर्णयांमध्ये बांधून ठेऊ नये ही शिकवण दिली तू मला पोरी. माफ करा रे पोरांनो तुमच्या अण्णांना.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “कोणालाही स्वतःच्या निर्णयांमध्ये बांधून ठेऊ नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!