Skip to content

काहीही झालं तरी जगण्याची दिशा वारंवार चुकवू देऊ नका.

काहीही झालं तरी जगण्याची दिशा वारंवार चुकवू देऊ नका.


अपर्णा कुलकर्णी


मिताली तिच्या नावाप्रमाणेच मितभाषी होती. तिची काही स्वप्ने होती आणि कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची तिची तयारी पण. त्यामुळे करिअर निवडताना तिने खूप विचार करून निर्णय घेतला आणि आयटी क्षेत्र निवडले. त्यात तिने खूप यश मिळवले आणि बघता बघता नोकरी पण मिळवली. तिचे आणि अर्थातच तिच्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण केले.

यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले होते आणि अर्थातच त्यात तिच्या आई बाबांनी तिला पाठिंबा दिला होता. मितलीला तिच्या मनाप्रमाणे नोकरी मिळाली होती आणि ती प्रमाणिकपने तिचे काम करत होती. पण प्रत्येक आई वडिलांना मुलगी वयात आली की लग्नाची जबाबदारी पूर्ण करण्याचे वेध लागतात तसेच मितलीच्या आई बाबांचे ही झाले होते. त्यामुळे तसे त्यांनी मितालीला बोलून दाखवले तर ती फार काही मोकळेपणाने बोलली नाही. पण तिच्या आई बाबांना तिचा अबोल स्वभाव माहीत असल्याने त्यांनी फार काही मनावर घेतले नाही.

पण मितलीच्या शांत राहण्याचे खास कारण होते आणि ते होते मयंक. मयंकवर मिताली प्रेम करत होती आणि तिच्या लग्नाबाबत आई बाबा गंभीर आहेत हे सांगूनही मयंक काहीच बोलायला तयार नाही हे पाहून तिने प्रत्यक्ष त्याला भेटुनच विचारायचे ठरवले. बराच वेळ मिताली त्याची वाट पहात होती, तो पण इंजिनियर होता आणि कंपनीत नोकरी करत होता. बऱ्याच वेळाने मयंक ठरलेल्या ठिकाणी भेटायला आला तेंव्हा मिताली म्हणाली काय झालं आहे तुला ?? मी कितीदा विचारले तुला कधी येतोस आई बाबना भेटायला पण तू काहीच का बोलत नाहीस ?? तेंव्हा मयंक सरळ म्हणाला, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत.

माझ्या घरच्यांना इतकी शिकलेली मुलगी नको आहे त्यामुळे आपण इथेच थांबलेले बरे. त्याचे हे बोलणे ऐकून मितालीला काय बोलावे कळेना. तुला तुझ्या घरच्यांचे विचार माहीत होते तरीही तू माझ्या सोबत फिरत राहिलास, लग्नाची, आयुष्यभर साथ देण्याची वचने का दिली आणि आता तुला घरच्यांचे विचार आठवत आहेत ?? तरीही मयंक काहीच बोलला नाही तेंव्हा तिने सणसणीत थोबाडीत दिली मयंकच्या आणि तिथून घरी आली तर घरचे तिला आलेल्या स्थळा बद्दलच बोलत होते. मिताली आली हे पाहून आई बाबांनी तिला आलेल्या स्थळांचे फोटो दाखवले आणि पसंत करायला सांगितले पण मिताली मात्र कोणत्याच फोटोकडे धड पाहू शकली नव्हती.

मयंक सोबत बोलून आज तिच्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगण्याचे स्वप्न ती पहात होती आणि मयंकने मात्र तिच्या स्वप्नांचा चुराडा केला होता त्यामुळे तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या असे सांगून ती निघून गेली. तरीही दोन तीन दिवसांनी मितालीला तिच्या आई बाबांनी त्यांनी पसंत केलेली दोन तीन स्थळे आणि फोटो दाखवले आणि त्यातून आवडलेला फोटो पसंत करायला सांगितले आणि त्यांच्या समाधानासाठी एक फोटो मितालीने सिलेक्ट केला.

थोड्याच दिवसात स्थळ येऊन पाहून गेले आणि एकमेकांची पसंती होऊन लग्न ही झाले. तिने लग्नाचा निर्णय फार विचार न करता घाईत घेतला होता. मितालीसाठी पहिले प्रेम ते पहिले प्रेम होते. मयंकने तिला साथ दिली नसली तरी तिने मात्र त्याच्यावर प्रेम केले होते तरीही सगळे काही विसरून तिने तिच्या लग्नाला आणि तिच्या नव्या नात्याला नवऱ्यासह स्वीकारले होते. तिचा नवरा डॉक्टर होता आणि दिसायला पण छान होता. चेतन नाव होते त्याचे.

सुरुवातीला चेतन आणि मितालीचे छान पटले पण नंतर नंतर मात्र चेतनचा संशयी स्वभाव मितालीच्या लक्षात यायला लागला होता. त्याचे सतत असे संशयी नजरेने बघणे, घरात बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालने, अती काटकसरी स्वभाव या सगळ्यामुळे त्यांच्यात वाद व्हायला लागले होते. शिवाय चेतन पैशांचा कोणताही व्यवहार मिताली सोबत शेअर करत नव्हता पण मितालीच्या रुपया ना रुपयाचा हिशोब घेत होता. त्यामुळे हे सहन करणे तिला कठीण जात होते.

मितालीला आलेल्या दोन अनुभवांवरून तिच्या हे लक्षात आले होते की तिच्या आयुष्यात संसार सुख नाही. आपल्याला काही काळ मागे जाता आले तर,आणि पुन्हा लग्नाचा निर्णय घेता आला तर किती बरे होईल असेच तिला वाटत होते. मयंकने नाकारल्यामुळे घाईत लग्नाचा घेतलेला निर्णय किती चुकला आहे याची रोज जाणीव करून देत होता चेतन.

शिक्षण, नोकरी आणि लग्न हे आयुष्यातील सगळयात महत्वाचे निर्णय. पण यातील एक जरी निर्णय चुकला तर सगळे आयुष्य पश्चात्ताप करण्याची वेळ येते त्यामुळे काहीही झालं तरी जगण्याची दिशा वारंवार चुकवू देऊ नका.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!