काहींच आयुष्य म्हणजे जुन्या जखमा चिघळत राहणं आणि नवीन घाव होत राहणं.
हर्षदा पिंपळे
“जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा.”
कवी,गझलकार, इलाही जमादार यांच्या या ओळी ऐकताना
खरचं खूप सुंदर वाटतात.काही जखमा असतातच सुगंधी !
पण काही…?
काही जखमांच दुःख सहजासहजी विसरता येण्यासारखं नसतं.कायमस्वरूपी या जखमा मनावर कोरल्या
जातात. जुन्या जखमाच आयुष्यभर चिघळत राहतात.
आणि नवे घाव पुन्हा पुन्हा होतच राहतात.आणि आयुष्य मात्र यातच पुढे सरकत राहतं.
कुणाचं आयुष्य अगदी सहज सुंदर असतं तर कुणाचं आयुष्य खूपच कॉम्प्लीकेटेड असतं.एखाद्याच्या आयुष्यात वर्षानुवर्षे कायम दुःखाचाच बाजार असतो.कधी पैशाच्या अडचणी, कधी नातेसंबंधांच्या अडचणी.
अशा एकामागोमाग अडचणी आयुष्यात येतच राहतात.फरक ईतकाच की कुणी यामध्ये गुंतून पडतं तर कुणी यामध्ये अडकून न राहता पुन्हा नव्याने काहीतरी करायचा प्रयत्न करतं.
अशी खूप उदाहरणं आपल्या आजुबाजूला असतात.ज्यांच आयुष्य केवळ जखमा चिघळण्यातच चाललेलं असतं.आणि इतकच नाही तर रोज नवीन घाव त्यांच्यावर होतच असतात. याव्यतिरिक्त दुसरं कोणतं आयुष्यच नसतं.
एखादं उदाहरण पाहूयात.
समीरा आणि तेजसची पाच वर्षाची रिलेशनशिप होती.
सगळं कसं छान चालू होतं.सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित ठरलं होतं.अगदी लग्नाचा निर्णयही ठाम झालेला होता.
पण अचानक दोघांमध्ये संशयाची ठिणगी पडली.
कित्येक प्रयत्न करूनही गैरसमज काही दूर झाले नाहीत.
समीराने तेजसवर संशय घेतला.
तेजसने समीराला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण समीराने तेजसचं काही ऐकलं नाही.सगळ्या सुंदर आठवणींवर क्षणात पाणी पडलं.समीराने दुसऱ्या मुलाशी लग्नही केलं.पण तेजस मात्र तसाच राहिला.त्याचं मन अक्षरशः आतून तुटलं.त्याला असह्य वेदना झाल्या.
आयुष्यातील पाच वर्ष एखाद्या जखमेसारखी वाटू लागली.” त्यामुळे पुढचे चार पाच वर्ष तरी रिलेशनशिप हा विषय तेजससाठी बंद झाला होता.चार पाच वर्ष गेली.पण जुन्या जखमा त्याला काही विसरता आल्या नाही.चार पाच वर्ष जुन्या आठवणी त्याला त्रास देत होत्या.त्याचे दिवस जुन्या जखमा चिघळण्यातच जात होते.चार पाच वर्षानंतर त्याला घरच्यांनी लग्नासाठी फोर्स केला.
त्याने जबरदस्ती लग्नाला होकार दिला.जबरदस्ती एखादं नातं जुळत नाही. त्यामध्ये त्रास तर होतोच.शेवटी काय,जे व्हायचं ते झालं.जुन्या जखमा तो चिघळत राहिला आणि नवे घाव त्याच्या मनावर होतच राहिले.सतत नकारात्मक विचार त्याच्या मनाला सळो की पळो करून सोडत होते.
समीराचं आयुष्य मात्र अगदी सुरळीतपणे चाललं होतं.तेजसने स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही.जुन्या जखमाच तो चिघळत राहिला.
दुसरं असं त्याचं आयुष्यच राहिलं नव्हतं.
तर असो,
आयुष्य सुंदर आहे मित्रांनो, फक्त जुन्या जखमा चिघळणं थांबवायला हवं.नवीन घाव तर होतच राहतात पण जुन्या जखमांना किती काळ चिघळत ठेवायचं ?
आयुष्यात रोज कुणीतरी नवीन माणूस येतं,नवीन घाव करून जातं.ते सहसा कुणी थांबवू शकत नाही. पण जुन्या जखमा चिघळत राहणं आपण नक्कीच थांबवू शकतो.ते आपल्याच हातात आहे. त्यामुळे जखमांना चिघळत राहण्यात आयुष्य घालवू नका.
आयुष्यात जखमा चिघळत राहण्यापेक्षाही इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी तो वेळ खर्च करा.जखमांना चिघळत राहण्याचा मनाला छंद लागू देऊ नका.
आयुष्यात क्षणभरात गोष्टी बदलत असतात.इकडचं जग तिकडं व्हायला वेळ लागत नाही.आपलं आयुष्य म्हंटलं तर क्षणभंगुर आहे. मग या क्षणभंगुर आयुष्यात किती काळ जखमांना कवटाळून बसायचं ?
मित्रांनो, उरलं सुरलं आयुष्य जगूयात नं मस्त ?
जुन्या जखमा,नवे घाव,
हे काय आयुष्य झालं ?
नवे घाव झाले तर
हसत हसत झेलूयात,
फक्त जुन्या जखमा मात्र
जरा बाजूला ठेवूयात
पडणाऱ्या पावसात
चिंब चिंब भिजूयात….
आयुष्य सुंदर आहे,
मनसोक्त जगूयात…!😊
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

