Skip to content

खूप हळवं होऊन चालत नाही, कारण अशा व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो.

खूप हळवं होऊन चालत नाही, कारण अशा व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो.


काव्या गगनग्रास

(समुपदेशक)


सकाळपासून वर्षाच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. वसंत तिला समजावून थकला होता. पण तिचं रडणं काय थांबत नव्हत. कारण काय, तर ईशानला आज बोर्डिंगला पाठवायच होत. ईशान त्यांचा एकलुता एक मुलगा. खूप वर्षांनी झाला होता त्यामुळे सर्वांचा लाडका आणि शेंडेफळ. ते एक कारण होतच की तो आईचा खूप लाडका होता. सोबत अजून एक कारण होतं. ईशान जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हा मोठ्या आजारपणातून बाहेर पडला होता.

सर्वांनी आशा सोडली होती परंतु नशिबाने तो वाचला. त्याच्याबाबत आधीपासून हळवी असलेली वर्षा अजूनच हळवी झाली. त्याला जरा काही दुखल खुपल तरी तिचा जीव कासावीस होई. बाहेर जायचं असलं तरी तिचं अर्ध लक्ष ईशानकडेच असे. हेच कारण होत की त्याला ती कुठे राहायला देखील पाठवायची नाही. तो तिला सतत नजरेसमोर लागे. बर मुलाच्याबाबत तिचा हळवा स्वभाव होता अस नाही. मुळातच ती खूप हळवी होती.

लहान असताना पण मांजर पाळायची तिला खूप हौस. त्यांना जरी काही त्रास झाला तरी ही रडायला लागायची. कोण काहीतरी पटकन बोललं, रागावल तरी डोळ्यात पाणी यायचं. आई बाबांना तिची काळजी वाटायची की ही कशी पुढे जाऊन आयुष्य काढणार? इतकं हळवं होऊन कसं चालेल? पण तसच झाल. ईशानच्या बाबत ती हळवी झाली. तिचं त्याला अती सुरक्षित वातावरणात ठेवणं, नको तेवढे लाड करण, हवं ते आणून देणं; त्यातून ती हट्टी बनत चालला होता. नीट अभ्यास करायचा नाही, हट्ट करायचे. त्याच हे वागणं पाहून वसंत ने त्याला बोर्डिंगमध्ये ठेवायचा निर्णय घेतला.

वर्षा खूप भांडली, हर तऱ्हेने तिने वसंतला समजावून पाहिले. साहजिक होत. ती एक दिवस ईशान शिवाय राहिली नव्हती. त्यामुळे तो असा दुसरीकडे राहायला जाणार हेच तिच्या मनाला पटत नव्हत. पण वसंत तसा नव्हता. त्याला माहित होत की तो जे काही करत आहे ते ईशानच्या भल्यासाठी करत आहे. त्याने विचार केला वर्षा पण हळू हळू यातून भक्कम होईल. तिला पण समजेल आणि ती बदल स्वीकारेल. पण अस झालच नाही.

उलट ज्या दिवशी हे ठरलं तेव्हापासून ती नुसती रडत होती. यातून वसंतला दुप्पट कष्ट पडत होते. कारण ती अस रडून ईशानच जाण अवघड करून टाकत होती. त्या दोघांनी मिळून त्याला समजावून पाठवायच होत तर वसंतला दोघांना पण समजवाव लागत होत. त्याने कसतरी तिला शांत केलं व दोघं मिळून त्याला बोर्डिंगला सोडून आले. पुढचे कित्येक दिवस वर्षा नीट वागली नाही. सारखी ईशानची आठवण काढत बसायचं, मुसमुसायच. नीट जेवायचं नाही. वसंत समजावून थकला. त्याला माहित होत तिच्या या हळव्या स्वभावाचा त्रास तिलाच जास्त करून सहन करावा लागतोय. पण ती कोणालाच ऐकत नव्हती. तेव्हा मात्र त्याचा नाईलाज झाला आणि त्याने परिस्थितीवर सर्व सोडून दिलं.

माणसाप्रमाणे स्वभाव बदलत जातो. काही जण खूप शिस्तप्रिय असतात, काही जण मिश्किल असतात, काही जण मोकळ्या स्वभावाचे तर काही मृदू स्वभावाचे. कोणाचा स्वभाव कसा असेल सांगता येत नाही. पण कोणत्याही गोष्टीचं टोक गाठणं हे नुकसानकारकच असत. आपण खूप जास्त कठोर असलो तरी आपलं नुकसानच असत. कारण नातेसंबंध नीट तयार होत नाहीत. वाद होण्याची शक्यता जास्त असते. तेच जर आपण खूप हळवे, भावनिक असलो तरी आपलं नुकसानच असत.

कारण अश्या माणसांना स्वतःच्या भावनांवर आवर घालता येत नाही. अशी लोक लगेच दुःखी होतात. यातून त्यांचं स्वतःच नुकसान तर होतच पण समोरच्या व्यक्तीच्या विकासामध्ये पण बाधा येते. जसं की वरच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे जिथे मुलाला भक्कम केल पाहिजे तिथे आपणच गळून पडलो, हळवे झालो तर तो पुढे जाऊन येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जाऊ शकतो का? पुढचं राहू, ती परिस्थिती तरी त्याला हाताळता येईल का? नाही. त्यामुळे जिथे खंबीर व्ह्यायला पाहिजे तिथे झालं पाहिजे. तिथे हळवं भावनिक होऊन चालत नाही. यातून चांगल काही निर्माण होत नाही.

अनेक जण अश्या स्वभावाचा फायदा पण करून घेतात. आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीत हळवं असण्याच प्रमाण जास्तच असत. अनेकदा या अश्या हळव्या स्वभावाचा फायदा घेऊनच त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेणं, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडून देणं अश्या घटना घडतात. कारण जिथे स्वतःसाठी काही स्टँड घेतला पाहिजे तिथे मुलांच्या मायेपोटी घेतला जात नाही. हा हळवा स्वभावच तिथे नडतो.

म्हणून मनाने जितके आपण संतुलित असू, स्टेबल असू तितकं आपल्यासाठी चांगल असत. त्यासाठी आपल्याला आपल्या भावना ताब्यात ठेवता आलाय पाहिजेत आणि योग्य पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. कारण पाऊस कितीही आल्हाददायक असला तरी जास्त पडल्यावर पुरच येतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो हे लक्षात घेवून ज्या त्या वेळी वागल तर नंतर त्रास सहन करावा लागत नाही.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!