Skip to content

“कोणाची नजर कधी लागत नाही, तर आपणच ती लावून घेतो.”

“कोणाची नजर कधी लागत नाही, तर आपणच ती लावून घेतो.”


मधुश्री देशपांडे गानू


“किती सुंदर दिसतेस ग! कोणाची नजर नको लागायला.” किंवा “अगदी राजा राणी ची जोडी आहे तुमची, made for each other ” कुणाची दृष्ट नको लागायला.” अशी वाक्यं आपण अगदी नेहमी सहज ऐकत आलो आहोत. प्रत्येक आईला आपलं मूल हे जगातलं सर्वात सुंदर मूल आहे असंच वाटत असतं. आणि हे अगदीच नैसर्गिक आहे. ती तिच्या परीने या बाळाची दृष्ट काढत असते. अगदी ते मोठे झाले तरीही. आपल्याकडे तर हा दृष्ट काढणे, नजर उतरवणे प्रकार अगदीच सामान्य, प्रत्येक घरात घडणारा आहे. या सगळ्यात एक आई म्हणून तिला समाधान लाभतं.

आपलं मूल सुरक्षित, सुदृढ असावं अशी तिची मातृत्वसुलभ भावना असते. अगदी पिढ्यान पिढ्या आपण हा प्रकार चालत आलेला पाहिला आहे. आणि अगदी आजही आधुनिक काळातही बऱ्यापैकी टिकून आहे. काहींचा यावर अगदी ठाम विश्वास असतो. तर काहींचा अजिबात नसतो. पण आपले आई-वडील, आपली आजी यांचा विश्वास असेल तर, त्यांच्या या वागण्याला प्रतिकार करू नये असं मला मनापासून वाटतं. कारण यामागे फक्त त्यांची काळजातून आलेली माया असते. त्यांची तशी मानसिकता परंपरेने झालेली असते.

म्हणजेच नजर लागणे, दृष्ट लागणे हे आपल्या मनातले विचार आहेत. ही आपल्या मनाची धारणा आहे. खरंच अशी नजर लागते का?? नसेलच लागत. पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.

आजच्या धावपळीच्या जगात खरंच कोणाला एवढा वेळ आहे का?? असेही एकदा वाटून जातं. आणि तरीही आपल्यावर जळणारे, ईर्षा, मत्सर, हेवा करणारेही आपल्या आसपास असतातच की! आपलं चांगलं होऊ नये अशी काही जणांची इच्छा असते. तर काही तसा प्रयत्नही करतात. पण याला फक्त दृष्ट लागणे म्हणता येईल का?? तर नाही. फक्त एवढेच म्हणून सोडून देता येणार नाही.

“भित्या पाठी ब्रह्मराक्षस” अशी अगदी चपखल म्हण आहे मराठीत. मला कोणाची तरी सारखी नजर लागते, दृष्ट लागते ही माझी मानसिकता, माझा विश्वास मीच तयार केलेला असतो. आणि याच विचारांची आपल्याला सवय होते. काहीही वाईट, दुःखद प्रसंग घडला तर अमक्याची/तमक्याची दृष्ट लागली असं म्हणून आपण मोकळे होतो. खरंतर फक्त एवढंच नसतं. आपण “नजर लागते” याच बिंदू भोवती विचारांचं जाळं निर्माण करतो. त्याला अनुभवाचे दाखले देतो. आणि मग त्याचा बागुलबुवा तयार करतो. अगदी रोजच्या रोज मुलांची दृष्ट काढणारी घरे आहेत.

यामुळे तुम्ही मनाने, विचारांनी कुठेतरी कमकुवत होता. कारण अशी रोज नजर लागत नाही, तर आपण ती लावून घेतो. कारण घडलेल्या घटना, वाईट अनुभव यांची जबाबदारी घ्यायला आपण तयार नसतो. याच आपल्या मानसिकतेतून आपण वारंवार नजर लागण्याचे प्रकार ओढवून घेतो. मग “बोले तैसा चाले”च्या धरतीवर आपल्याला सारखीच कोणाची तरी नजर लागते. कोणीतरी सारखा आपल्या वाईटावर टपून बसला आहे, असा आपला समज होतो. हे सगळं आपण नकारात्मक, भित्र्या मानसिकतेतूनच घडवलेलं असतं.

आपल्या आयुष्यातील प्रसंगांना, घटनांना, माणसांना, नात्यांना, आर्थिक व्यवहारांना आपण जबाबदार असतो. पण आपल्यामध्ये ते मान्य करण्याचे धाडस, धैर्य नसतं. मग अशा नजर लागणे या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. अशी नजर आपणच आपल्याला लावून घेतो. या निरुपयोगी विचारांना मनात थारा देऊन आपण स्वतःचेच नुकसान करून घेतो. आणि या नकारात्मक विचारांच्या आहारी जातो. हे तर सगळ्यात वाईट..

त्यापेक्षा आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक राहणं, स्वतःलाच प्राधान्य देणे, वास्तवाचा विसर पडू न देणे, व्यवहारी विचार आणि कृती करणं अशा गोष्टींवर लक्ष संपूर्ण केंद्रित करायला हवं. नजर लागते वगैरे नकारात्मक विचार कायमचे मनातून काढून टाकायला हवेत. यशस्वी व्यावसायिक, गर्भ श्रीमंत माणसे, यशस्वी अभिनेते अभिनेत्री यांना पण सारखी नजर लागते का??? नाही ना! कारण ते फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करतात.

तुमच्या मनाला कमकुवत बनवणाऱ्या या मानसिकतेतून बाहेर पडा. आणि विचारांचे सूनियोजन, सत्याधिष्ठित विचार, कृती, सकारात्मक मानसिकता, आत्मविश्वास यांची सुयोग्य सांगड घालून तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हींच होण्याची सवय मनाला लावून घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!