Skip to content

खराब झालेल्या वस्तूला देखील परत एक संधी दिली जाते मग आयुष्याला का नाही?

खराब झालेल्या वस्तूला देखील परत एक संधी दिली जाते मग आयुष्याला का नाही?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मयुर भोवती सर्व घर फिरत होत. त्याच त्यालाच समजत नव्हत की तो काय करत होता. कश्याचच ध्यान नव्हत त्याला. त्याला फक्त इतकच समजत होत की आता या जगात आपलं काही काम नाही. आपण जगायच्या लायकीचे नाही. आपला तो अधिकार नाही. स्वतःच्याच नादात त्याने फॅनला चादर बांधली आणि त्याचा फास तयार केला. तो फास गळ्यात अडकवताना अनेक गोष्टी, आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. पण ते सर्व आता त्याला थांबवत नव्हत. सध्यातरी त्याला एवढच माहीत होत की आपल्याला आता इथे राहायचं नाही. अंजलीला, मयुरच्या आईला आज जरा उशिराने जाग आली. आदल्या दिवशी जे काही घरात चाललं होत त्याने कोणाचही चित्त स्थिर नव्हत. सर्वच डिस्टर्ब झाले होते.

अंजली आणि अनिल म्हणजेच मयूरचे आई बाबा. समाजात एक प्रतिष्ठित स्थान असलेलं कुटुंब. अनिलची स्वतःची कंपनी होती. अनिल मुळातच खूप सुखवस्तू कुटुंबातून आला होता, किंवा घरची खूप श्रीमंती होती अस नाही. उलटपक्षी खूप कष्ट करत शिक्षण घेऊन त्याने स्वतःच अस वेगळं स्थान त्याने समाजात निर्माण केलं होत. ही कंपनी हे त्याचं स्वप्न होत जे त्याने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं होत. शिक्षण क्षेत्रातही त्याला खूप मान होता.

अंजली जरी अनिलची बायको असली तरी तिने देखील स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. तिचे म्हणून एक वेगळे करिअर होते. ती एक उत्तम फॅशन डिझायनर होती आणि त्यांचा मुलगा मयूर. अत्यंत हुशार आणि त्या दोघांचा लाडका. त्याचा स्वभावच असा होता की तो सर्वांना हवाहवासा वाटे. त्यांची श्रीमंती त्याच्या बोलण्या वागण्यात कधी जाणवली नाही. लोकांमध्ये लगेच मिसळणे, त्यांच्याशी हसत खेळत बोलणे, इतरांना मदत करणे. अर्थात त्याच्या या स्वभावात बराचसा वाटा या दोघांचाही होता. त्यांनी त्यांच्यावर तसे संस्कारच केले होते. ती दोघही साध्या वातावरणात मोठी झाली होती.

आता श्रीमंती असली तरी त्यांनी असेही दिवस पाहिले होते जे त्यांची परीक्षा पाहणारे होते. त्यामुळे पैश्याचा गर्व त्यांना कधीही आला नाही. माणुसकी, नाते संबंध यांना त्यांच्या लेखी जास्त किंमत होती. या कुटुंबाला लोक मानत होती तीपण याच कारणासाठी. पाहायला गेलं तर दोघांचीही काम वेगळी, क्षेत्र वेगळी पण तरीही ती तिघ एकत्र होती, एक होती. घराबाहेर त्यांचं पद कोणतही असो घरात मात्र ती नवरा बायको आई बाबा आणि हा मुलगा अशीच राहायची. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ त्यांनी कधी एकत्र होऊ दिलं नाही.

आई बाबांप्रमाणेच मयूर पण खूप ambitious होता. त्याच पहिल्यापासून स्वप्न होत की आपण मोठ होऊन डॉक्टर व्हायचं. आता इथे डॉक्टर, इंजिनियर हीच करिअर मानाची आहेत, त्यातलच काम जास्त प्रतिष्ठेच आहे असा हेतू नव्हता. त्याला डॉक्टर व्हायचं होत लोकांची सेवा करण्यासाठी. जिथे अनेक जण पोहोचू शकत नाहीत अश्या खेड्यापाड्यात जाऊन त्याला लोकांची सेवा करायची होती.

लहानपणापासून त्याने त्याच्या बाबांच्या तोंडून बाबा आमटे तसच डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचं कार्य ऐकलं होत. ते ऐकून तो भारावून गेला होता. तेव्हाच त्याने ठरवलं होत की आपण पण असच काहीतरी करायचं ज्याने आपल्या आई बाबांना आपल्यावर गर्व व्हावा. शिक्षणात ती आधीपासून हुशार होताच. शाळेतून त्याची कधीच कसली तक्रार आली नाही. त्यामुळे आई बाबांना पण विश्वास होता की तो डॉक्टर होईल. बारावीत देखील त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले.

इतर मुल जिथे entrance exam ला भित होते तिथे मयूर खूप उत्साहित होता. Entrance चा अभ्यास त्याने खूप आधीपासून सुरू केला होता आणि त्याला खात्री होती की आपण ती सहज क्रॅक करू. पण सर्व आपल्याला हवं तसं झालं तर ते आयुष्य कसलं? टिकून राहण्याची क्षमता पाहायला अगदी छोट्या रोपालादेखील थंडी वाऱ्याचा सामना करावा लागतो. आपण तर माणसं आहोत. तसच काहीस मयुरच्या बाबत झालं. आज entrance चा रिझल्ट होता. सर्व आतुरतेने त्याची वाट पाहत होते. अंजली अनिल आणि मयूर. मयूर ने तर नीट काही खाल्ले सुधा नाही. कधी एकदा रिझल्ट पाहतो अस त्याला झालं होत.

