Skip to content

“कोणाहीबद्दल जजमेंटल होण्याआधी हे १० विचार दहा वेळा जरूर करा..”

“कोणाहीबद्दल जजमेंटल होण्याआधी हे १० विचार दहा वेळा जरूर करा..”


मधुश्री देशपांडे गानू


“जजमेंटल” (पूर्वग्रहदूषित मत).. बापरे! इतका अक्राळविक्राळ पसरलेला शब्द आहे हा.. कोणाहीबद्दल ओळखी-पाळखीचे, नातलंग, कुटुंबीय, किंवा अगदी अनोळखी व्यक्तींबद्दलही समाज केवढा जजमेंटल असतो. मागचा पुढचा कोणताही विचार न करता, सत्य-असत्य पडताळून न बघता, सर्वांगीण बाजू समजून न घेता माणसं सहज जजमेंटल होतात. कोणाहीबद्दल काहीही मत व्यक्त करतात. सहज दोषारोप करतात. एखाद्या व्यक्तीकडे काळा चष्मा घालूनच बघतात.

उदाहरणार्थ सासू-सून हे नातं. हे नातं कायमच जजमेंटल राहिलं आहे. आणि काहीही घडलं तर सहज सुनेला नावं ठेवण्यात आपला समाज अग्रेसर असतो. सुनांची बाजू कधीही ऐकून न घेतलेला समाज तिला दोषी ठरवतो. पण कित्येक ठिकाणी सासू-सासरे अत्यंत अव्यावहारिक, सदोष वागलेले असतात. त्यांनी घेतलेले चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय आणि त्याचे दूरगामी परिणाम नंतरच्या पिढ्यांना भोगावे लागतात. पण केवळ वय आणि मान याच्या आधारावर समाज त्यांच्याकडे नेहमीच सहानुभूतीपूर्ण बघतो. आणि मुलांच्या, सुनांच्या बाबतीत नेमका जजमेंटल असतो. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सामान्य असो नाहीतर यशस्वी , लोकप्रिय व्यक्ती समाजाचं काहीतरी जजमेंट असतंच.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा वाईट अनुभव आलेला असतो. पण त्याचेच मत ग्राह्य धरून बाकीचेही त्या व्यक्तीकडे त्याच नजरेने बघतात. त्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा ना! कदाचित तुम्हांला चांगला अनुभव येऊ शकतो. दोन्हीं बाजूं न ऐकता समाज सहज जजमेंटल असतो. कारण रिकामटेकडे गॉसिप करण्यात जास्त इंटरेस्ट असतो.

एखादी स्त्री कोणत्याही कारणाने एकटी असेल, सिंगल पेरेंट असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सदोषच असतो. ती प्रामाणिकपणे काही नवीन प्रगती करत असेल तर तिला मदत करायची सोडाच, पण तिचे पाय ओढले जातात. कधी छुपेपणाने तर कधी उघड तिला त्रास दिला जातो. अत्यंत मत्सराने आणि इर्षेने, द्वेषाने हे होतं. हे सगळं जजमेंटल असल्यामुळेच घडतं. एखाद्या अत्यंत सुंदर आणि तितक्याच हुशार स्त्रीला मुद्दाम एकटं पाडण्याचाही प्रयत्न होतो.

समाजात विघ्न संतोषी लोक जास्त असतात. तुम्हीं दुःखी, हीन-दीन, दुबळे असाल तर अशांना आनंद होतो. तुमच्याशी सतत छुपी स्पर्धा करणारे अनेक जण असतात. तुम्हीं यशस्वी होत असताना मुद्दाम तुमच्या बाबतीत नकारात्मक खोट्या बातम्या पसरवणारे हे याच जजमेंटल प्रकारात मोडतात.

खरंतर कोणाहीविषयी जजमेंटल होण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?? प्रत्येकाचं आयुष्य, त्याची मानसिक स्थिती, त्याची सद्य परिस्थिती ही वेगळी असते. प्रत्येकाचा मार्ग आणि प्रवासही वेगळा असतो. एखाद्याने भोगलेलं अपरिमित दुःख तुमच्या वाट्याला आलं तर चालेल का?? नाही ना! मग त्याला जज्ज करण्याचा अधिकार तुम्हांला दिलाच कोणी???? पण समाज असाच असतो. संकटाशी झगडणाऱ्याची गंमत बघणारा..

