काहींच्या आयुष्यात भरपूर सुख आहे, पण ते अनुभवायला वेळच नाही.
हर्षदा पिंपळे
सुख म्हणजे नक्की काय असतं…?
सुख म्हणजे नक्की काय असतं ?
आईच्या कुशीत विसावलेल बीज असतं
विश्वाला तिने दिलेलं एक सुंदर नातं असतं…
सुख म्हणजे नक्की काय असतं?
मृदेत रोवलेलं एक हिरवगार रोपटं असतं
अन् त्याच रोपट्यावर उमललेल एक सुगंधी फूल असतं …
सुख म्हणजे नक्की काय असतं?
बालपणीच्या आठवणीच एक अनोखं विश्व असतं
कितीही कौतुक केलं याचं तरीही कमीच असतं…
सुख म्हणजे नक्की काय असतं?
शाळा आणि कॉलेज यांच सुंदर मिलन असतं
रंगीबेरंगी आठवणींच एक सोनेरी पान असतं…
सुख म्हणजे नक्की काय असतं?
मैत्री आणि प्रेम यांच अलवार बंधन असतं
मनामनाला जोडणारं आपुलकीच स्पंदन असतं…
सुख म्हणजे नक्की काय असतं..?
जरासा रूसवा जरासा गोडवा अन् बरच काही असतं
समजावणं अन् समजून घेणं हेच गोड नात्यांचं गुपित असतं …
सुख म्हणजे नक्की काय असतं?
पहाटेच्या प्रहरी नभी दाटलेलं धुक असतं..
एकदा का होईना निसर्गाच्या सानिध्यात रमायचं असतं…
सुख म्हणजे नक्की काय असत..?
रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण असतं…
अन भिजता भिजताच निःशब्द भावनांना हळूवार साद घालणं असतं….
सुख म्हणजे नक्की काय असतं..?
शब्द-शब्द वेचून कवीने रचलेलं सुरेल असं काव्य असतं
भावनांनी निनादलेलं,अलगद स्पर्शानी भारावलेलं
प्रेमळ अनुबंधांनी बांधलेलं एक सुंदर आयुष्य असतं…
एक सुंदर आयुष्य असतं…!!
खरचं सुख म्हणजे दुसरं काय असतं…..???
खरं तर ज्याच्या त्याच्या सुखाची व्याख्या ही निराळीच असणार यात शंका नाही. पण या सगळ्यात कॉमन आहे ते म्हणजे सुख.प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे सुख.क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव असावा असं प्रत्येकाला वाटतं.आयुष्य दुःखाने भरलेला डोह असला तरीही सुखाच्या नद्याही आयुष्यात तुडुंब वाहत असतात हे नाकारून चालणार नाही. “सुख आणि दुःख”हीसुद्धा आयुष्याची दोन चाकच असावीत. दोघांशिवाय आयुष्याला काही अर्थच नाही. सुखाची किंमत कळायला अनेकदा दुःखाची चव चाखावीच लागते. कारण कधी कधी आयुष्यात अमाप सुख असूनही माणूस त्या सुखापासून जरा लांबच असतो.असलेलं सुख त्याला काही अनुभवता येत नाही. आणि एकदा का ते सुख निघून गेलं की त्याच सुखासाठी मन बैचेन होतं.एकीकडे सुख मिळत नाही म्हणून दुःख…तर एकीकडे सुख असून अनुभवता येत नाही याचं दुःख.खरचं कधी कधी वाटतं माणसाच्या या सुख-दुःखाचा ताळमेळ जमणं काही शक्य नाही. मिळालं तर मिळालं नाहीतर निसटून गेलं.
आता प्रत्येकाच सुख नेमकं कशात असू शकतं याची कल्पना केली तर….कुणाचं सुख हे कुटुंब, मित्र-मैत्रिणी, पैसा, जगप्रवास,खाद्यभ्रमंती,कुटूंबाच प्रेम,प्रेयसी/प्रियकराच प्रेम ,मायेचा स्पर्श ,पुस्तकं अगदी कशातही सुख असू शकतं.
