खराब मूड छान करण्याचे काही परिणामकारक उपाय!
अपर्णा कुलकर्णी
आपला मूड ही खूप पटकन बदलणारी गोष्ट आहे. कधी कधी दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झालेली असते, तरीही काहीतरी घडते आणि आपला मूड बिघडतो. एखादी घटना, कोणाचे तरी बोलणे, एखादी आठवण आपला मूड खराब करायला कारणीभूत ठरते आणि यातील काहीच घडले नाही तर उगाच आपल्याला उदास, भकास वाटायला लागते. का याचे कारण समजत नाही. खरतर कधी कधी काहीच कारण नसताना ही आपण असेच मलून, तोंड पाडून बसलेलो असतो.
आता आपण दिवसातील बारा तास एकदम फ्रेश, टवटवीत आणि मस्त मूडमध्ये नाहीच राहू शकत म्हणा. रोजच्या कामाचा व्याप, धावपळ, ताण असतोच मनावर तो दिसतोच कुठेना कुठे आपल्या चेहऱ्यावर आणि मग त्याचाच परिणाम आपल्या मूड वर दिसून येतो. पण तरीही काही खास उपाय केले तर आपला मूड दिवसभर फ्रेश राहू शकतो. काय करायला हवे आहे त्यासाठी, बघुया ….
– आपला मूड दिवसभर फ्रेश राहण्यासाठी दिवसाची सुरुवात फ्रेश झाली पाहिजे आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून मोकळ्या स्वच्छ वातावरणात फिरून या, योगा करा, चिंतन करा, मस्त हिरव्यागार गवतावर चाला.
– दुर्लक्ष करायला शिका. आपल्या घरातील प्रत्येकाशी आपले पटतेच किंवा त्यांच्या सगळ्या सवई पटतात असे नाही. समजा तुमच्या घरातील व्यक्तींना अलार्म लवकर बंद करण्याची सवय नसेल, लवकर उठण्याची सवय नसेल, किंवा मग पटकन कामे उरकण्याची सवय नसेल तरीही आपली चिडचिड होते आणि आपला मुड तर खराब होतोच शिवाय दिवसही खराब होतो. त्यामुळे सगळ्यांच्या न पटणाऱ्या सवाईंकडे दुर्लक्ष करायला शिका.
– नेहमी सकारात्मक विचार करायला शिका. स्वतःला म्हणजेच स्वतःच्या मनाला नेहमी अशा सूचना द्या ज्यामुळे तुम्हाला राग येणार नाही. जसे की,
मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवले आहे.
आज दिवसभर माझा मूड छानच राहील.
आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे.
अशा प्रकारे स्वतःला सूचना देत रहा म्हणजे तुमचे मन त्यावर काम करेल.
– रोज तुम्हाला रिलॅक्स करणारे संगीत ऐकत जा.
– मुड खराब होण्यामागील नेमके कारण शोधा आणि त्यावर उपाय करा. म्हणजे समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचे भांडण झाले असल्यामुळे तुमचा मुड खराब झाला असेल तर त्या व्यक्तीशी जाऊन बोला. तुमच्यातील वाद मिटवा.
– तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा. लाँग ड्राईव्ह, एखादा आवडीचा पदार्थ खा किंवा करून खाऊ घाला, फिरायला जा, जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा,शॉपिंग करा, मूव्ही बघा, नृत्य करा. थोडक्यात अशी कोणतीही गोष्ट करा जी करून तुम्हाला आनंद मिळेल आणि मूड चांगला होईल.
– नेहमी सकारात्मक लोकांच्या सोबत रहा आणि आपली संगत चांगली ठेवा. कधी कधी काय होत आपण खूप चांगल्या मूड मध्ये असतो पण आपल्या अवती भोवती वावरणारे लोक जर नकारात्मक आणि सतत आपले दुःख लोकांना सांगत राहणारे असतील ना तर आपला मूड चांगला राहूच शकत नाही. कारण सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होतोच आपल्या मनावर. त्यामुळे नेहमी आनंदी, सकारात्मक लोकांच्या सोबत रहा आणि संगत चांगली ठेवा.
– मनात चालू असलेली घालमेल एखाद्या योग्य व्यक्तीशी बोलून व्यक्त करत जा किंवा मग लिहून काढत जा. कारण प्रत्येक वेळी आपल्याला हवी ती व्यक्ती सापडेलच असे नाही.
– रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चांगल्या घटना लिहून ठेवण्याची सवय करा. म्हणजे आपल्याला चांगला म्हणजेच सकारात्मक विचार करण्याची सवय लागेल.
– रोज झोपण्यापूर्वी प्रेरणादायी व्हिडिओ पहा किंवा मग मन शांत आणि प्रसन्न करणारे संगीत ऐकून झोपा.
– रोज निदान अर्धा तास छान पुस्तके वाचा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन. पण ही पुस्तके म्हणजे आत्मविश्वास वाढवणारी, काहीतरी जगण्याची कला शिकवणारी, जगण्याला नवा अर्थ देणारी आणि प्रेरणादायी असावी. म्हणजे मन नव्या उमेदीने कामाला लागेल.
यश तुमच्या हातात
सिक्रेट
वपुर्झा
सुधा मूर्ती यांची पुस्तके
यशस्वी उद्योजक / उद्योजिका यांची पुस्तके.
अब्दुल कलाम
रतन टाटा यांचा प्रवास
अशी काही पुस्तके जी आयुष्य बदलून टाकतील.
– आहे ती परिस्थिती आहे तशी स्वीकारा. आयुष्य म्हटलं की संघर्ष, चढ, उतार, सुख, दुःख असणारच. संघर्ष असायलाच हवेत. ते जगण्याला नवा अर्थ देतात, शिकवण देतात. त्यामुळे काहीही झालं की खचून जाण्या पेक्षा आहे तसे स्वीकारून समाधानी राहायला शिका. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींवरून मुड खराब होणार नाही.
– नेहमी हसतमुख आणि आनंदी राहायला शिका. सगळेच छान वाटायला लागेल.
हे उपाय केल्याने तुमचा मुड चांगला होण्यास मदत होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
