बरं चाललंय हे सर्वांना सांगता येतं, पण खरं काय चाललंय हे सांगण्याची इच्छा नसते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“Hey hiii गिरीश, कसा आहेस? काय चाललंय?” रवीने विचारलं. खूप दिवसांनी आज बाजारपेठेत त्यांची भेट झाली होती. गिरीश काहीतरी खरेदी करायला आलेला होता आणि रवी त्याच्या घरी चालला होता. गिरीशच तर लक्ष पण नव्हत. तो तर रवी होता ज्याने त्याला पाहिलं व ओळख दाखवून हाक मारली. ते दोघं कॉलेज मध्ये एकत्र शिकत होते. त्यांची मैत्री अशी फार घट्ट नव्हती. पण चांगली ओळख होती. बोलण वैगरे होत.
नंतर काय फार संपर्क नव्हता. पण तरी रवीने ओळख ठेवून त्याला हाक मारली हे पाहून त्याला बर वाटलं. तो देखील बोलायला थांबला. दोघांनीही गप्पा मारल्या. रवी अगदी मन मोकळेपणाने बोलत होता. त्याचा स्वतःचा बिझनेस होता. लग्न झालं होऊन दोन मुलं होती. त्याच्या काही कामानिमित्त आज तो इथे आला होता. खूप दिवसांनी आपल्या आधीच्या ओळखीचं कोणतरी दिसल हा आनंद सरळ सरळ तोंडावर दिसत होता.गिरीश पण आनंदी झाला नव्हता अस नाही.
पण त्याच्या बोलण्यात मात्र मोकळेपणा जाणवत नव्हता. अगदी दबून, उसन बोलल्यासारखा तो बोलत होता. रवीने काहीही विचारलं तरी तो चांगल चाललय, मस्त चाललय इतकंच बोलत होता. रवीला पण ते कुठेतरी जाणवलं. पण तो जास्त खोलात जाऊ शकत नव्हता. त्याने समजून घेतल व थोडा वेळ गप्पा मारल्यावर तो ही त्याचा निरोप घेऊन निघून गेला.
रवी गेल्यावर गिरीश स्वतःशीच बोलू लागला. “काय काय सांगणार तुला? माझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते. कामात मनासारखं समाधान मिळत नाही. घरी वाद होत राहतात. कोणाला कसं सांभाळायचं समजत नाही. ही विस्कटलेली घडी सावरायची कशी हे लक्षात येत नाही. कोणाला काय सांगणार? परिस्थिती माझ्यावर हसत आहे तिथे माणसं किती आणि काय ऐकून घेतील. आणि होणार काय सांगून? अशी किती मदत होणार मला त्यातून?” मनातल्या मनात सलत असलेल्या या दुःखांशी बोलत तो ही मग घरी निघून गेला.
हे अस आपल्या बाबतीतही होत असत. खऱ्या आयुष्यात वेगळ्याच प्रकारे गोष्टी घडत असतात, चढ उतार येत असतात. पण दर वेळी आपण ह्या गोष्टी सर्वांना सांगतोच अस नाही. बऱ्याच वेळा आपण आपलं सर्व अलबेल चालू आहे असच दाखवून देत असतो. का? तर आपल्याला इच्छा नसते आपलं रडगाण दुसऱ्यांना सांगायची. तसच आपण आपल्या आयुष्यात जे काही होत आहे ते समोरच्याला सांगितलं तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील, आपली चेष्टा करतील का? आपल्या मागून काहीतरी बोलतील का असही कुठेतरी वाटत असतं?
अनेकदा आपल्या परिस्थितीने आपल्या जवळच्या माणसाला त्रास होण्याची शक्यता असते. सासरी गेलेली मुलगी जरी त्रास होत असेल तरी माहेरी आई बाबांशी बोलताना हसत बोलते. सर्व चांगल आहे अस सांगते. का ? तर खर सांगितलं आणि आपल्या माणसांना काही त्रास झाला तर ते तिला नको असत. अनेक जणांना आपली खरी परिस्थिती समोरच्या माणसाला सांगितली तर कदाचित आपल्याला मदत मिळू शकते, आपलं मन हलक होऊ शकत हे समजत नसत. समोरचा फार फार तर ऐकून घेईल पण त्यापलीकडे माझ आयुष्यात काय होणार आहे? अस वाटत असतं.
आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये यासाठी आपली खरी परिस्थिती न सांगणं यात हेतू वाईट नसला तरी कोणालाच काही न सांगणं, लपवण यातून आपण आपल्याला एकटे पाडून टाकतो. गरज नाही आपली परिस्थिती सर्वांना सांगत बसली पाहिजे. आपल्या आयुष्यात चढ उतार येत असतात. तसेच ते इतरांच्या आयुष्यात पण येतात. त्यामुळे त्याला एकट समोर जाण्यापेक्षा जिथे खरच गरज आहे तिथे आपल्या जवळच्या व्यक्तीला जी आपल्याला समजून घेऊ शकते तिला सांगायला काही हरकत नसते.
कारण गोष्टी मनात साठून राहिल्या तर त्याने जास्त त्रास होतो. त्यामुळे जिथे आपल्याला मदत लागणार आहे तिथे घेतली पाहिजे. त्यात कमीपणा असा काहीच नसतो. आणि लोक आपल्याला हसतील, काहीतरी म्हणतील अस फक्त आपल्याला वाटत असत. हे खर असतच अस नाही. म्हणून योग्य वेळी योग्य ती मदत घेतली पाहिजे. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, स्वतः ला विकसित करण्यासाठी.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