आता काहीजणांकडे यातील बऱ्याच गोष्टी असतात. भरपूर पैसा, स्वतःच टुमदार घर,एकत्र कुंटूब,चांगल्या पगाराची नोकरी, स्वतःचे व्यवसाय अगदी नाही म्हंटलं तरी एखाद्या रिसॉर्टवर महिना महिनाभर निवांत राहू शकतात, चांगलं शिक्षण आहे वगैरे वगैरे.परंतु याच एकत्र कुटुंबात कामामुळे एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष सहभागी होताच येत नाही. कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे बाहेर फिरायचं झालं तरी सारख घड्याळ पहावं लागतं.आणि इतकं ऐश्वर्य असल्याने त्याची जपणूक कशी होईल याची लागलेली हुरहूर काही माणसाला स्वस्थ बसू देत नाही.स्वतःच्या/कुटुंबाच्या सुखासाठी दिवसरात्र काम,नी मध्येच जरासा विसावा यामुळे कुटूंबाकडे, असलेल्या जिवलगांकडे, आवडीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला माणसाला वेळच मिळत नाही. आता प्रायोरिटीझ् ठरलेल्या असतात त्यामुळे सुख असूनही त्या सुखाला अनुभवता येत नाही.
आता ज्याच्याकडे सुख आहे त्याने ते नक्कीच अनुभवायला हवं.कारण सुख कोणत्या क्षणी निसटून जाईल कळणार नाही. सुख म्हणजे काही पैसाच नाही तर तुमच्या आयुष्यात असणारं कोणतही सुख हे त्या त्या वेळी अनुभवायला हवं.ते सुख असेल तर त्याला ओंजळीत घ्यायला हवं. धकाधकीच्या जीवनात असलेलं सुखही आपण अनुभवत नाही यापेक्षा दुसरं दुःख काय असु शकतं…?
कधीतरी सुखाला प्रायोरिटी दिली तर….??? एक दिवस असलेल्या सुखाला प्रायोरिटी देऊन पहा.समोर असलेलं सुख अनुभवता आलं याचं समाधान नक्कीच चेहऱ्यावर असेल.कारण सुख मिळत नाही म्हणून आपण अनेकदा तक्रार करतो.पण मग सुख असतानाही आपण ते अनुभवत नाही याला तरी काय अर्थ…?
आयुष्यात जे सुख असेल ते अनुभवायचा नक्की प्रयत्न करा.सुखाचा सोनेरी क्षण असा न वेचताच वाया जाऊ देऊ नका. कारण ज्याच्या आयुष्यात सुखाचा एकही किरण लवकर येत नाही त्याचं दुःख आपण सहसा समजू शकत नाही. त्यामुळे वेळेअभावी असलेलं सुख गमवायची चूक करू नका. कारण ऊद्या वेळ भरपूर असेल पण गेलेले सुखाचे क्षण पुन्हा येतीलच असं नाही.सुखाचा क्षण आज आहे आणि उद्या नसला तर….??
नीट विचार करा…ताटात वाढलेल्या रूचकर मेजवाणीचा तत्क्षणी मनसोक्त आस्वाद घ्यायचा की……सगळं झाल्यानंतर त्याच चवीसाठी पुन्हा धडपडायच…… ज्याचं त्याने ठरवावं.
शेवटी प्रत्येकाच आयुष्य वेगवेगळं आहे. सुख-दुःखाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. कधी कोणता क्षण ओंजळीत घ्यायचा याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. दुःख किती महाग असतं याचा विचार करून तरी असलेल्या सुखाच्या घासाचा आनंद प्रत्येकाने आवर्जून घ्यायला हवा.
पहा…वेळात वेळ काढून दहा मिनिटं सुखाकडे पहायला शिका,आयुष्य सुंदर आहे….सुखाचे क्षण वेचायला शिका….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
