Skip to content

कितीही भांडणे झाली तरी काही हक्काची माणसे कधीच बदलत नाहीत.

कितीही भांडणे झाली तरी काही हक्काची माणसे कधीच बदलत नाहीत.


हर्षदा पिंपळे


आपल्या आयुष्यात माणसांचा वावर शेवटपर्यंत कधीच थांबत नाही.आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांशी आपण कनेक्ट होत असतो.कुणाशी आपलं क्षणभरही पटत नाही तर कुणाशी आपलं इतकं जमतं की काही विचारायलाच नको.मग ती घरातील एखादी व्यक्ती असो वा बाहेरचं कुणीतरी असो.कळत नकळतपणे आपण त्यांच्या खूप जवळ पोहोचलेलो असतो.

ती माणसं म्हणजे आपल्याला आपली हक्काची माणसं वाटायला लागतात. ज्यांच्याशी आपण भांडतो,ज्यांच्यावर आपण हक्काने रागावतो,रूसतो,ओरडतो,ज्यांच्याशी आपण मनातील साचलेलं बरच काही मोकळं करतो अशी माणसं म्हणजे आपला हक्काचा निःस्वार्थी कोपरा ! मग या माणसांसोबत कितीही भांडणं झाली तरी ही माणसं बदलत नाही. अर्ध्यावर साथ सोडून जात नाही. कारण ती माणसही आपल्यासोबत आतून जोडलेली असतात. त्यांनाही आपल्याविषयी अशीच आपुलकी असते. आपल्यासारखाच त्यांचाही आपल्यावर तितकाच जीव असतो.

तुम्हीही अनुभवलाच असेल असा हक्काचा एखादा हळवा कोपरा ! मित्र-मैत्रिणी, बहीण-भाऊ , कलिग्स, किंवा आयुष्यात असलेली कोणतीही एखादी व्यक्ती तुमच्याशी भांडलेय किंवा तुम्ही तिच्यासोबत भांडला आहात आणि तरीही तुमचं नातं तितकच मुरलेलं आहे का? की सोडून गेलय तुम्हाला कोणी?की तुम्ही कुणाला सोडून गेलात ? नाही नं?

सगळीच माणसं बदलत नाही.काही हक्काची असतात अशी माणसं जी कायम एकच निःस्वार्थ भावना घेऊन आपल्या सोबत असतात. ही अशी माणसं सहसा बदलूच शकत नाही.त्यामागे काही कारणही आहेत. जसं की,प्रेम,सहवास, आठवणी, संवाद वगैरे वगैरे.

प्रेम- हक्काची माणसं म्हणजे निव्वळ निःस्वार्थ प्रेम.ही माणसं हक्काने प्रेम करतात. कोणत्याही भांडणांमुळे यांच प्रेम कधीही आटत नाही. क्षणभर रूसवा असतो पण तो क्षणासाठीच.हक्काने रागावणारी ही माणसं भांडतील, चिडतील, आदळ आपट करतील ,रागाच्या भरात नको नको ते बोलतील पण नंतर मात्र तितक्याच हक्काने सॉरी बोलून जवळ घेतील.

*संवाद-संवादाने नाती जिवंत राहतात. कितीही भांडणं झाली तरी काही हक्काची माणसं नातं टिकवून ठेवण्यासाठी तोडका-मोडका का होईना पण एकमेकांशी संवाद साधत राहतात.भांडणांमुळे ही माणसं सहसा नाती तोडून जात नाही.नातं जिवंत ठेवायला ही माणसं संवादही जिवंत ठेवतात.

*सहवास – सहवासाने माणूस एकमेकांच्या अधिक जवळ येत असतो.स्वतःची जागा सोडून जरी जगाच्या कानाकोपऱ्यात माणूस गेला तरीही त्याला तो अनुभवलेला सहवास आठवत राहतो.सहवासातील आठवणी, तो टाईम, ती फेझ् क्षणाक्षणाला त्याला आठवत राहते.त्यामुळे एकमेकांच्या नात्यात कितीही वितुष्ट निर्माण झाले तरीही या माणसांना एकमेकांबद्दल तितकाच जिव्हाळा कायम असतो.

आठवणी- आठवणींना अंत हा नसतो.मग कधी कधी आपल्याला वाईट आठवणीही आठवतात. तशाच चांगल्या आठवणीही आठवतातच.आता भांडणं झाली की आठवणी पुसल्या तर जात नाहीत नं ? एकमेकांसोबत घालवलेले सोनेरी क्षण त्यावेळी मात्र आठवत राहतात.

ही अशी असतात हक्काची माणसं.क्वचितच एखादा माणसे सहजपणे बदलू शकतो.नाहीतर ही माणसं कायम तशीच राहतात.जिव्हाळा त्यांच्या मनात कायमस्वरूपी एखाद्या झऱ्यासारखा खळाळत राहतो.कितीही उलथापालथ झाली तरीही ही माणसं बदलत नाही.कालचं प्रेम आजच्या भांडणांमुळे कधीच कमी होत नाही.

काही चुकत असेल तर काही मित्र तर हक्काने कान पिळतात,पण असं मध्येच आपली साथ सोडून जात नाही. व्यवस्थित समज देऊन पुन्हा आपल्याशी ते त्याच हक्काने वागतात.

अशी माणसं आयुष्यात असतील तर त्यांना नक्की जपण्याचा प्रयत्न करा.अशी माणसं गमवायला क्षण पुरेसा असतो परंतु कमवायला मात्र सगळं आयुष्यही कमी पडतं.म्हणून माणसं ओळखा,माणसांना अनुभवायला शिका.आणि हक्काच्या कोपऱ्यांना तडा गेला तर तो तडा पुन्हा जोडायला शिका.आपलीच माणसं आपणच जपायला हवी नं?भांडण झालं म्हणून बदलण्यात काय अर्थ आहे?

मित्रांनो,हक्काची माणसं कधी भर ऊन्हात गारव्यासारखी येतील काही सांगता येत नाही.आणि अशी माणसं मिळायला खरच खूप वेळ लागतो.सहजासहजी अशी माणसं आयुष्यात येणं कठीणच!

So….माणसं जपा…आणि माणसातील भावनाही जपायला शिका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “कितीही भांडणे झाली तरी काही हक्काची माणसे कधीच बदलत नाहीत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!