पण त्याने जेव्हा रिझल्ट पाहिला तेव्हा सर्वानाच धक्का बसला. अगदी थोडक्या मार्कांनी मयूर मागे राहिला. पहिल्यांदा त्यांना कोणालाच विश्वास बसला नाही. काहीतरी टेक्निकल error असेल म्हणून अनिलने परत रिझल्ट चेक करायला लावला. पण त्यातून काहीही झाले नाही. मयूर entrance पास झाला नव्हता हेच खर होत. तो रिझल्ट पाहिल्यापासून मयूर काहीच बोलला नाही. तो तसाच खोलीत जाऊन बसला आणि दार लावून घेतले. अनिल आणि अंजली पण खूप अपसेट झाले होते.

कारण त्यांना माहीत होत मयूरने किती मेहनत घेतली होती या परीक्षेसाठी. त्या दोघांना त्याचीच काळजी वाटत होती. लोक आपल्याला काय म्हणतील याच त्यांना टेन्शन नव्हत. मयूरची मनस्थिती त्यांना जास्त महत्त्वाची होती. तो खोलीत गेला तो बाहेर आलाच नाही. रात्री अनिलने खूप हाका मारल्या तेव्हा त्याने दार उघडले. त्यांनी त्याला जेवायला बोलवले पण तो आला नाही. त्या दोघांनीही त्याला समजावले की त्याच्यावर नाराज नाहीत, ही फक्त परीक्षाच आहे अस होऊ शकत. पण त्यांचं बोलण त्याच्यापर्यंत कितपत पोहोचत होत काय माहीत? कारण तो फक्त शांत बसून होता. तेव्हा अनिल आणि अंजली बाहेर आले. अनिल अंजलीला म्हणाला की त्याला आपण थोडा वेळ देऊ. एक दोन दिवसात तो ठीक होईल.

ती दोघही नंतर त्यांच्या रूममध्ये गेली. इथे मयूरने परत दार लावून घेतल. रात्रभर तो तसाच होता. डोळ्यासमोरून रिझल्ट जात नव्हता. ती entrance त्याच्यासाठी साधी नव्हती. ते पहिल पाऊल होत जे त्याला त्याच्या स्वप्नाच्या दिशेने नेणार होत. जे आता तुटल होत. त्याचबरोबर आज आयुष्यात पहिल्यांदा त्याने आई बाबांचा अपेक्षा भंग केला अस त्याला वाटत होत. तो त्यांचा गर्व होता. पण आता हे सर्व तुटल होत. अपराधी भाव मनात इतका निर्माण झाला की त्याला आता आयुष्य संपवाव हा एकच पर्याय दिसला. इथे अंजली उठल्यावर आधी मयुरच्या रूम कडे आली.

रात्री सुद्धा तो नीट बोलला नव्हता. तिने दाराकडे येऊन त्याला हाक मारली पण आतून आवाजच आला नाही. दोन तीनदा हाक मारून सुद्धा त्याचा आवाज येईना तेव्हा ती घाबरली. तिने लगेच अनिलला बोलवले. त्याने देखील हाका मारल्या. शेवटी त्याने जोरात धक्का मारून दार उघडले. समोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांचा मयूर गळफास लावून फॅनला लटकून होता. अनिल लगेच गेला व त्याने त्याला सोडवून बेडवर ठेवले. त्यांनी त्याला हलवले हाका मारल्या पण त्यांना उशीर झाला होता. त्यांचा मयूर त्यांना सोडून गेला होता.

आई बाबांकडून कसली बळजबरी नव्हती की कसला दुराग्रह नव्हता की त्याने हेच करावं असच वागावं तरीही अस का झालं? नेमक काय आणि कुठे चुकल? तर मयूरचा दृष्टिकोन. आपल्या आई बाबांचा आपण गर्व आहोत, कधीही न आलेल अपयश तसच आताची परीक्षा हीच पहिली आणि शेवटची असणार आहे. ती परीक्षा पास होणे हेच महत्वाच आहे आणि अस झालं नाही तर आपल आयुष्यच फेल झालय अस वाटण. त्याला हे समजलं नाही की ही परीक्षा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे.

तसच तो ती परत देऊ शकत होता. त्यात नापास होण म्हणजे आयुष्य संपण नाही. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही. आणि आई बाबा त्याला हे समजावतील ही संधीच त्याने त्यांना दिली नाही. मयूर सारखी अनेक मुल मुली या सारख्या कारणांमुळे स्वतःचा जीव गमावतात. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर हिच्या भावाने देखील काहीश्या याच कारणाने आत्महत्या केली.

अश्या बातम्या वाचून मन दुःखी होत. आयुष्यात एखादा वाईट प्रसंग घडला, करा अपयश आलं तरी त्यातून आपलं पूर्ण आयुष्यच संपवाव अस वाटण्या इतकं आपलं आयुष्य तकलादू आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. घरातली एखादी साधी वस्तू देखील जर बिघडली तर आपण ती कित्येकदा आपण दुरुस्त करून वापरतो मग आयुष्याच्या बाबत हा नियम का लागू होत नाही. पैशाने विकत घेतलेल्या वस्तूच आपल्या लेखी इतकं मूल्य आहे ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची असते की त्याला आपण परत परत संधी देतो वापरात येण्यासाठी.

पाहायला गेलं तर आपल्याला तशी वस्तू बाजारात मिळू पण शकते तरी आपण ती वापरतो. मग आयुष्य जे परत मिळत पण नाही ते या वस्तुहून कमी मौल्यवान झाल का की छोट्या छोट्या बिघडाने त्याला आपण संपावाव? नाही! त्याला पण आपण संधी दिली पाहिजे आणि सतत दिली पाहिजे. आणि हाच विचार आपल्याला आपल्या मुलांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि स्वतःमध्ये रुजवायचा आहे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!