Skip to content

खाली पडणे म्हणजे अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे.

खाली पडणे म्हणजे अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे.


मेराज बागवान


यश-अपयश जीवनाचा अविभाज्य भाग. प्रत्येक गोष्टीत यश मिळतेच असे नसते.त्यामुळेच अपयशाला कधी ना कधी प्रत्येकाला सामोरे जावेच लागते.पण खाली पडणे म्हणजे अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे. आणि हाच विचार, दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर.यश-अपयश अनेक बाबतीत लागू होते.जसे की, अभ्यास, परीक्षा,नोकरी,व्यवसाय आणि आता नातेसंबंध हा देखील विषय ह्या यश-अपयशात सामील झालेला आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मुलांना अभ्यास असतो ,परीक्षा असते. कधी काही विद्यार्थी परीक्षेत नापास होतात तर कधी चांगले गुण संपादन करतात.असेही होते की , नापास झाल्यानंतर मुले निराश, उदास झालेली दिसतात.पण ही मुले परीक्षेत नापास झाली म्हणून अपयशी ठरत नाहीत तर निराश झाल्यामुळे अपयशी ठरतात.कारण खाली पडणे म्हणजे अपयश नाही तर तसेच पडून राहण्यात अपयश असते.

नोकरीत आणि व्यवसायात देखील अनेक चढ-उतार सुरू असतात.स्पर्धेमुळे जीव मेटाकुटिला येतो.आणि ह्या मुळे कधी व्यवसायात तोटा सहन करावा लागतो तर कधी नोकरीत हवे तसे ‘प्रमोशन’ मिळत नाही.मग काहीजण नैराश्याने ग्रासले जातात. व्यसनांच्या आहारी जातात.आणि हे असे वागणे म्हणजेच अपयश असते.

नातेसंबंध आज खूप नाजूक झाले आहेत. ‘व्यवहारी’ जीवनात विश्वास, आपलेपणा, काळजी,प्रेम काही ठिकाणी लुप्त होत आहेत.मग यामुळे नाती तुटण्याचे प्रमाण वाढले आहे.आणि ह्या मध्ये खरे अपयश हे आहे की ,’कोणीच नाते टिकविण्यासाठी पुढाकार न घेणे’.

आयुष्यात अनेकदा बरेच प्रयत्न करून देखील हाती यश लागत नाही.पण प्रयत्न करणे आपल्या हातात असते.पण तरी देखील अथक परिश्रम करून देखील पुन्हा पुन्हा अपयश मिळते.मग अशा वेळी आशा , प्रयत्न सोडून देऊन जो फक्त बसून राहतो, थांबतो तो खरा अपयशी ठरतो.अपयश येते म्हणजे काही आयुष्य थांबते असे नसते. अपयश हा एक आयुष्याचा भाग आहे.आणि उठून पुन्हा उभे राहणे हे खऱ्या यशस्वी माणसाचे लक्षण आहे.

जेव्हा व्यक्ती कोणत्यातरी बाबतीत अपयशी ठरते तेव्हा ती नाराज होते, हताश होते.आयुष्याचा मार्ग दिसेनासा होतो.आणि मग अशाच परिस्थितीत जो त्या राखेतून पेटून उभा राहतो तो सच्चा योद्धा असतो.मग त्या योध्याला अपयश मिळाले तरी चालेल पण त्याने ती पुन्हा घेतलेली भरारी खूप महत्त्वाची ठरते.

अपयशाच्या काळात माणसाचा खरा कस लागतो.म्हणून त्या काळात तुम्ही काय करता हे खूप महत्वाचे ठरते.जर तुम्ही अपयश पचवून पुढे जायला शिकलात तर आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात.पण फक्त ते अपयश मनाला लावून घेऊन बसून राहिलात तर अपयश कायम तुमच्या आयुष्यात राहते.म्हणून अपयशाला सामोरे जात असताना प्रत्येक पाऊल खूप महत्वाचे ठरते.दृष्टिकोन खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

काही व्यक्ती खूप हुशार, बुद्धिमान असतात.सातत्याने यश त्यांना मिळत असते.पण त्यांच्या जीवनात एक वेळ अशीही येते जेव्हा अपयश त्यांच्या पदरी पडते.अशा वेळी ही माणसे ह्या अपयशाचा सहजरित्या स्वीकार करू शकत नाहीत.आणि पुढे देखील जाऊ शकत नाहीत.ते स्वतःच स्वतःची प्रगती रोखतात.पण आयुष्यात हे होता कामा नये.अपयश देखील यशाप्रमाणे निधड्या छातीने स्वीकरता आले पाहिजे.अपयशाला हसत हसत सामोरे जाऊन, त्यातून धडा घेऊन, योग्य ते बदल करून पुन्हा नवीन यश मिळविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

प्रत्येक गोष्ट जशी ठरवली आहे तशी होत नाही.म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे होत नाही.आणि त्यामुळेच ह्या गोष्टीला ‘अपयश’ असे नाव आहे.पण अपयशाचे रूपांतर यशात कसे करायचे हे शिकता आले पाहिजे.१-२ टक्के का होईना नशिबाचा भाग असतोच.पण त्यामुळे ९९-९८ टक्के प्रयत्न थांबविले नाही पाहिजेत. ‘प्रयत्न’ जर शंभर टक्के असतील तर अपयश देखील फार काळ टिकत नाही.फक्त यासाठी हवी, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा.

जेव्हा जेव्हा अपयश येते तेव्हा तेव्हा आपण कसे वागतो आणि इतर आपल्याशी कसे वागतात हे महत्वाचे असते.कारण ह्या गोष्टीच आपली स्वतःशी आणि इतरांची आपल्याशी नव्याने ओळख करून देत असतात.अपयशाच्या काळात खूप थोडे जण आपल्यासोबत असतात.काही जण साथ सोडून जातात.पण तरी देखील संयम ठेवून आपण त्या अपयशाला सामोरे गेले पाहिजे.किती जरी नकारात्मक असेल, लोक त्या काळात तुमच्याशी वाईट वागत असतील तरी देखील स्वनियंत्रण ठेवून, डोके शांत ठेवून पुढे जायला शिकले पाहिजे.

जगभरात ज्या ज्या मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनात खूप मोठे अपयश अनुभवलेले आहे.मग ते आर्थिक असेल, सामाजिक, शैक्षणिक,कौटुंबीक असेल किंवा आणखीन काही.पण त्या व्यक्तींनी कधी हार मानली नाही आणि म्हणनच आज त्या इथपर्यंत पोहचू शकल्या आहेत आणि इतरांसाठी आदर्श ठरल्या आहेत.म्हणूनच आपण देखील अपयशाच्या काळात असे वागले पाहिजे की , इतरांना आपल्यामुळे प्रेरणा मिळाली पाहिजे.

कोणतीच गोष्ट आयुष्यात कायम नसते, अपयश देखील नसते.फक्त ते अपयश लवकरात लवकर यशात रूपांतरित करता आले पाहिजे.राखेतून उठून पुन्हा ‘फिनिक्स’ भरारी घ्यायला शिकले पाहिजे.चुकांमधून शिकून त्या सुधारता आल्या पाहिजेत.

अपयशाचे जास्त लाड करून नका,त्याला जास्त जपू नका.अन्यथा ते तुमचा पिच्छा सोडणार नाही.

यशस्वी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा !


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽क्लिक करा👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!