आजच माझा आवडता अभिनेता “सिद्धार्थ जाधव” यांची मुलाखत बघितली. तू दिसायला कुरूप आहे यावर सुरुवातीला सगळ्यांनी त्याला जज्ज केले. “हिरो असा असूच शकत नाही” यामुळे त्याला काम नाकारले गेले. त्याला वाटेल तशी नावं ठेवली. नक्कीच त्याला खूप वाईट वाटले. पण नाउमेद न होता त्याने आपले प्रामाणिक प्रयत्न, कष्ट, मेहनत चालू ठेवली. आणि आज तो यशस्वी, उत्तम अभिनेता आहे. कारण तो म्हणतो, “कुरूप या शब्दातही रूप आहेच.” खरंतर कोणीही कुरूप नसतो. आणि सौंदर्य हे तुमचं कर्तृत्व असू शकत नाही. कर्तृत्वाची झळाळी उठून दिसतेच. मला फार आवडली ही मुलाखत.

आता कोणाहीबद्दल जजमेंटल होण्याआधी प्रत्येकाने दहा वेळा विचार करायला हवा. “अर्थात जी व्यक्ती मनाने निर्मळ आहे, माणुसकी, माणूसपण जाणणारी आहे तीच व्यक्ती असा प्रयत्न करेल.” दुष्ट, विकृत मनोवृत्तीच्या माणसांसाठी हे नाहीच. खालील दहा विचार हे कोणाहीबद्दल जजमेंटल होण्याआधी नक्की निश्चित करा. तशी स्वतःला सवय लावा.

१) स्वतःबद्दल अधिक जागरूक रहा. स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवा. त्यांना नीट वळण लावा.

२) कोणत्या कारणाने तुम्ही जजमेंटल होता? याचा शोध घ्या. स्वतः मधील कमतरता आणि दोष तुम्हांला दुसऱ्यांबद्दल जजमेंटल होण्यासाठी भाग पाडतात.

३) प्रत्येक व्यक्तीकडे सहानुभूती पूर्ण भावाने पहा.

४) तुमचे पूर्वग्रहदूषित विचार आणि मतं लिहून काढा. त्या ऐवजी सकारात्मक विचार लिहा.

५) वस्तुस्थिती आणि समोरची कोणतीही व्यक्ती आहे तशी स्वीकारायला शिका. मुळात दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा.

६) तुमचं सामाजिक वर्तुळ वाढवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

७) मनात करूणा, दयाभाव, अनुकंपा ठेवा.

८) सकारात्मक, वास्तववादी विचारांची मनाला सवय लावा. यासाठी नियमित प्रयत्न हवेत.

९) स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून पहा. तुम्ही त्याच्या प्रवासात कसे वागला असतात याचा शोध घ्या.

१०) सगळ्यात महत्त्वाचं एखाद्यावर सहज मत व्यक्त करताना, दोषारोप, ताशेरे ओढताना त्याच्या परिस्थितीचा विचार करा. आणि तुम्ही स्वतः त्याच्यापेक्षा सुस्थितीत आहात याबद्दल ऋणी, आभारी रहा. तुमच्याकडे जे आहे त्याचं मूल्य जाणा.

गॉसिपिंग करणे, जजमेंटल असणे याने तुम्हीं नक्कीच मोठे होत नाही. “दुसऱ्याची रेष पुसून तुम्हांला तुमची रेष मोठी करता येत नाही.” उलट माणूस म्हणून तुम्ही फारच तोकडे, हीन होता. जजमेंटल होण्यापेक्षा त्याची बाजू समजून घ्या. निदान कोणाबद्दल नकारात्मक तरी बोलू नका. तुमची हीच ऊर्जा तुमच्याकडे परत येते हे लक्षात ठेवा. फुकट कुचाळक्या, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं यापेक्षा ही ऊर्जा स्वतःमध्ये गुंतवा. स्वतःची प्रगती करण्याकडे वळवा.आणि एक माणूस म्हणून प्रगल्भ व्हा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!