कायम चुकीची समजणारी लोकच आपल्याला आतून strong बनवत असतात.
हर्षदा पिंपळे
(उदाहरण क्रमांक-१)
स्नेहा मनाने तशी चांगली होती.हुशार होती.वागायला-बोलायलाही चांगली होती.कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत होती.तिच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती.चांगले मार्क्स मिळाल्याने तिला कमी पैशात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता.गावाकडची स्नेहा शहरात आली होती. तिन वर्ष चांगलीच शहरात मुरली होती.पण सुरूवातीला तिला खूप त्रास झाला.गावाकडची म्हणून क्लासमध्ये कित्येकदा तिला डिवचलं जायचं.
गावाकडची म्हणून काहीच कळत नाही किंवा चुकांच पुस्तक म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं.गावाकडची म्हणून तिला नीट बोलता येत नसणार,इंग्रजीचा आणि हिचा काहीही संबंध नसणार असं म्हणून तिला कायम दुय्यम वागणूक देणारी काही स्वतःला उगाचच “#हायफाय” म्हणवून घेणारी तरूण तरूणी तिच्या वर्गात होती.तिला सुरूवातीला या गोष्टींचा फार त्रास व्हायचा पण नंतर नंतर तिच्यामध्ये हिम्मत येऊ लागली.
मनाने हळवी असलेली स्नेहा मनाने कणखर होऊ लागली. आधी इतरांच्या बोलण्याचा खूप विचार करणारी स्नेहा अगदी दुर्लक्ष करायला शिकली आणि त्याच बरोबर प्रश्नांना उत्तरही द्यायला शिकली.एक कणखरपणा तिच्यामध्ये नव्याने निर्माण झाला होता.खरं तर त्या अवतीभवती असणाऱ्या वातावरणामुळेच तिच्यात हा बदल झाला होता. ती थोडीफार का होईना कणखर बनली होती.
(उदाहरण क्रमांक-२)
रोहनला बिझनेसमध्ये खूप रस होता.नोकरी करायची त्याची अजिबात इच्छा नव्हती.घरचे सारखे त्याला टोचून बोलायचे.घरी पैशाची तशी कधी कधी नड असायची.मोठा भाऊ सारखा बोलायचा इथे नोकरी कर तिथे नोकरी कर.तरी रोहनने एका शाळेत नोकरी शोधली. पहिली ते पाचवीच्या मुलांना तो शिकवायचा. दरमहा त्याला बारा हजार मिळायचे.
पण घरचे त्याच्या या नोकरीमध्ये अजिबात खुश नव्हते. रोहन नोकरी करत असतानाही त्याला त्याच्या घरचे चुकीच समजत होते.”तुझं चुकतय,तुझं चुकतय” असं करत त्याला जबरदस्ती आयटी कंपनीमध्ये नोकरी कर असा सल्ला देत होते. घरात रोज यावरून भांडणं व्हायची.खरं तर रोहन अक्षरशः वैतागला होता.पण या गोष्टीने रोहन दिवसेंदिवस अधिकाधिक स्ट्रॉंग होत चालला होता. त्याच्या मध्ये आव्हानं स्विकारायची ताकद नव्याने निर्माण होत होती.
पहा,ही झाली काही उदाहरणं.
परंतु आपल्या अवतीभवतीही अशी बरीच लोकं असतात जी आपल्याला कायमच चुकीचं समजत असतात.आपली कोणतीही गोष्ट त्यांना पूर्णतः चुकीचीच वाटते.किंवा आपण एखादी गोष्ट करायला गेलो तरी ती सुरूवातीलाच कशी चुकीची आहे हे दाखवून देतात. किंवा सातत्याने आपल्या प्रत्येक गोष्टीत चुका काढतात. समोरची व्यक्तीसुद्धा बरोबर असु शकते हे त्यांना मान्यच नसतं.पण अशावेळी आपल्या मनाची होणारी अवस्था केवळ आपणच समजू शकतो.
सातत्याने कुणीतरी आपल्याला चुकीचच समजतं ही भावना अनेकदा सहनच होत नाही.कधी कधी तर थोडाफार असलेला आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो.पण वारंवार असच घडत राहिल्याने मनाला त्याची कधी सवय होऊन जाते काहीच कळत नाही.आणि तेव्हाच आपण मनाने कणखर होतो.आपली सहनशीलता वाढायला लागते. एखाद्या गोष्टीचा आपल्या मनावर कसा परिणाम करून घ्यायचा ह्याची जाणीव आपल्यामध्ये हळुहळू निर्माण होते.
ढळलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा नव्याने निर्माण होतो. आयुष्यातील हर एक आव्हानांना सामोरे जाण्याची आपल्यात ताकद निर्माण करते.त्यामुळे सातत्याने कुणी तुम्हाला तुमचं चुकतय असं बोलत असेल तर बोलूद्या. त्या गोष्टीचा इतका विचार करू नका.वेळप्रसंगी दुर्लक्ष करायला शिका.चुका काढणारे सतत चुका काढणारच.अशी लोकही आयुष्यात असणं गरजेचच असतं.अशा लोकांमुळेच बऱ्याचदा आपण कणखर व्हायला शिकतो.निर्धास्तपणे बोलायला शिकतो.
वरवर तर कधी खोलवर आपल्याला त्यांच्या या अशा स्वभावाच फार वाईट वाटतं.प्रचंड राग येतो.कधी कधी असह्य होतं.पण महत्वाच म्हणजे या सगळ्यातून आपण काहीतरी शिकतो.
म्हणून असं कुणी सातत्याने आपल्याला चुकीच समजत असेल तर बिंधास्त समजुद्या.काही हरकत नाही.अशा लोकांचाच खरं तर आपल्या या कणखर होण्यामागे हात असतो.आपलं मन कणखर होण्यालाही कधी कधी हीच लोकं कारणीभूत असतात.अशा लोकांना मनातून धन्यवाद देऊन पुढे चालायला शिका,ज्यांच्यामुळे आपल्यातील क्षमतेची आपल्याला नव्याने जाणीव होते.
आयुष्य सुंदर आहे… कणखर व्हा,निर्धास्त रहा.

खुप छान आहे